आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध अभिनेत्री शगुफ्ता अली सध्या हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. मागील चार वर्षांपासून काम नसल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. काम नसणे आणि कोरोनामुळे त्यांची संपूर्ण बचत संपली आहे. उदरनिर्वाहासाठी त्यांना आपली कार आणि दागिनेदेखील विकावे लागले आहेत. इतकेच नाही तर त्या गेल्या काही वर्षांपासून आजारीदेखील आहेत. शगुफ्ता यांनी अलीकडेच ‘स्पॉटबॉय’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत शगुफ्ता यांनी त्यांच्या आर्थिक संकटासोबत त्यांच्या आजरपणाबद्दल सांगितले आहे.
शगुफ्ता म्हणाल्या, 'प्रामाणिकपणे सांगायचे म्हणजे मला कुणाकडेही मदत मागायची नव्हती. त्यामुळे मी माझ्याजवळच्या वस्तू विकून काम चालवत होते. एकदा काम मिळाले की सर्व गोष्टी सामान्य होतील, असे मला वाटले होते. गेल्या चार वर्षांपासून हळूहळू करत परिस्थिती ढासळत गेली. मात्र कोरोनामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे.'
त्या पुढे म्हणाल्या, 'मी गेल्या 20 वर्षांपासून आजारी आहे. पण त्यावेळी मी तरूण होते आणि मी ते सांभाळू शकत होते. मला तिसऱ्या स्टेजचा कर्करोग झाला होता. मी त्याला लढा दिला आणि मी वाचली. पहिल्यांदाच मी याबद्दल सगळ्यांना सांगत आहे. या आधी हे फक्त माझ्या काही जवळच्या मित्रांना सोडून कोणालाच माहित नव्हते,' असे त्यांनी सांगितले.
शगुफ्ता यांचा एक मोठा अपघात झाला होता. त्यावेळी त्यांच्या हाताच एक हाड मोडले आणि त्यांच्या हातात एक स्टीलचा रॉड घालावा लागला. अशा कठीण परिस्थितीतही शगुफ्ता काम करत राहिल्या. इतकेच नाही तर त्यांच्या आईलासुद्धा अनेक आजार आहेत. मात्र शगुप्ता आर्थिक अडचणींमुळे त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकत नाहीये. फोनवरच डॉक्टरांशी संपर्क साधून त्या आईचा उपचार करत आहेत.
शगुफ्ता यांच्या अडचणींबद्दल सिने आणि टीव्ही कलाकारांची असोसिएशन (सिंटा) समजल्यानंतर ते त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
तीन दशकांपासून अधिक काळापासून अभिनय क्षेत्रात आहेत शगुफ्ता
शगुफ्ता गेल्या 36वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी जवळपास 15 चित्रपट आणि 20 मालिकांमध्ये काम केले आहे. 1998-99 मध्ये आलेल्या सांस या मालिकेतून त्यांना ओळख मिळाली. याशिवाय त्यांनी परंपरा, जुनून, द झी हॉरर शो, ‘ससुराल सिमर का’, ‘पुनर्विवाह’, ‘एक वीर की अरदास वीरा’ आणि ‘मधुबाला’ या मालिकांमध्ये काम केले आहे. 2018 मध्ये आलेल्या बेपनाह या मालिकेत त्या शेवटच्या दिसल्या होत्या. टीव्ही मालिकांशिवाय त्यांनी इंटरनॅशनल खिलाडी, हीरो नंबर 1, लैला मजनू या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.