आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडची कहाणी:कसे सुरू झाले सुपर स्टार्सचे युग? 109 वर्षांत सिनेसृष्टीत किती झाले बदल? वाचा रंजक किस्से

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूडसाठी अनेक टप्पे मैलाचा दगड ठरले.

भारतीय चित्रपटसृष्टीने 109 वर्षे पूर्ण केली आहेत. 3 मे 1913 रोजी प्रदर्शित झालेल्या 'राजा हरिश्चंद्र' या चित्रपटापासून सुरू झालेला चित्रपटसृष्टीचा प्रवास आजतागायत सुरू आहे. सिनेमाच्या या प्रदीर्घ प्रवासात अनेक रंजक किस्से घडले आहेत. बॉलिवूडसाठी अनेक टप्पे मैलाचा दगड ठरले. 109 वर्षांचा हा प्रवास कसा होता आणि दशकानूदशके भारतीय चित्रपट कसा बदलला? जाणून घेऊया…

पहिला मूकपट 'राजा हरिश्चंद्र'
मूकपटांचे युग 1913 पासून सुरू झाले आणि 1930 पर्यंत चालले. दादासाहेब फाळके यांचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र हा 1913 मध्ये आला होता. दत्तात्रेय दामोदर दाबके यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती आणि ते हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले नायक होते. हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी 7 महिने 21 दिवस लागले. या चित्रपटाचा सेट दादर, मुंबई येथे लावण्यात आला होता. या चित्रपटाचा पहिला शो गिरगावातील कोरोनेशन थिएटरमध्ये दाखवण्यात आला. हा चित्रपट 50 मिनिटांचा होता.

यानंतर 17 वर्षांत जवळपास 1300 मूकपट बनले, पण त्यापैकी फक्त 29 चित्रपटांच्या प्रिंट्स जतन होऊ शकल्या आणि बाकीच्या चित्रपटांचे रिल्स गहाळ झाले. खलील, अण्णा साळुंके, पृथ्वीराज कपूर, सोहराब मोदी, दुर्गाबाई कामत, सुलोचना रुबी मायर्स, सुलताना, इंदिरा देवी हे या काळातील मोठे स्टार होते.

जेव्हा 'आलम आरा'चा आवाज घुमला
पहिला बोलपट असलेल्या 'आलम आरा'चा पहिला शो 14 मार्च 1931 रोजी मुंबईतील मॅजेस्टिक सिनेमात दाखवण्यात आला. हा शो दुपारी 3 वाजता सुरू होणार होता, मात्र सकाळी 9 वाजताच सिनेमागृहाबाहेर लोक जमले होते. जमाव अनियंत्रित झाल्यावर पोलिसांना पाचारण करावे लागले, लाठीचार्जही झाला. या चित्रपटाची क्रेझ इतकी होती की लोकांनी 50-50 रुपयांना त्याची तिकिटे ब्लॅकमध्ये खरेदी केली. त्या काळात ही रक्कम मोठी होती. या चित्रपटात एकूण 7 गाणी होती. याच चित्रपटातील 'दे दे खुदा के नाम पे' हे भारतीय चित्रपटातील पहिले गाणे मानले जाते, जे वजीर मोहम्मद खान यांनी गायले होते.

हा तो काळ होता जेव्हा महिलांनी चित्रपटात काम करणे चांगले मानले जात नव्हते. त्यामुळे अभिनेत्री झुबेदालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. झुबेदाच्या दोन बहिणी सुलताना आणि शेहजादी याही अभिनेत्री होत्या. झुबेदा या गुजरातचे नवाब सिद्दी इब्राहिम यांच्या कन्या होत्या. झुबेदा यांनी देवदास (1937) आणि मेरी जान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

124 मिनिटांचा आलमारा इम्पीरियल मूव्हीटोन नावाच्या निर्मिती कंपनीने तयार केला. दुर्दैवाने या चित्रपटाची एकही प्रिंट शिल्लक नाही. आता हा चित्रपट बघायचा असेल तर बघता येणार नाही.

