आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा 'पठाण' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम रचले आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळजवळ 40 दिवस झाले आहेत. पण एवढ्या दिवसांत चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. आजही प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची भूरळ कायम आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने 'बाहुबली 2' च्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकले आहे.
'पठाण'च्या कमाईचे आकडे
‘पठाण’ने सहाव्या शुक्रवारी ‘बाहुबली 2’च्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकले आहे. ‘पठाण’ आता हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असून सोशल मीडियावर याबद्दल चांगलीच चर्चा होत आहे. एस. एस. राजामौली यांचा ‘बाहुबली 2’ हा चित्रपट 28 एप्रिल 2017 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, त्याच्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर 510.99 कोटींची कमाई केली होती.
दुसरीकडे 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज झालेल्या ‘पठाण’ने गुरुवारपर्यंत 510.65 कोटींचे कलेक्शन केले होते. ‘बाहुबली 2’ ला मागे टाकण्यासाठी चित्रपटाला फक्त 34 लाख रुपयांची गरज होती. ट्रेड रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, चित्रपटाने शुक्रवारी हा आकडा गाठला आहे आणि यासह ‘पठाण’ अधिकृतपणे सर्वात जास्त कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे. 'पठाण'ने शुक्रवारी 1.20 कोटींची कमाई केल्याचे वृत्त आहे.
यापूर्वी 'बाहुबली 2' च्या हिंदी व्हर्जनने 510.99 कोटींची कमाई केली होती. तर 'केजीएफ चॅप्टर 2' ने हिंदीत 435.33 कोटींचा गल्ला जमवला होता. आमिर खानच्या 'दंगल'चे लाइफटाइम कलेक्शन 374.43 कोटी इतकी होती.
दिग्दर्शकाने ट्वीट करत मानले आभार
'पठाण' या चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने सोशल मीडियावर ट्वीट करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. "पठाणने हिंदीमध्ये ‘बाहुबली 2’च्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकले आहे. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण…!!! चित्रपटाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा आभार," असे सिद्धार्थ आनंद यांनी म्हटले आहे.
जगभरात केली 'इतकी' कमाई
'पठाण' या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 364.15 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यात हा आकडा 94.85 कोटी इतका होता. तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाने 46.95 कोटी आणि चौथ्या आठवड्यात 14.26 कोटींचा गल्ला जमवला होता. पाचव्या आठवड्यात चित्रपटाने 8.55 कोटींचे कलेक्शन केले आहे. सर्व भाषांमध्ये चित्रपटाने 528 कोटी इतकी कमाई केली आहे. तर ओव्हरसीजमध्ये 386 कोटींची कमाई झाली आहे. वर्ल्डवाइड चित्रपटाच्या कलेक्शनचा आकडा 1026 कोटी इतका झाला आहे. अशाप्रकारे 'पठाण' ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे.
बॉलिवूडचा किंग शाहरुखच - चाहत्यांच्या प्रतिक्रिया
शाहरुखच्या चित्रपटाने इतिहास रचल्यानंतर चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. पठाणनने बेंचमार्क सेट केला आहे, असे चाहते म्हणत आहे. एका चाहत्याने लिहिले, 'किंग इज बॅक नाऊ.' तर एकाने लिहिले, 'शाहरुखने पुन्हा एकदा सिद्ध केले की, बॉलिवूडचा बादशाह तोच आहे.'
शाहरुख खानच्या या चित्रपटात दीपिका पदुकोण महत्त्वाच्या भूमिकेत आहे, तर जॉन अब्राहम नकारात्मक भूमिकेत आहे. शाहरुख आणि जॉनने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली आहे. चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांसारख्या उत्कृष्ट कलाकारांचा समावेश आहे. सलमान खानने या चित्रपटात टायगरच्या रोलमध्ये कॅमिओ केला होत.
शाहरुख खानचे वर्कफ्रंट
पठाणच्या यशानंतर शाहरुख आगामी 'जवान' आणि 'डंकी' या चित्रपटातून प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. जवान हा चित्रपट साऊथचा दिग्दर्शक एटलीने दिग्दर्शित केला आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून हा चित्रपट 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखसह नयनतारा आणि विजय सेतुपती झळकणार आहेत. तर राजकुमार हिराणी यांचा डंकी हा चित्रपट यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.