आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख खानच्या शिरपेचात मानाचा तुरा:जगातल्या 50 श्रेष्ठ अभिनेत्यांच्या यादीत वर्णी, हा सन्मान मिळवणारा ठरला एकमेव भारतीय

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा किंग खान अर्थातच अभिनेता शाहरुख खान चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅकसाठी सज्ज आहे. त्याचा आगामी पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणारेय. पण हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला आहे. चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावरुन सुरु झालेला वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बॉयकॉट पठानची मागणी जोर धरु लागली आहे. या वादादरम्यान शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एका आंतरराष्ट्रीय मासिकाने 50 महान अभिनेते आणि अभिनेत्रींची यादी जाहीर केली असून त्यात शाहरुख खानची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे हा सन्मान मिळवणारा शाहरुख एकमेव भारतीय ठरला आहे.

‘एम्पायर मॅगझिन’ने नुकतीच ट्विटरच्या माध्यमातून जगातील 50 उत्कृष्ट नटांची यादी जाहीर केली आहे, आणि या यादीत केवळ एकाच भारतीय अभिनेत्याचा समावेश करण्यात आला आहे. शाहरुख खानचे नाव या यादीत पाहून त्याचे चाहते चांगलेच खुश झाले आहेत, त्यांनी लगेच सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल करायला सुरुवात केली आहे.

या यादीत टॉम क्रुज, अल पचीनो, टॉम हँक्स, जॅक निकोलसन, लियोनार्डो दीकॅप्रिओ, मॉर्गन फ्रीमन, गॅरी ओल्डमन, अशा दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. यात आता शाहरुखच्या नावाचाही समावेश झाला आहे. इतकेच नाही तर या मासिकाने शाहरुखच्या ‘कूछ कुछ होता है’, ‘देवदास’पासून ‘स्वदेस’सारख्या चित्रपटांमधील भूमिकेची प्रशंसा केली आहे.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तो 'झिरो' या चित्रपटात शेवटचा मुख्य भूमिकेत झळकला होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. मध्यंतरी तो 'ब्रह्मास्त्र' आणि 'रॉकेट्री' या चित्रपटांमध्ये कॅमिओ रोल साकारताना दिसला. आता तो पठाणद्वारे दमदार कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. याशिवाय 'जवान' आणि 'डंकी' हे शाहरुखचे चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...