रंगीत चित्रपटांच्या युगाची सुरुवात
बोलके चित्रपट कृष्णधवल असायचे, त्यामुळे पडद्याला रंग देण्याचे काम दिग्दर्शक मोती. जी. गिडवानी यांनी उचलले. त्यांनी 1937 मध्ये आलम आराचे दिग्दर्शक अर्देशीर इराणी यांच्यासोबत किसान कन्या हा पहिला रंगीत चित्रपट बनवला. 1933 मध्‍ये आय व्ही शांताराम यांचा शिरंधरी हा पहिला रंगीत चित्रपट होऊ शकला असता, पण तसे झाले नाही. वास्तविक, व्ही शांताराम यांनी चित्रपट रंगीत करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि तो जर्मनीलाही नेला पण ते होऊ शकले नाही आणि शांताराम इतिहास रचण्यात चुकले.

स्टार्सचे सुपरस्टार होण्याचे युग सुरू झाले
1935 नंतर राज कपूर, दिलीप कुमार, अशोक कुमार, देव आनंद यांनी चित्रपटांमध्ये प्रवेश केला. हे सर्व स्टार्स सिनेसृष्टीच्या इतिहासात आपले नाव नोंदवण्यात यशस्वी ठरले. इथून या स्टार्सची क्रेझही वाढली. हळूहळू या स्टार्सकडे चाहत्यांची क्रेझ वाढतच गेली.

त्या काळात देव आनंद यांनी पहिल्यांदाच स्टारडमची चव चाखली. 1946 मध्ये आलेल्या जिद्दी या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

देव आनंद यांनी पांढरा शर्ट आणि काळा कोट याची फॅशन लोकप्रिय केली. यादरम्यान अशी घटनाही पाहायला मिळाली, जेव्हा न्यायालयाने त्यांना काळा कोट घालण्यास बंदी घातली होती. याचे कारण खूप रंजक आणि तेवढेच विचित्रही होते. त्याकाळी अनेक तरुणी देव आनंद यांची काळा कोटमधील स्टाइल बघून त्यांच्या प्रेमात वेड्या व्हायच्या काही तरुणींनी तर त्यांच्यासाठी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या. क्वचितच असा एखादा अभिनेता असेल ज्याच्याबद्दल तरुणींमध्ये एवढे वेड होते की, कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला.

राजेश खन्ना यांनी पाहिला जबरदस्त स्टारडम
1966 मध्ये राजेश खन्ना यांची एंट्री झाली, ज्यांना यशाचे शिखर गाठायला वेळ लागला नाही. ते भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार ठरले. अमिताभ बच्चन यांनाही त्यांच्यासारखे स्टारडम मिळवता आले नाही. राजेश खन्ना यांचे 1969 ते 1971 पर्यंतचे सलग 15 चित्रपट केवळ सुपरहिटच नव्हते तर 'ब्लॉकबस्टर' देखील होते, जो आजही एक विक्रम आहे. हा विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही. त्यांच्या 74 चित्रपटांनी 'सुवर्ण महोत्सवी' साजरी केली, त्यापैकी 48 चित्रपट असे होते, जे थिएटरमध्ये 75 आठवडे पूर्ण करून 'प्लॅटिनम ज्युबिली'पर्यंत पोहोचले होते. त्यांच्या तब्बल 22 चित्रपटांनी 'सिल्व्हर ज्युबिली' पूर्ण केली.

राजेश खन्ना यांच्या काळातील मुलींच्या वेडाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अभिनयानेच नव्हे तर त्यांच्या प्रत्येक स्टाइलचे मुलींना वेड लागले होते. असे म्हणतात की, तरुणी प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना रक्ताने लिहिलेली पत्रे पाठवत असत. त्यांच्यापैकी अनेक तरुणींनी राजेश खन्ना यांच्या छायाचित्राशी लग्नही केले होते. मुली त्यांची पांढरी फियाट कार लिपस्टिकच्या मार्कने लाल करायच्या. राजेश खन्ना जर कधी आजारी पडले तर चाहते त्यांच्या फोटोवर थंड पाण्याच्या ओल्या पट्टया ठेवायचे. त्यांची लोकप्रियता इतकी होती की, त्यांना घराबाहेर पडताना पोलिस संरक्षणाची गरज पडत असे.

