आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

55 वर्षांचा झाला किंग खान:ट्विस्ट अँड टर्ननंतर गौरीसोबत लग्नाच्या बेडीत अडकला होता शाहरुख, हत्तीवरुन पोहोचला होता लग्नस्थळी; सासूबाईंनी दिली होती आत्महत्येची धमकी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 55 वर्षे पूर्ण केली आहेत.

बॉलिवूड चित्रपटांमध्ये राहुल या नावाने प्रसिद्ध असेलला अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 55 वर्षे पूर्ण केली आहेत. रुपेरी पडद्यावर रोमँटिक इमेजसाठी ओळखला जाणारा शाहरुख खासगी आयुष्यातसुद्धा तितकाच रोमँटिक आहे. गेल्या 29 वर्षांपासून शाहरुख गौरीसोबत गुण्यागोविंदाने संसार करतोय. आर्यन, सुहान आणि अबराम ही त्यांच्या संसारवेलीवर उमलेली तीन फुलं आहेत.

25 ऑक्टोबर 1991 रोजी शाहरुख आणि गौरी लग्नाच्या बेडीत अडकले. पण या लव्ह स्टोरीतही अनेक ट्वीस्ट अँड टर्न आले होते. आज जेव्हा शाहरुख जुन्या आठवणींना उजाळा देतो, तेव्हा त्याच्या चेह-यावर हसू उमलते. भास्कर ग्रुपसोबत बोलताना स्वतः शाहरुखने प्रेमाशिवाय मी जगूच शकत नाही, असे सांगितले होते. आज शाहरुखच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात त्याच्या लव्हस्टोरीविषयी...

  • शाहरुख-गौरीच्या पहिल्या भेटीचा किस्सा

शाहरुख खान आणि गौरीची भेट शालेय जीवनात एका पार्टीत झाली होती. त्या पार्टीत शाहरुखने गौरीला एका मुलासोबत डान्स करताना पाहिले होते. तिला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. शाहरुखचे लव्ह अॅट फस्ट साइट होते. शाहरुख-गौरीची पहिली भेट झाली तेव्हा तो 19 वर्षांचा तर गौरी 14 वर्षांची होती. शाहरुखने पार्टीत गौरीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गौरीने त्याच्यासोबत बोलणे टाळले. 25 ऑक्टोबर 1984 रोजी झालेल्या तिस-या भेटीत शाहरुखने गौरीच्या घरचा फोन नंबर मिळवला. सुरुवातीला गौरीला इम्प्रेस करण्यासाठी शाहरुख तिच्यासाठी गाणे म्हणायचा. त्या गाण्याचे बोल होते, "गोरी तेरा गांव बड़ा प्यारा मैं तो गया मारा....". किंग ऑफ रोमान्सने हार न मानता गौरीला आपल्या प्रेमात पाडले आणि त्यांचे अफेअर सुरु झाले.

  • कोडवर्डमध्ये सुरु झाले होते बोलणे

शाहरुख पहिल्याच नजरेत गौरीच्या प्रेमात पडला होता. तिच्याशी फोनवर बोलण्यासाठी शाहरुखने एक उपाय शोधून काढला. तो आपल्या एखाद्या मैत्रिणीला गौरीच्या घरी फोन करायला सांगायचा. गौरीच्या घरी जो कुणी फोन उचालयाच, त्याला ती मैत्रीण आपले नाव शाहीन सांगायची. शाहीन हा कोडवर्ड ऐकून शाहरुखचा फोन असल्याचे गौरीला समजायचे. गौरीच्या घरी कुणाला शंका यायची नाही आणि बराच वेळ या दोघांचे बोलणे व्हायचे. गौरी आणि शाहरुखची भेट पार्टीजमध्ये अधिक व्हायची. हळूहळू हे दोघे लाँग ड्राइव्हवर जाऊ लागले.

