आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ठाकरे'नंतर संजय राऊतांचा नवा चित्रपट:जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती, 'ठाकरे 2' येणार असल्याचेही सुतोवाच

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. संजय राऊत यांनी नुकताच मटा कॅफेमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी 'ठाकरे 2' या चित्रपटासह आणखी एका चित्रपटाची निर्मिती करत असल्याचे सांगितले.

आता जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती
'ठाकरे' या चित्रपटाच्या निर्मितीनंतर आता भविष्यात कोणत्या चित्रपटाची निर्मिती करणार? असा प्रश्न संजय राऊत यांना यावेळी विचारण्यात आला. यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, 'जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे काम जवळपास संपत आले होते. पण मधल्या काळात आमच्यावर संकट आल्याने ते थांबले आहे. पण मी जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर चित्रपट काढणार. कारण नवीन पिढीला बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस या नेत्यांनी आयुष्यात काय केले हे समजायला हवे. सलमान खान-शाहरुख आहेतच पण आमचे नेते हे होते'.

'ठाकरे 2' हा चित्रपटही येणार
दरम्यान संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ठाकरे या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याचेही यावेळी सांगितले. याविषयी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना कोपरखळीही लगावली. ठाकरे 2 बद्दल बोलताना ते म्हणाले, 'हा चित्रपट येणारच आहे, जर एकनाथ शिंदेंवर चित्रपट येऊ शकतो, धर्मवीर नावाचा तर.. हा चित्रपट आनंद दिघेंवर नव्हता तर त्यांच्यावरच होता हे नंतर कळले,' असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

दरम्यान जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर आधारित चित्रपट आणि 'ठाकरे 2' हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार किंवा यामध्ये कोणत्या कलाकार असतील याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

'ठाकरे' चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारली होती मुख्य भूमिका

बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर बेतलेला ठाकरे हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अमृता राव मुख्य भूमिकेत आहेत. नवाजच्या अभिनयाची आणि लूकची त्यावेळी बरीच चर्चा रंगली होती. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता.

बातम्या आणखी आहेत...