अँग्री यंग मॅनचे युग
राजेश खन्ना सॉफ्ट रोमँटिक नायकाच्या प्रतिमेत असताना, 1970 च्या सुमारास चित्रपटसृष्टीला मिळाला पहिला अँग्री यंग मॅन... या अभिनेत्याचे नाव आहे अमिताभ बच्चन. शोले, दीवार, जंजीर यांसारख्या चित्रपटांतून अमिताभ यांची अँग्री यंग मॅनची प्रतिमा तयार झाली. खलनायकाला सळो की पळो करुन सोडणारा आणि गरिबांचा मसिहा असलेला अँग्री यंग मॅन सिनेप्रेमींना खूप आवडला आणि त्यामुळेच या भूमिकांमुळे अमिताभही सुपरस्टारच्या श्रेणीत पोहोचले.

त्यावेळच्या व्यवस्थेबद्दल समाजाला असलेला राग त्यांच्या चित्रपटांतून दाखवण्यात आला होता. या चित्रपटांची कथा लिहिणारे दुसरे कुणी नव्हे तर सलीम-जावेद ही जोडी होती, त्यांनी व्यवस्थेतील त्रुटींमुळे त्रस्त झालेल्या एका तरुणाला अँग्री यंग मॅन बनवले आणि मग हा तरुण सामान्य माणसाचा मसिहा बनला. हा तरुण एक अँटी-हिरो नव्हे तर सिनेमाचा सर्वात शक्तिशाली नायक बनला.

शोलेपासून सुरू झालेला विजयचा प्रवास आणि अग्निपथच्या विजय दीनानाथ चौहानपर्यंत सुरु राहिला. याशिवाय अमिताभ यांनी जादूगार, तुफान, मर्द आणि शहेनशाह यांसारख्या चित्रपटांमध्येही वेगवेगळ्या भूमिका करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ते अयशस्वी ठरले.

प्रेमकथांचा काळ पुन्हा सुरु झाला
1989 मध्ये 'मैने प्यार किया' हा चित्रपट आला होता. सलमान खान आणि भाग्यश्री या नव्या जोडीने अॅक्शन चित्रपटांच्या युगात पुन्हा प्रेमकथांचे युग आणले. 'मैने प्यार किया' हा चित्रपट तुफान गाजला. यानंतर दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, आशिकी, दिल है की मानता नही यांसारख्या चित्रपटांनी देव आनंद आणि राजेश खन्ना यांच्या युगाचे पुनरुज्जीवन केले. 1990 ते 2000 हा काळ पूर्णपणे रोमँटिक चित्रपटांच्या नावावर राहिला. या काळात नदीम-श्रवण यांचे संगीत आणि कुमार सानू यांचा आवाज हे चित्रपटांच्या यशाची हमी मानले जात होते.

1995 मध्ये जेव्हा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' रिलीजसाठी तयार होता, तेव्हा शाहरुख खान स्वतः चित्रपटाच्या यशाबद्दल घाबरला होता. कारण, याआधी 'बाजीगर', 'डर'सारख्या चित्रपटात तो दिसला होता, ज्यात त्याची भूमिका खलनायकाची होती. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' रिलीज होण्यापूर्वी शाहरुखने स्वतःच आपल्या अनेक मित्रांना दाखवल्याचे एका मुलाखतीत कबूल केले होते. त्याच्या एकाही मित्राने तो रोमँटिक भूमिकेत शोभून दिसतोय, असे त्याला सांगितले नाही. बाजीगर आणि डरमध्ये त्याची अँटी हीरो इमेज होती. शाहरुखच्या म्हणण्यानुसार, सलमान खान हा एकमेव व्यक्ती होता ज्याने डीडीएलजे पाहिल्यानंतर सांगितले की, हा 'मैने प्यार किया'पेक्षा मोठा हिट चित्रपट असेल. अखेर सलमानचे म्हणणे खरे ठरले.

