आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख खानच्या 'जवान'विषयी मोठी अपडेट:रिलीज डेट पुढे ढकलली, आता 2 जूनला नव्हे 'या' महिन्यात होणार प्रदर्शित

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खानच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'पठाण' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम रचले. या चित्रपटानंतर आता चाहते त्याच्या आगामी चित्रपटांच्या प्रतिक्षेत आहेत. यावर्षी शाहरुख ‘डंकी’ आणि ‘जवान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान शाहरुखच्या 'जवान' या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

प्रदर्शन पुढे ढकलले
‘जवान’ हा चित्रपट शाहरुख खानचा या वर्षातील दुसरा बिग बजेट चित्रपट आहे. साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एटली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचे एक मोशन पोस्टर शेअर करत हा चित्रपट 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार अशी अधिकृत घोषणा करण्यात आली होती. पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय या चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

सिनेविश्लेषक रमेश बाला यांनी ट्वीट करत ‘जवान’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले आहे. "एटली दिग्दर्शित शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट आता जूनमध्ये रिलीज होणार होता. पण आता हा चित्रपट ऑक्टोबर 2023 मध्ये रिलीज होणार आहे," असे त्यांनी ट्वीटमध्ये सांगितले आहे. अद्याप या वृत्ताला शाहरुख खान किंवा एटलीने कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दुहेरी भूमिकेत दिसणार शाहरुख खान
अ‍ॅक्शनचा तडका असलेल्या 'जवान' या चित्रपटाच्या शूटिंगला 2022 मध्ये सुरुवात झाली आहे. या चित्रपटात शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नई, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. शाहरुखसह या चित्रपटात विजय सेतुपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा आणि सुनील ग्रोवर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले 'जवान'चे 10 मिनिटांच्या दृश्याचे चित्रीकरण

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीन येथील DMIC मध्ये 'जवान' या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले. या चित्रीकरणाला शाहरूख स्वतः हजर नसला तरी त्यातील अ‍ॅक्शन सीन्स येथेच चित्रीत झाले. यासाठी हॉलिवूडमधून स्टंट मास्टर छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले होते. बिडकीन येथील DMIC मध्ये 15 दिवस तब्बल 600 लोकांचे युनिट अहोरात्र कार्यरत होते. सलग 10 दिवस चित्रीकरण चालले. येथे चित्रीत झालेले 10 मिनिटांचे अ‍ॅक्शन सीन्स चित्रपटात दाखविण्यात येणार आहेत. यासाठी छत्रपती संभाजीनगरात तब्बल 30 कोटींची उलाढाल झाली. या चित्रपटामध्ये येथील 40 ते 50 स्थानिक कलावंतांनी काम केले आहे. 27 नोव्हेंबर ते 13 डिसेंबरदरम्यान हे चित्रीकरण पार पडले. साहसी दृश्यांसाठी बिडकीन डीएमआयसीतील 5.5 किमीचा 8 लेनचा मोकळा रस्ता निवडण्यात आला होता. अ‍ॅक्शन सीनसाठी 40 सेकंड हँड स्कॉर्पिओ गाड्यांचा वापर करण्यात आला. या दृश्यांसाठी या गाड्या स्फोटाने उडविण्यात आल्या. शिवाय 20 ते 25 कंटेनर आणि 20 दुचाकी भाड्याने घेण्यात आल्या होत्या.

शाहरुखचा पहिला पॅन इंडिया चित्रपट
जवळजवळ 9 महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टिझर निर्मात्यांनी रिलीज केला होता. चित्रपटाच्या टिझरमध्ये शाहरुख खानला रफ बॅकग्राउंडवर, जखमी अवस्थेत दाखवण्यात आले आहे. त्याच्या चेह-यावर पट्टी लावलेली दिसतेय. 'जवान' रेड चिलीज एंटरटेनमेंट सादर करत आहे. हा चित्रपट आधी 2 जून 2023 ला प्रदर्शित होणार होता. पण आता तो ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, हा शाहरुख खानचा पहिला पॅन इंडिया चित्रपट असणार आहे. 'जवान'सह शाहरुख यावर्षी राजकुमार हिराणी यांच्या 'डंकी' या चित्रपटातही झळकणार आहे.

बातम्या आणखी आहेत...