आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचा बादशाह अर्थातच अभिनेता शाहरुख खान सध्या चर्चेत आहे. तब्बल चार वर्षांनंतर तो मुख्य भूमिकेतून पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला पठाण हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय. पण रिलीजपूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला आहे. चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकिनीवरुन वादंग उठले आहे. त्यामुळे चित्रपटाला विरोधाचा सामना करावा लागतोय. दरम्यान रिलीजच्या अवघ्या 15 दिवसाआधी म्हणजे 10 जानेवारीला चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी विचारपूर्वक हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे चित्रपटावर टीका होत असताना दुसरीकडे मात्र शाहरुखचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच शाहरुख खानने बुधवारी ट्विटरवर "आस्क एसआरके" हे सेशन ठेवले होते. यावेळी त्याला चाहत्यांनी बरीच प्रश्ने विचारली, ज्याची शाहरुखने त्याच्या स्टाइलमध्ये उत्तरे दिली.
चाहत्याचा प्रश्न - महिन्याला किती कमावतो
एका चाहत्याने शाहरुखला त्याची महिन्याची कमाई विचारली. यावर शाहरुखने दिलेल्या उत्तराने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. एका चाहत्याने विचारले की, एका महिन्यात किती कमावतोस? यावर शाहरुख म्हणाला की, 'प्रत्येक दिवसाला अगणित प्रेम कमावतोय'. शाहरुखच्या या उत्तराची सध्या चर्चा सुरू आहे.
काश्मिरी असूनही खान आडनाव का लावतो? - चाहत्याचा सवाल
एका चाहत्याने शाहरुखला प्रश्न विचारला, 'खानसाहेब, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काश्मिरी आहे ना? तरीही तुम्ही तुमच्या नावासोबत खान का जोडता?' याचे उत्तर देताना शाहरुख म्हणाला, "संपूर्ण जग हे माझे कुटुंब आहे. कुटुंबाच्या नावामुळे नाव मोठे होत नाही, तुमच्या कामामुळे तुमचे नाव होते. कृपया अशा संकुचित विचारात अडकू नका,' असे उत्तर शाहरुखने दिले.
एका चाहत्याने, "आम्ही ‘पठाण’ हा चित्रपट पाहण्यामागे नेमका उद्देश काय?", असा प्रश्न विचारला. त्यावर शाहरुख म्हणाला, "अरे देवा ही माणसं खरच खूप खोल आहे. आयुष्याचा उद्देश काय? कशाचे प्रयोजन काय? माफ करा मी इतका खोल विचार करणारा नाही," असे त्याने उत्तर दिले.
एका चाहत्याने तर चक्क शाहरुखला रिटायरमेंट घेण्याचा सल्ला दिला. "आधीच ‘पठाण’ अत्यंत वाईट चित्रपट आहे. तू रिटायरमेंट घे," असा खोचक सवालदेखील या सेशनदरम्यान शाहरुखला विचारण्यात आला. ज्याचे अत्यंत चतुराईने शाहरुखने उत्तर दिले. तो म्हणाला, "मोठ्यांशी असे बोलायचे नसते…" त्याच्या या उत्तरावर अनेकांनी त्याला विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या सेशनदरम्यान एका चाहत्याने ऋषभ पंतसाठी शुभेच्छा देण्यास सांगितले. त्यावर शाहरुख म्हणाला की, "देवाच्या कृपेने तो लवकरच बरा होईल. तो एक फाइटर आहे."
'पठाण' हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शाहरुख शेवटच्या 2018 मध्ये आलेल्या 'झिरो' या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकला होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता. दरम्यान मधल्या काळात शाहरुख 'ब्रह्मास्त्र', 'रॉकेट्री' या चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला. शाहरुख चार वर्षांपासून एका मोठ्या हिटच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे त्याला 'पठाण'कडून बऱ्याच अपेक्षा आहेत. 'पठाण'मध्ये शाहरुखसह दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय अभिनेता सलमान खानचा चित्रपटात कॅमिओ असल्याचीदेखील चर्चा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.