अ‍ॅक्शनच्या युगात मध्यमवर्गीय सिनेमे

1970 च्या दशकात, जेव्हा मोठ्या अ‍ॅक्शन आणि रोमँटिक चित्रपटांची मालिका सुरू होती, तेव्हा या चित्रपटांना मागे टाकून अनेक छोट्या छोट्या कथा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. बासू चॅटर्जी आणि हृषिकेश मुखर्जी यांसारख्या दिग्दर्शकांनी मध्यमवर्गीय सिनेमात एक नवीन ट्रेंड सेट केला. छोटे बजेट, छोटे सेट्स आणि अतिशय साध्या कथा असलेल्या या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला. बासू चॅटर्जींची छोटी बात असो की हृषीकेश मुखर्जींचा गोलमाल, चुपके-चुपके आणि आनंद... या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी बडे स्टार्स त्यांची फी 80% पर्यंत कमी करण्यास तयार होते.

हृषिकेश मुखर्जी यांनी 1970 मध्ये 'आनंद'ची कथा तेव्हा लिहायला सुरुवात केली होती, जेव्हा त्यांचे जिवलग मित्र राज कपूर आजारी पडले होते आणि त्यांना राज यांना गमावण्याची भीती वाटू लागली होती. त्यांना प्रेरित करण्यासाठी त्यांनी एका आजारी व्यक्तीची कथा लिहिली. एके दिवशी हृषिकेश मुखर्जी फ्लाइटमध्ये धर्मेंद्र यांना भेटले. प्रवासादरम्यान त्यांनी आनंदची स्क्रिप्ट धर्मेंद्र यांना ऐकवली. कथा जबरदस्त होती, धर्मेंद्र यांनीही वाटले की, मुखर्जींनी कथा मला ऐकवली तर भूमिकादेखील मलाच मिळेल. काही दिवसांनी बातमी आली की, हृषिकेश यांनी राजेश खन्ना यांना आनंदसाठी साइन केले आहे, कारण त्यावेळी 8 लाख रुपये मानधन घेणारे राजेश खन्ना हा चित्रपट फक्त एक लाखात करायला तयार झाले होते.

ही बातमी समजल्यानंतर धर्मेंद्र यांचा पारा चढला. रात्रभर दारूच्या नशेत ते हृषिकेश मुखर्जींना वारंवार फोन करत राहिले आणि तुम्ही माझ्याशी असे का वागला?, असा प्रश्न विचारु लागले होते. धर्मेंद्र यांना ही भूमिका न मिळाल्याने खूप दुःख झाले होते.

सत्यजित रे, मृणाल सेन आणि तपन सिन्हा यांसारखे चित्रपट निर्माते क्लासिक सिनेमाचे मास्टर होते.
सत्यजित रे, मृणाल सेन आणि तपन सिन्हा यांसारखे चित्रपट निर्माते क्लासिक सिनेमाचे मास्टर होते.

क्लासिक आणि पॅरलल चित्रपटांची कथा
व्यावसायिक सिनेमा स्थिर झाल्यानंतर समांतर सिनेमा किंवा क्लासिक सिनेमांचे युग सुरू झाले. 1940 च्या दशकात बंगालमधून याला सुरुवात झाली. हेच सिनेमाचे ते रुप होते जे कथा अधिक वास्तववादी आणि नॉन कमर्शिअल पद्धतीने दाखवायचे. समांतर सिनेमाचा उगम इटलीतून झाला. इटलीनंतर फ्रान्स आणि जपानमध्ये समांतर सिनेमांचे यूग आले. त्यानंतर बंगाली सिनेमांच्या माध्यमातून समांतर चित्रपट भारतात आले. सत्यजित रे, मृणाल सेन आणि तपन सिन्हा सारखे चित्रपट निर्माते त्यांचे मास्टर होते. त्याआधी 1925 मध्ये व्ही. शांताराम यांच्या 'सावकारी पाश' या चित्रपटालाही याच वर्गात स्थान देण्यात आले. ख्वाजा अहमद अब्बास यांचा 1946 मध्ये आलेला 'नीचा नगर' हा चित्रपटही याच श्रेणीतील चित्रपट होता.

