आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजू बाबाचा बर्थडे:वयाच्या 9 व्या वर्षी सुरु केले होते सिगारेट ओढणे, ड्रग्ज आणि अफेअरमुळे राहिला वादात, 'या' कारणामुळे मान्यताशी केले लग्न

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता संजय दत्तचा आज वाढदिवस आहे. प्रोफेशनल लाइफपेक्षा त्याचे खासगी आयुष्याच जास्त चर्चेत राहिले आहे. संजयचा जन्म 29 जुलै 1959 रोजी सुपरस्टार सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या घरी झाला. 'रॉकी' या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. संजयने आपल्या फिल्मी करिअरमध्ये 187 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1980 च्या दशकात चरस, गांजा आणि ड्रग्जच्या व्यसनामुळे तो चर्चेत राहिला आणि त्यानंतर 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात त्याचे नाव अंडरवर्ल्डशीही जोडले गेले. आज संजय दत्तच्या 63 वा वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्याबद्दलच्या रंजक गोष्टी जाणून घेऊया...

वयाच्या 9 व्या वर्षी लागले होते सिगारेटचे व्यसन
वयाच्या 9 व्या वर्षी संजयने सिगारेट ओढायला सुरुवात केली होती. वडील सुनील दत्त यांनी अर्धवट फेकलेल्या सिगारेटचे तुडके संजय चोरुन ओढत असे. एकेदिवशी जेव्हा संजय पकडला गेला, तेव्हा त्याची रवानगी हॉस्टेलमध्ये करण्यात आली. 80 च्या दशकात संजय दत्तने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण कॉलेजमध्ये संजयला चुकीची संगत मिळाली आणि त्याला चरस गांजा आणि ड्रग्जचे व्यसन जडले. सुरुवातीला आई नर्गिसला याबाबत कल्पना नव्हती. पण जेव्हा संजय स्वतःला खोलीत बंद ठेऊ लागला तेव्हा आईला संशय आला. त्यानंतर वडील सुनील दत्त संजयला अमेरिकेतील रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये घेऊन गेले. तेथे बराच काळ संजयवर उपचार झाले.

'रॉकी'द्वारे सिनेसृष्टीत पदार्पण
दरम्यान सुनील दत्त यांनी संजयला सिनेसृष्टीत आणण्याचा विचार केला. कामात बिझी झाल्यास, त्याची वाईट संगत सुटेल असे त्यांना वाटले. 1981 मध्ये रॉकी या चित्रपटाद्वारे सुनील दत्त यांनी संजय दत्तला मोठ्या पडद्यावर आणले. या काळातही संजय ड्रग्जचे सेवन करत होता. त्याचा पहिलाच चित्रपट हिट ठरला होता.

आईच्या निधनामुळे मोठा धक्का बसला होता
आपल्या अभिनयाने एक काळ गाजवणा-या अभिनेत्री नर्गिस यांचे 1981 कॅन्सरमुळे निधन झाले. संजयचा पहिला सिनेमा रॉकीच्या प्रीमिअरचा अगदी तीन दिवसांपूर्वी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आईच्या अकाली निधनामुळे संजयला मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून सावरण्यासाठी तो पुन्हा ड्रग्सच्या आहारी गेला. याप्रकरणी 1982 मध्ये त्याला तुरुंगातसुद्धा जावे लागले होते. दोन वर्षे चित्रपटांपासून आणि आपल्या देशापासून दूर राहिल्यानंतर त्याने पुन्हा एकदा आपले करिअर सुरु केले होते.

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी समोर आले नाव
1993मध्ये संजयचे नाव अचानक प्रसिद्धीझोतात आले. त्याचे कारण म्हणजे मुंबई बॉम्ब स्फोटानंतर त्याचे नाव अंडरवर्ल्डशी जोडले गेले. त्याच्याकडे अवैध शस्त्रे जप्त झाली. 1993च्या मुंबईत बॉम्बस्फोटप्रकरणी त्याच्यावर अवैधरित्या शस्त्र बाळगल्याच्या आरोप होता. 2007 मध्ये संजयला शिक्षा सुनावण्यात आली. त्याने 18 महिने तुरुंगात काढले. याकाळात त्याचे प्रदर्शित झालेले चित्रपट हिट ठरले.

मुन्नाभाई एमबीबीएसमुळे बदलली इमेज
1993 मध्ये त्याचा खलनायक हा चित्रपट प्रदर्शित झाला हा त्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला तर 90 च्या दशकातील सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला होता. त्यानंतर संजयची इमेज खलनायकाची झाली. 2003 मध्ये रिलीज झालेला मुन्नाभाई एमबीबीएस त्याची इमेज बदलणारा चित्रपट ठरला. हा चित्रपट हिट ठरला.

