आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रोलिंग:स्वरा भास्करच्या ‘रसभरी’ वेब सीरिजवर सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी भडकले, अभिनेत्रीने दिले स्पष्टीकरण

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘रसभरी’ या वेब सीरिजवरून प्रसून जोशींनी प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणतात, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की शोषणाची मनमानी?

स्वरा भास्करची प्रमुख भूमिका असलेली 'रसभरी' ही वेब सीरिज 25 जूनपासून अॅमेझॉन प्राइमवर सुरू झाली आहे. या सीरिजमध्ये स्वरा भास्कर एका इंग्रजी शिक्षिकेच्या भूमिकेत झळकत आहे. ही वेब सीरिज रिलीज होताच स्वरा ट्विटरवर ट्रेंड करत आहे. मात्र आता या वेब सीरिजमधील एका दृश्यावर प्रसिद्ध गीतकार आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

शुक्रवारी प्रसून जोशी यांनी ट्विट केले असून त्यांनी त्यातील लहान मुलीच्या नाचण्याच्या दृश्यावर आक्षेप नोंदवला आहे.  त्यांनी ट्विट केले,, ‘दु:ख होतंय. रसभरी या वेब सीरिजमध्ये एक छोटी मुलगी पुरुषांसमोर उत्तेजक डान्स करताना एका वस्तूसारखे दाखवणे अत्यंत निंदनीय आहे. दिग्दर्शक आणि प्रेक्षकांना आज याचा विचार करावा की ही गोष्ट मनोरंजनाची नाही तर लहान मुलांच्या प्रती असलेल्या दृष्टीकोनाचा हा प्रश्न आहे. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की शोषणाची मनमानी?’, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. 

प्रसून जोशींच्या नाराजीवर स्वरा भास्करने स्पष्टीकरण दिले आहे. ती म्हणते, 'कदाचित तुमचा त्या सीनसंदर्भात गैरसमज झाला असावा. दृश्यामध्ये जे वर्णन केले आहे, ते अगदी उलट आहे. मुलगी स्वत:च्या मर्जीने नाचत आहे, तिचे वडील ते बघून लाजिरवाणे आणि लज्जित होतात. नृत्य हे चिथावणी देणारे नाही, ती मुलगी फक्त नाचत आहे, तिला तर हे माहित देखील नाही की समाज तिलादेखील सेक्शुअलाइज करेल. दृश्य हेच दाखवते.'

काही लोकांनी या वेब सीरिजवर टीका केली असून त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला केला. स्वरा तिच्या ट्विटर अकाऊंटवरून अशा प्रकारच्या प्रतिक्रियांना सतत उत्तरं देत आहे. रसभरी सीरिजला आयएनडीबीने 10 पैकी केवळ 2.9 रेटिंग दिले गेले आहे. यावरुन बरेच मीम्ससुद्धा व्हायरल होत आहेत. काहींनी ही सीरिज बी ग्रेड आणि सी ग्रेड चित्रपटांच्या तुलनेतही वाईट असल्याचे म्हटले आहे. 

शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्या अवतीभवती या वेब सीरिजची कथा फिरते. विशिष्ट वयोगटात तरुणांच्या मनात स्त्रियांविषयी येणाऱ्या विचारांवर उपहासात्मक पद्धतीने यात भाष्य करण्यात आलं आहे. निखिल भट्ट यांनी ही वेब सीरिज दिग्दर्शित केली आहे. स्वराने यामध्ये दुहेरी भूमिका साकारली असून तिच्यासह आयुष्मान सक्सेना, रश्मी अगडेकर, चित्तरंजन त्रिपाठी, नीलू कोहली, प्रद्युम्न सिंह, सुनिक्षी ग्रोवर, यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...