यानंतर गुलजार, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, केतन मेहता यांसारख्या निर्मात्यांनी 1960 ते 1980 दरम्यान अनेक क्लासिक चित्रपट बनवले. नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, ओम पुरी, नाना पाटेकर यांसारखे कलाकार या समांतर सिनेमातूनच पुढे आले. स्पर्श, निशांत यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेले नसीरुद्दीन शाह जेव्हा व्यावसायिक चित्रपटांकडे वळले, तेव्हा वृत्तपत्रांमध्ये मथळे छापले गेले की, आता सर्व स्टार्स फिके पडतील कारण एक जबरदस्त अभिनेता व्यावसायिक चित्रपटसृष्टीत येत आहे. नसीर यांना लीड हीरो म्हणून विशेष काही करता आले नसले तरी त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप उमटवली आहे.

हिरालाल ठाकूर नंतर अमरीश पुरी, शक्ती कपूर, कादर खान यांनी नकारात्मक भूमिकांमध्ये नाव कमावले.
हिरालाल ठाकूर नंतर अमरीश पुरी, शक्ती कपूर, कादर खान यांनी नकारात्मक भूमिकांमध्ये नाव कमावले.

खलनायकाशिवाय हीरो अपूर्ण, म्हणून आता खलनायकाबद्दल बोलुया

भारतात 1913 पासून चित्रपट निर्मितीला सुरुवात झाली होती, 1928 पर्यंत सुमारे 1000 मूक चित्रपट देखील बनले होते, परंतु 1929 मध्ये इंडस्ट्रीला पहिला खलनायक मिळाला. ए. आर. कारदार यांच्या 'सफदर जंग' या चित्रपटात हिरालाल ठाकूर हे पहिले खलनायक ठरले. आत्तापर्यंत सरळ कथांना चित्रपटांत सादर केले जायचे, त्यातही बहुतेक पौराणिक कथा असायच्या. 'सफदर जंग' या चित्रपटातून नायक-खलनायकाच्या लढतीला सुरुवात झाली. हिरा लालनंतर इंडस्ट्रीत अनेक खलनायक आले. कन्हैयालाल मुख्यतः लाला या सावकाराची भूमिका करत असे. मदर इंडियातही त्यांनीच लाला सुखीलालची भूमिका साकारली होती. त्या काळात प्राण आले होते. ज्यांना इंडस्ट्रीतील आतापर्यंतचा सर्वात प्रसिद्ध खलनायक मानले जाते. प्राण यांचा अभिनय असा होता की, ते हीरोपेक्षा एक रुपया जास्त मानधन घेत असे. यानंतर अमरीश पुरी, रणजीत, शक्ती कपूर, कादर खान, कुलभूषण खरबंदा, सदाशिव अमरारपूरकर असे खलनायक आले. एक काळ असा होता जेव्हा मुख्य प्रवाहातील नायक खलनायक बनू लागले, त्यात अमिताभ बच्चन यांचाही समावेश होता. त्यांनी 'परवाना' चित्रपटात खलनायकाची भूमिका केली होती. या यादीत राजेश खन्ना, विनोद खन्ना यांच्यापासून ते शाहरुख खानपर्यंत अनेकांच्या नावांचा समावेश आहे.

किशोर कुमार, मोहम्मद रफी, लता मंगेशकर, अलका याज्ञिक, उदित नारायण, कुमार सानू हे या काळातील मोठे गायक होते.
किशोर कुमार, मोहम्मद रफी, लता मंगेशकर, अलका याज्ञिक, उदित नारायण, कुमार सानू हे या काळातील मोठे गायक होते.

चित्रपट संगीताशिवाय अपूर्ण
भारतीय चित्रपट संगीताशिवाय अपूर्ण आहे. चित्रपट बनू लागले तेव्हा पार्श्वगायन होत नव्हते, पण दृश्यानुसार चित्रपटाच्या पडद्याजवळ बसून तबला, हार्मोनियम, सारंगी वगैरे वाजवत असत. 1932 मध्ये आलेल्या 'आलम आरा' या चित्रपटाच्या सेटवर संगीत रेकॉर्ड केले गेले. 'आलम आरा'मधील 'दे दे खुदा के नाम' पर या माध्यमातून पहिल्यांदाच गाण्यांना सुरुवात झाली. यामध्ये डब्ल्यूएम खान यांनी पहिले गाणे गायले. यानंतर 1932 मध्ये आलेल्या इंद्रसभा या चित्रपटात तब्बल 71 गाणी होती, त्यातील बहुतेक गाणी मास्टर निसार यांनी गायली होती.

