आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'पठाण' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय. या चित्रपटाद्वारे शाहरुख तब्बल चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. एकीकडे 'पठाण' रिलीजसाठी सज्ज आहे, तर दुसरीकडे त्याचे 'जवान' आणि 'डंकी' हे चित्रपटदेखील यावर्षभरात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शाहरुखने नुकतेच 'डंकी'चे चित्रीकरण पूर्ण केले. तर 'जवान'चे चित्रीकरण सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे त्याच्या 'जवान' या चित्रपटाचे चित्रीकरण औरंगाबादमध्ये झाले आहे.
औरंगाबादेतील बिडकीन येथील DMIC मध्ये हे चित्रीकरण पार पडले. या चित्रीकरणाला शाहरूख स्वतः हजर नसला तरी त्यातील अॅक्शन सीन्स येथेच चित्रीत झाले. यासाठी हॉलिवूडमधून स्टंट मास्टर औरंगाबादेत दाखल झाले होते. चित्रपटाचे औरंगाबाद शूटिंगचे लाइन प्रोड्युसर किशोर निकम यांनी खास दिव्य मराठीला या चित्रीकरणाची सविस्तर माहिती दिली.
15 दिवस 600 जणांचे यूनिट कार्यरत
बिडकीन येथील DMIC मध्ये 15 दिवस तब्बल 600 लोकांचे युनिट अहोरात्र कार्यरत होते. सलग 10 दिवस चित्रीकरण चालले. येथे चित्रीत झालेले 10 मिनिटांचे अॅक्शन सीन्स चित्रपटात दाखविण्यात येणार आहेत. यासाठी औरंगाबादेत तब्बल 30 कोटींची उलाढाल झाली आहे. या चित्रपटामध्ये औरंगाबादेतील 40 ते 50 स्थानिक कलावंतांनी काम केले आहे. तसेच स्थानिक 150 स्थानिकांना यातून विविध प्रकारचा रोजगार उपलब्ध झाला.
27 नोव्हेंबर ते 13 डिसेंबरदरम्यान पार पडले चित्रीकरण, 40 सेकंड हँड स्कॉर्पिओ गाड्यांचा वापर साहसी दृश्यांसाठी बिडकीन डीएमआयसीतील 5.5 किमीचा 8 लेनचा मोकळा रस्ता निवडण्यात आला होता. अॅक्शन सीनसाठी 40 सेकंड हँड स्कॉर्पिओ गाड्यांचा वापर करण्यात आला. या दृश्यांसाठी या गाड्या स्फोटाने उडविण्यात आल्या. शिवाय 20 ते 25 कंटेनर आणि 20 दुचाकी भाड्याने घेण्यात आल्या होत्या.
याशिवाय अॅपेरिक्षापासून ते क्रेन, जेसीबी आणि रोडरोलपर्यंत सर्व तयार ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर बिडकीनमधून माती, रेती, विटा ट्रॅक्टर ट्रॉली खूप वापर करण्यात आला. 600 लोकांना राहण्यासाठी शहरातील टू स्टार, थ्री स्टार, फाइव्ह स्टार हॉटेल 15 दिवस बूक होते. स्थानिक प्रशासनाच्या परवानगीपासून ते फाइव्ह स्टार हॉटेलपर्यंत सर्व खर्च मिळून 15 दिवसांत 30 कोटींपर्यंतची उलाढाल या चित्रीकरणामुळे झाली.
अॅक्शन डायरेक्टर स्पिरो रझाटोस यांच्यासह अमेरिकेतून 25 ते 30 जणांचे पथक शहरात दाखल झाले होते. बिडकीनमधील 8 लेनचा 5.5 किमीचा मोकळा रस्ता विविध अॅक्शन सीनसाठी योग्य असून भविष्यात आणखी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी आम्ही येऊ असे त्यांनी म्हटल्याचे किशोर निकम यांनी सांगितले.
यावर्षी 2 जून रोजी प्रदर्शित होणार आहे चित्रपट
जवळजवळ 7 महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टिझर निर्मात्यांनी रिलीज केला होता. चित्रपटाच्या टिझरमध्ये शाहरुख खानला रफ बॅकग्राउंडवर, जखमी अवस्थेत दाखवण्यात आले आहे. त्याच्या चेह-यावर पट्टी लावलेली दिसतेय. दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक एटलीने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'जवान' रेड चिलीज एंटरटेनमेंट सादर करत आहे. हा चित्रपट 2 जून 2023 ला पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, हा शाहरुख खानचा पहिला पॅन इंडिया चित्रपट असणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये जगभरातील सिनेमागृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.