चर्चेत राहिले माधुरी दीक्षितसोबतचे अफेअर
संजय दत्तच्या आयुष्यात अनेक तरुणी आल्या. मात्र नव्वदच्या दशकात अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबतचे त्याचे अफेअर बरेच गाजले. मात्र त्यावेळी संजय विवाहित होता. त्यामुळे माधुरीचे वडील त्यांच्या नात्याच्या विरोधात होते. त्याचकाळात संजयला अचानक तुरुंगवास झाला. या घटनेनंतर माधुरीने त्याच्यासोबतचे आपले नाते संपुष्टात आणले. तेव्हापासून आजपर्यंत हे दोघे स्टार्स कधीही एकत्र दिसले नाहीत.

अनेक महिलांसोबत जुळले नाव
माधुरीशिवाय संजयचे नाव अभिनेत्री टीना मुनीमसोबतसुद्धा जुळले होते. इंडस्ट्रीत पदार्पण केल्याकेल्या या दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. दोघे 'रॉकी' या सिनेमात एकत्र झळकले होते. मात्र लवकरच त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर अभिनेत्री आणि मॉडेल लीजा रे आणि मॉडेल नादिरासह संजयचे नाव जुळले. मात्र या दोन्ही लिंकअप्सच्या केवळ चर्चा रंगल्या.

मान्यतासह केले तिसरे लग्न
1987 मध्ये संजयचे लग्न अभिनेत्री रिचा शर्मासोबत झाले होते. संजयचे हे पहिले लग्न होते. दोघांना त्रिशाला नावाची एक मुलगी असून ती अमेरिकेत असते. लग्नाच्या नऊ वर्षांनी रिचाचे कॅन्सरमुळे निधन झाले. अमेरिकेत अनेक वर्षे रिचावर उपचार सुरु होते. त्यानंतर 1998मध्ये संजयने रिया पिल्लईसह लग्न केले. मात्र 2005मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2008 मध्ये मान्यतासह संजयने तिसरे लग्न केले.

मुस्लिम कुटुंबात जन्मली मान्यता
मान्यताचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला. यापूर्वी मान्यताचे नाव दिलनवाज शेख होते. बॉलिवूडमध्ये आल्यावर तिने तिचे नाव बदलून सारा खान असे ठेवले. चित्रपटसृष्टीत ती याच नावाने ओळखली जात होती. पण केआरकेच्या ‘देशद्रोह’ या चित्रपटात पडद्यावर तिचे नाव मान्यता करण्यात आले. तेव्हापासून हेच तिचे नाव झाले आहे. मान्यतालाही चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. मात्र तिला काम मिळत नव्हते. त्यामुळे तिने बी आणि सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

अशी झाली पहिली भेट
संजय दत्तने तिच्या ‘Lovers Like Us’ या चित्रपटाचे हक्क विकत घेतल्यानंतर मान्यता पहिल्यांदा संजय दत्तला भेटली. या चित्रपटासंदर्भात संजय आणि मान्यता यांची मीटिंग झाली. या भेटीनंतर दोघेही फोनवर बोलू लागले आणि मान्यता थेट संजयला भेटायला जाऊ लागली. दोघे तासनतास फोनवर बोलत असत. अनेकदा संजय दत्त घरी एकटाच राहत असे, तेव्हा मान्यता स्वतःच्या हाताने त्याच्यासाठी जेवण बनवायची.

…म्हणून घेतला लग्नाचा निर्णय
मान्यता आणि संजय दत्त भेटले तेव्हा संजय त्याची एक ज्युनियर आर्टिस्ट नादिया दुरानीला डेट करत होता. एकीकडे नादिया संजय दत्तच्या क्रेडिट कार्डने शॉपिंग करत होती, तर दुसरीकडे मान्यता काही न मागता त्याच्यासाठी खूप काही करत होती. या गोष्टीमुळे संजयचा मान्यताकडे कल वाढला. मान्यता संजय दत्त आणि त्याच्या कुटुंबाचा खूप विचार करत असे. मान्यताच्या या चांगल्या गुणांनी संजय दत्तचे मन जिंकले. 2008 मध्ये संजयने मान्यतासोबत लग्न केले. त्यावेळी मान्यताचे वय अवघे 29 वर्षे होते, तर संजयचे वय 50 होते. आज मान्यता ही संजय दत्त प्रॉडक्शनची सीईओ आहे.

संजयला आहेत तीन मुले
संजयच्या थोरल्या मुलीचे नाव त्रिशाला आहे. ती अमेरिकेत राहते. त्रिशाला संजय आणि त्याची पहिली पत्नी रिचाची मुलगी आहे. तर तिसरी पत्नी मान्यतापासून संजयला दोन जुळी मुली आहेत. यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

बातम्या आणखी आहेत...