'धूप छांव' या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच पार्श्वगायन सुरू झाल्याचे म्हटले जाते. नितीन बोस यांना पार्श्वगायनाची कल्पना सुचली असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात नितीन बोस आणि सरस्वती देवी यांच्यापैकी कुणी पार्श्वगायनाची संकल्पना सुरू केली हे कधीच समोर आले नाही. सरस्वती देवी या पहिल्या महिला संगीत दिग्दर्शक होत्या. त्यानंतर कुंदन लाल सहगल यांचा काळ आला, ज्यांची गाणी सिने रसिकांच्या ओठी रेंगाळू लागली आणि याच काळात लता मंगेशकर यांनी पार्श्वगायनात प्रवेश केला. 'बरसात' आणि 'आवारा'सारख्या चित्रपटांनी गाण्यांना महत्त्वाचे स्थान देण्याचे काम केले. लता मंगेशकरांच्या आवाजातील 'बरसात में हम से मिले तुम सजन तुम से मिले हम, हो' हे गाणे असो किंवा 'हवा में उड़ता जाए, मेरा लाल दुप्पटा मलमल का'.. हे गाणे असो, प्रत्येक गाण्याने इतिहास रचला.

यानंतर शंकर जयकिशन, एसडी बर्मन, मदन मोहन, खय्याम, कल्याणजी आनंदजी यांसारख्या दिग्गजांनी विविध सूरांची रचना केली. मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, शैलेंद्र, शकील, हसरत जयपुरी या गीतकारांनीही उत्कृष्ट गाणी लिहिली. मुगले आझम, श्री 420, मदर इंडिया, अनाडी, सुजाता, बंदिनी, पाकीजा या चित्रपटांचे संगीत खूप गाजले. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, मुकेश, किशोर कुमार, आशा भोसले, गीता दत्त, मन्ना डे आदी पार्श्वगायकांनीही आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

90 च्या दशकापर्यंत नदीम-श्रवण यांच्या गाण्यात प्रेम आणि रोमान्सचा तडका होता. अलका याज्ञिक, कुमार सानू आणि उदित नारायण यांसारखे गायक देखील खूप लोकप्रिय झाले, परंतु 2000 चे दशक येईपर्यंत गाणी पूर्वीसारखी राहिली नाहीत. आता केवळ तंत्रज्ञानच बदलले नाही तर जुन्या गाण्यांच्या रिमिक्समुळे बॉलिवूड सतत निशाण्यावर येत आहे.

नवीन शतकात बिग बजेट आणि मोठ्या कमाईच्या नवीन ट्रेंडला सुरुवात
2000 च्या सुरुवातीला हिंदी चित्रपटसृष्टीनेही नवीन वळण घेतले. आतापर्यंत 10-15 कोटी रुपये खर्चून बनवलेल्या चित्रपटांची जागा भव्य बजेट चित्रपटांनी घेतली आहे. अजय देवगणचा 'राजू चाचा' हा 2000 साली आलेला पहिला चित्रपट होता, ज्याचे बजेट 25 कोटी होते. चित्रपटाचा सेटही खूपच भव्यदिव्य होता. मात्र, हा चित्रपट आपला निर्मिती खर्चही वसूल करू शकला नाही आणि केवळ 8 कोटींची कमाई करू शकला. पण, त्यानंतर चित्रपटांमध्ये भव्यतेचे नवे पर्व सुरू झाले. ज्यामध्ये संजय लीला भन्साळींसारखे दिग्दर्शक पुढे आले.

आमिर खानच्या 'लगान'चे बजेट 65 कोटी होते. काळ बदलला, खर्च वाढला. नुकत्याच आलेल्या '83' चित्रपटाचे बजेट जवळपास 200 कोटी होते. याआधी आलेल्या टायगर जिंदा है, बँग-बँग, वॉर, तान्हाजी, सूर्यवंशी, दिलवाले आणि पद्मावत यांसारख्या चित्रपटांचे बजेटही 150 ते 300 कोटींच्या घरात आहे. या चित्रपटांनीही त्याच प्रमाणात कमाई केली आहे. आमिरचा 'दंगल' हा 2000 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे.

बातम्या आणखी आहेत...