आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

खासगी आयुष्य:वयाच्या 13 व्या वर्षी 30 वर्षांच्या डान्सरसोबत झाले होते सरोज खान यांचे लग्न, 14 व्या वर्षी बनल्या होत्या आई 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाळेत जायच्या वयात सरोज यांचे सोहनलालसोबत लग्न झाले होते.

2000हून अधिक गाणी कोरिओग्राफ करणा-या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. 17 जून रोजी श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

22 नोव्हेंबर 1948 रोजी किशनचंद सद्धू सिंह आणि नोनी सद्धू सिंह यांच्या घरी जन्मलेल्या सरोज यांचे खरे नाव निर्मला किशनचंद्र संधु सिंह नागपाल होते. फाळणीनंतर सरोज यांचे कुटुंब पाकिस्तानातून भारतात स्थायिक झाले होते. वयाच्या अवघ्या तिस-या वर्षी बालकलाकार म्हणून 'नजराना' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात केली होती. जाणून घेऊयात त्यांच्या खासगी आयुष्याविषयी 

  • वयाच्या अवघ्या 13 वर्षी अचानक झाले होते सरोज यांचे लग्न

सरोज खान यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी इस्लाम धर्माचा स्वीकार करत 43 वर्षीय डान्स मास्टर बी. सोहनलालसोबत लग्न केले होते. सरोज यांच्यापेक्षा वयाने 30 वर्षे मोठे असलेल्या सोहनलाल यांचे हे दुसरे लग्न होते. त्यांना पहिल्या लग्नापासून चार मुले होती. एका मुलाखतीत सरोज यांनी सांगितले होते की,  वयाच्या 13 वर्षी मी शाळेत जात होती. त्यावेळी लग्नाचा अर्थसुद्धा मला समजत नव्हता. एकेदिवशी त्यांचे डान्स मास्टर सोहनलाल यांनी त्यांच्या गळ्यात काळा धागा बांधला होता. काळा धागा बांधल्यामुळे लग्न झाल्याचे सरोज यांना वाटले होते. 

  • नव-याने लपवली होती विवाहित असल्याची गोष्ट

शाळेत जायच्या वयात सरोज यांचे सोहनलालसोबत लग्न झाले होते. त्यावेळी सोहनलाल विवाहित असून चार मुलांचे वडील असल्याचे सरोज यांना ठाऊक नव्हते. सरोज यांना सोहनलाल यांच्या पहिल्या पत्नीविषयी 1963 मध्ये समजले होते. त्याचवर्षी सरोज यांच्या मुलाचा (राजू खान) जन्म झाला होता. 1965 मध्ये सरोज खान यांनी सोहनलाल यांच्या दुस-या बाळाला जन्म दिला. मात्र बाळाचा 8 महिन्यांत मृत्यू झाला होता. जेव्हा सोहनलाल यांनी सरोज यांच्या मुलाला आपले नाव देण्यास नकार दिला, तेव्हा सरोज त्यांच्यापासून विभक्त झाल्या. काही वर्षांनंतर सोहनलाल यांना हृद्यविकाराचा झटका आला. त्यांच्या आजारपणात सरोज पुन्हा त्यांच्या आयुष्यात परतल्या. याकाळात सरोज यांनी मुलीला जन्म दिला. मात्र मुलीच्या जन्मानंतर पुन्हा एकदा सोहनलाल आणि सरोज यांच्या नात्यात वितुष्ठ निर्माण झाले आणि सरोज यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे संगोपन एकटीने केले.  

  • दोनदा झाले होते सरोज यांचे लग्न  

सोहनलाल यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर सरोज खान यांनी सरदार रोशन खानसोबत लग्न केले सरदार रोशन आणि सरोज यांची सुकन्या खान ही एक मुलगी आहे. सुकन्या खान आता दुबईत डान्स इन्स्टिट्युट चालवते.  

  • या अभिनेत्रींना शिकवला डान्स 

साधना, वैजयंतीमाला, कुमकुम, हेलन, शर्मिला टागोर, माला सिन्हा, वहीदा रहमान, झीनत अमानपासून ते रेखा, श्रीदेवी, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, उर्मिला मातोंडकर, ऐश्वर्या राय, करीना कपूर आणि सनी लिओनी या अभिनेत्रींना सरोज खान यांनी नृत्याचे धडे दिले. सरोज यांना 'मिस्टर इंडिया' या सिनेमातील श्रीदेवीवर चित्रीत झालेले गाणे हवा-हवाईमुळे यश मिळाले. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.  

  • या सिनेमांसाठी कोरले पुरस्कारांवर नाव 

2002 मध्ये आलेल्या 'देवदास', 2006 मध्ये 'श्रृंगारम' आणि 2007 मध्ये रिलीज झालेल्या 'जब वी मेट' या सिनेमातील उत्कृष्ट कोरिओग्राफीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 8 फिल्मफेअर अवॉर्ड्स त्यांच्या नावी आहेत. याशिवाय 2001 मध्ये आलेल्या 'लगान' या सिनेमासाठी त्यांना अमेरिकन कोरिओग्राफी अवॉर्ड मिळाला होता. काही चित्रपटांमध्ये त्यांनी लेखक म्हणूनही काम केले होते.

  • अखरेच्या काळात सरोज यांच्याकडे होता कामाचा तोटा 

सरोज यांनी त्यांच्या करिअरमध्ये 2000 हून अधिक गाणी कोरिओग्राफ केली. मात्र शेवटच्या काही वर्षांत त्यांच्याकडे फारसे काम नव्हते. वर्षभरात एखाद-दुस-या सिनेमाची त्या कोरिओग्राफी करत असत.  

  • माधुरी दीक्षित होती आवडती अभिनेत्री

माधुरी दीक्षित ही त्यांची सगळ्यात आवडती अभिनेत्री होती. तिचा डान्स त्यांना प्रचंड आवडायचा. त्यांनी सगळ्यात जास्त हिट गाणी माधुरीसोबतच दिली. माधुरी दीक्षितवर चित्रीत केलेलं ‘कलंक’ सिनेमातलं ‘तबाह हो गये’ हे त्यांनी कोरिओग्राफ केलेले शेवटचे गाणे ठरले.

  • टीव्ही शोजमध्येही झळकल्या सरोज खान 

सरोज खान यांनी अनेक रिअॅलिटी शोजमध्ये परीक्षकाची भूमिका बजावली होती.  'नच बलिए', 'उस्तादों के उस्ताद', 'नचले वे विद सरोज खान', 'बूगी-वूगी', 'झलक दिखला जा'  या शोजचा समावेश आहे. 

0