  • नाव बदलून गौरीच्या घरात शिरला होता शाहरुख

शाहरुखने हा किस्सा शेअर करताना सांगितले, त्याकाळात माझी फौजी ही मालिका सुरु होती. त्या मालिकेत माझ्या कॅरेक्टरचे नाव अभिमन्यू होते. एकदा गौरीच्या बर्थडे पार्टीत मी लपून गेलो होतो. जेव्हा तिच्या आईवडिलांनी मला माझे नाव विचारले, तेव्हा मी अभिमन्य हे माझे नाव सांगितले. शिवाय अगदी भोळेपणाने मी दिलीप कुमार यांचा दुरचा नातेवाईक असल्याचेही त्यांना सांगितले. पण जेव्हा त्यांना माझी खरी ओळख पटली, तेव्हा गौरीच्या घरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

  • अफेअरविषयी कळल्यानंतर गौरीच्या आईने दिली होती आत्महत्येची धमकी

शाहरुख सांगतो, माझ्या लग्नाची एक इंट्रेस्टिंग स्टोरी आहे. गौरीच्या आईवडिलांनी आमच्या लग्नाला कडाडून विरोध केला होता. तिच्या आईने तर आत्महत्येची धमकी दिली होती. एकेदिवशी गौरीच्या वडिलांनी फोन करुन मला हे लग्न होऊ शकणार नाही, असे खडसावले होते. सहा वर्षे आम्ही दोघे लपून भेटलो होते.

  • शाहरुखने हळूहळू गौरीच्या घरच्यांचे मन जिंकले

गौरीच्या प्रेमात मी आकंठ बुडालो होतो. तिच्याशिवाय इतर कुणीच मला दिसत नव्हते. तिच्याशी लग्न करुन संसार करण्याचे मी स्वप्न रंगवू लागलो होतो. पण घरच्यांचा आमच्या नात्याला तीव्र विरोध होता. म्हणून हळूहळू मी तिच्या चुलत भावांसोबत मैत्री वाढवायला सुरुवात केली. मी त्यांना डिस्कोला घेऊन जात असे. हळूहळू तिचे भाऊ मला पसंत करु लागले. गौरीच्या मामा मामींनी मला विश्वास दिला होता, की एकेदिवशी तिचे आईवडीलसुद्धा त्यांचे नाते स्वीकारतील.

  • गौरीने दिला होता शाहरुखला इशारा

गौरीचे आईवडील काही केल्या लग्नासाठी तयार नव्हते. तू माझ्या आईवडिलांना गांभीर्याने घेत नाहीये, ते आपले लग्न होऊ देणार नाहीत, असा इशारा गौरीने मला दिला होता, असे शाहरुखने सांगितले. शाहरुखने सांगितले, माझ्यासोबत लग्न करु नये, या दबावात गौरी आली होती. तिला आमच्या नात्याविषयी विचार करायला वेळ हवा होता. ती मला न सांगता 1989 मध्ये एका मैत्रिणीसोबत मुंबईत आली होती. जेव्हा मला समजले, तेव्हा माझा चांगलाच पार चढला होता. मुंबईला निघण्याच्या आदल्या दिवशी ती मला भेटायला आली होती. त्यादिवशी गौरीचा वाढदिवस होता. मला बघताच ती माझ्या गळ्यात पडून खूप रडली. कदाचित तणावामुळे ती रडतेय, असे मला त्याक्षणी वाटले होते. दुस-याच दिवशी ती मला न सांगता मुंबईला निघून गेली.

