आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बी.आर चोप्रा यांच्या गाजलेल्या 'महाभारत'मध्ये इंद्रदेवाची भूमिका साकारणारे अभिनेते सतीश कौल सध्या हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतित करत आहेत. एका बातचीतमध्ये त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. 300 हून अधिक पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. लॉकडाऊनमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचे त्यांनी सांगितले असून ते वृद्धाश्रमात राहात असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले आहे.
सतीश म्हणाले, “मी लुधियानात एका छोट्या भाड्याच्या घरात राहत आहे. मी आधी वृद्धाश्रमात राहत होतो. पण सत्या देवी यांच्यामुळे सध्या भाड्याच्या घरात जागा मिळाली आहे. माझी प्रकृती चांगली आहे. पण लॉकडाउनमुळे परिस्थिती बिघडू लागली आहे.”
सतीश म्हणाले, “औषधं, भाजी आणि काही मुलभूत गोष्टींसाठी मी झगडत आहे. मला मदत करा असे मी चित्रपटसृष्टीला आवाहन करतोय. अभिनेता असताना माझ्यावर इतक्या जणांनी प्रेम केले. पण आता मला एक माणूस म्हणून मदतीची गरज आहे.”
73 वर्षीय सतीश कौल यांनी महाभारताव्यतिरिक्त 'विक्रम और बेताल' या कार्यक्रमातही काम केले होते. तसेच 'प्यार तो होना था था' आणि 'आंटी नंबर 1' सारख्या चित्रपटांमध्ये ते झळकले. सतीश कौल 2011 मध्ये मुंबईहून पंजाबमध्ये गेले आणि त्यानंतर तेथे अभिनय शाळा सुरु केली होती.
सतीश पुढे म्हणाले, “2015 मध्ये माझ्या पाठीचे हाड मोडल्यानंतर जे काम सुरु होते ते थांबवावे लागले. दोन वर्ष मी रुग्णालयात होतो. नंतर मला वृद्धाश्रमात जावे लागले. तिथे मी दोन वर्षे राहिलो.”
सतीश कौल म्हणाले, “जर लोक मला विसरले असतील तर ठीक आहे. मला खूप प्रेम मिळाले असून त्यासाठी मी आभारी आहे. मी नेहमीच प्रेक्षकांचा ऋणी राहील."
सतीश कौल यांनी स्वतःसाठी घर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ''मी राहू शकेन असं व्यवस्थित घर विकत घेण्यासाठी मी सक्षम व्हावं एवढीच माझी अपेक्षा आहे. सगळं काही संपलेले नाही. मला कोणीतरी काम घावे ही अपेक्षा आहे. मी कोणतीही भूमिका करू शकतो. मला पुन्हा अभिनय करायचा आहे.''
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.