आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान 'पठाण' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅकसाठी सज्ज आहे. तब्बल 4 वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुख प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शेवटचा तो झिरो या चित्रपटात दिसला होता. पण त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नव्हता. त्यामुळे त्याला आता त्याच्या आगामी चित्रपटाकडून ब-याच अपेक्षा आहेत. पण शाहरुखने हा चार वर्षांचा ब्रेक का घेतला होता, याचा उलगडा आता स्वतः त्यानेच केला आहे. मुलगी सुहानामुळे हा ब्रेक घ्यावा लागला असल्याचे त्याने सांगितले आहे.
सौदी अरबमधील जेद्दा येथे रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल सुरू आहे. या महोत्सवात गुरुवारी शाहरुख खान सहभागी झाला. त्यानंतर शाहरुखने 'डेडलाईन'ला दिलेल्या मुलाखतीत गेल्या चार वर्षांत त्याचा एकही चित्रपट का प्रदर्शित झाला नाही, याचे कारण सांगितले. मुलाखतीमध्ये शाहरुखनं सांगितलं की, 'मी गेल्या चार वर्षांत जाणीवपूर्वक कोणताही चित्रपट हाती घेतला नव्हता. त्यामागचे कारण होती सुहाना. सुहाना सिनेमाविषयक अभ्यासक्रम शिकण्यासाठी लंडनहून अमेरिकेला गेली होती. तिथे ती एकटी रहात होती. त्यामुळे तिला कधीही एकाकी वाटू शकेल, तिचा मला फोन येईल आणि ती मला तिथे बोलवून घेईल असे मला वाटायचे.'
'जर मी हाती काम घेतले तिचा मला फोन आला तर, याच विचाराने मी कोणतेही काम घेतले नाही. शेवटी न राहून मीच तिला फोन केला आणि विचारले की, 'मी आता माझ्या कामाला सुरुवात करू शकतो का?' त्यावर तिने मला विचारले, 'तुम्ही काम का करत नाही.' त्यावर मी तिला म्हटलं की, 'मला वाटले की न्यूयॉर्कला आल्यावर तुला एकटेपणा जाणवेल. मग तू मला फोन करशील आणि त्यावेळी मी तुझ्यासोबत असायला हवे.' मुलीच्या काळजीपोटी शाहरुख चार वर्षे मोठ्या पडद्यापासून दूर राहिला. पण आता एकापाठोपाठ तीन चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. पठान, जवान आणि डंकी हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. पठान हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित होतोय. त्यानंतर त्याचे आणखी दोन चित्रपट येणार आहेत.
सुहाना करतेय सिनेसृष्टीत पदार्पण
सुहाना खानदेखील झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुहानाचा हा चित्रपट 2023 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या चित्रपटात तिच्यासह बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची लेक खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.