  • गौरीला शोधून आणण्यासाठी आईने दिले होते शाहरुखला 10 हजार रुपये

गौरी मुंबईला गेल्याचे समजल्यानंतर मी ही गोष्ट माझ्या आई आणि काही जवळच्या मित्रांना सांगितली होती. मी गौरीसोबत लग्न करु इच्छितो, असे माझ्या आईला सांगितले. तेव्हा गौरी हिंदू आहे की मुस्लिम हा प्रश्न आईने मला विचारला नाही. जी मुलगी आहे, तिला परत घेऊन ये, असे आई मला म्हणाली. आईने मला त्यावेळी 10 हजार रुपये दिले. मी माझ्या मित्रांसोबत मुंबईत आलो आणि तिला शोधू लागलो. पहिले दोन दिवस आम्ही मुंबईच्या एका मित्राच्या घरी राहिलो. त्यानंतर ओबरॉय हॉटेलसमोरील फुटपाथवर दिवस काढले. सकाळी फ्रेश होण्यासाठी आम्ही हॉटेल ताजमध्ये जायचो. गौरीला बीचेस अधिक पसंत आहेत. त्यामुळे मुंबईच्या प्रत्येक बीचवर जाऊन मी तिचा शोध घ्यायचो. तिचा शोध घेता-घेता जवळ असलेले सगळे पैसे संपले होते. पण गौरीचा शोध सुरु होता. एकेदिवशी बीचवरच गौरी मला आढळली. ती समुद्राच्या पाण्यात उभी होती. मला बघताच तिच्या अश्रूंचा बांध फुटला. मी गौरीविषयी किती पझेसिव्ह आहे, हे त्याक्षणी मला समजले होते.

  • हत्तीवरुन लग्नस्थळी पोहोचला होता शाहरुख

शाहरुखने हा रंजक किस्साही शेअर केला. सहसा नवरदेव लग्नस्थळी कार किंवा घोड्यावर स्वार होऊन येत असतो. पण मी ज्या कारने जाणार होतो, ती कार मध्येच बंद पडली. मग मित्रांनी घोडीची व्यवस्था केली. पण वाटेतच मला घोडीवरुन हत्तीवर बसण्यास सांगण्यात आले. हत्तीवर चढणे अतिशय कठीण होते. माझ्या मित्रांनी मला हत्तीवर बसवले. लग्नात पुरेपुर एन्जॉय करायचे मी ठरवले होते. त्यामुळे मी माझ्या लग्नात एक किलोमीटरपर्यंत नाचलो होतो. नाचताना मी हाताच्या तळव्यावर उभा झालो होतो. पाठवणीच्या वेळी गौरी खूप रडली होती. तिचे आईवडील आणि भाऊदेखील खूप रडले होते. लग्नानंतर पहिल्यांदाच गौरी आणि मी एका खोलीत राहिलो होतो. लग्नापूर्वी आम्ही खूप भेटलो, पण नेहमी आम्हाला कुणीतरी बघेल, अशी भीती मनात असायची. लग्नानंतर गौरी मला कधीच सोडून जाणार नाही, या भावनेने मी सुखावलो होतो. सकाळी उठल्यानंतर गौरी माझ्या डोळ्यांसमोर होती.

लग्नाच्या दुस-या दिवशी शाहरुख दिल्लीहून मुंबईला विमानाने पोहोचला होता. त्यादिवशी 'दिल आशना है'च्या शूटिंगला सुरुवात झाली होती. सेटवर लोक मला लग्नाच्या शुभेच्छा देतील, असे मला वाटले होते. पण सेटवर पोहोचताच माझा पहिला शॉट घेण्यात आला. एकानंतर एक माझे पाच शॉट पूर्ण झाले. मी उशीरा रात्री घरी पोहोचलो होतो. त्यावरुन गौरीने माझ्यासोबत भांडण केले होते.

शाहरुख सांगतो, गौरी अतिशय प्रामाणिक असून माझे कौतुक करते, त्यामुळे मी तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. मी खूप बोलतो, त्यावरुन ती मला टोकत असते.

शाहरुखने सांगितले, गौरीने मला शिस्त लावली. झोपण्यापू्र्वी लाइट बंद करायला तिनेच मला शिकवले. ठराविक ठिकाणी जेवण करणे, ठराविक ठिकाणी स्वतःचे कपडे ठेवणे तिने शिकवले. तिने मला जानवरापासून माणसांत आणले. तिच्यामुळे माझ्या आयुष्यात स्थिरता आली.