आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेते शशी कपूर यांची आज (4 डिसेंबर) तिसरी पुण्यतिथी आहे. 4 डिसेंबर 2017 रोजी त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला. शशी कपूर यांनी 1961 मध्ये नायक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि 160 चित्रपटांत भूमिका साकारल्या. त्यांना 2011 मध्ये पद्मभूषण आणि 2015 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शशी यांचा जन्म 18 मार्च 1938 मध्ये कोलकाता येथे झाला. त्यांचे खरे नाव बलबीर राज कपूर होते. पण त्यांनी शशी कपूर या नावाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे शशी यांना हे नाव इंडस्ट्रीने नव्हे तर त्यांच्या आईनेच दिले होते. त्यांच्या आईंना बलबीर राज हे नाव पसंत नव्हते. जाणून घेऊयात, शशी कपूर यांच्या आयुष्याशी निगडीत 10 रंजक किस्से....
शशी यांच्या सावत्र आजीने त्यांना बलबीर राज कपूर हे नाव दिले होते. पंडिताच्या सांगण्यावरुन त्यांनी हे नाव ठेवले होते. शशी कपूर यांच्या मातोश्रींना या नावाची चिड होती. त्यामुळे त्या त्यांना बलबीर ऐवजी शशी या नावाने हाक मारु लागल्या. अशा प्रकारे बलबीर राज कपूर हे शशी कपूर झाले.
शशी कपूर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. अवघे कपूर घराणे त्यांना ‘अंग्रेज कपूर’ नावाने हाक मारायचे. त्याचे कारण होते शशी यांचे शिस्तबद्ध जीवन. इतकेच नाही तर शशी कपूर दिवसभरात 15 ते 18 तास शूटिंग करायचे. यामुळेच राज कपूर त्यांना ‘टॅक्सी कपूर’ नावाने बोलवायचे.
शशी कपूर एके दिवशी ‘पाप और पुण्य’च्या चित्रपटाच्या सेटवर पोहोचले. तेथे एक उंच मुलगा हातात भाला घेऊन उभा असल्याचे दिसले. ते अमिताभ बच्चन होते. त्या काळात ते धडपडत होते. शशींनी त्यांना बोलावले. म्हणाले- ‘तुम्ही चांगले अभिनेते आहात. फुटकळ कामे करू नका. सध्या तुम्ही स्ट्रगल करत आहात. शक्यतो तुमच्याकडे पैसे नसतील. असे असेल तर माझ्या कार्यालयात या. अडचणी सोडवू.’ येथूनच त्यांची मैत्री जुळली. पुढे दोघांनी अनेक चित्रपट केले. अनेक चित्रपट निर्मात्यांनाही शशी यांनी मदत केली.
शिखरावर असताना त्यांनी वेगळ्या पठडीतील चित्रपटांच्या निर्मितीची योजना आखली. यासाठी श्याम बेनेगल, गिरीश कर्नाड यांना भेटले. शशी व्हिस्कीचे शौकीन, तर बेनेगल आदी मंडळी व्होडका प्यायची. यामुळे तेही व्होडका पिऊ लागले. मी ज्यांच्यासोबत काम करतोय त्यांच्या माझ्यात समानतेची भावना असावी, हे कारण त्यामागे होते. त्यांनी जुहूत पृथ्वी थिएटर पुन्हा उभारले. नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, अनुपम खेर आदी कलाकार येथूनच उदयास आले.
शशी कपूर कुटुंबात सर्वात लहान असल्याने त्यांचे काकू-काका त्यांना नेपोलियन म्हणून हाक मारत असे. हे नाव शशी कपूर यांना मुळीच पसंत नव्हते.
अभ्यासात हुशार नसल्याचे स्वतः शशी कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले होतेत. ते दहावी नापास होते. मॅट्रीक नापास झाल्यानंतर त्यांचे वडील त्यांच्यावर रागावले नव्हते, तर त्यांनी शशी यांना पुन्हा परीक्षा देण्यास सांगितले होते. तेव्हा शशी यांनी वडिलांना म्हटले होते, की शाळेच्या कँटीनमध्ये बसून तुमचे पैसे मला वाया घालवायचे नाहीत. पृथ्वीराज कपूर त्यांच्या समजुतदारपणामुळे प्रभावित झाले होते.
1953 मध्ये शशी कपूर थिएटरसोबत जुळले होते. त्यांना पहिला पगार म्हणून 75 रुपये मिळाले होते. त्याकाळात ही मोठी रक्कम होती.
हिंदी चित्रपटांबरोबरच शशी कपूर यांनी दोन इंग्रजी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये भूमिका करणारे शशी कपूर हे पहिले भारतीय अभिनेते ठरले. त्यांनी जेम्स आइवरी ('बॉम्बे टॉकीज' आणि 'हीट एंड डस्ट') आणि स्टेफन फ्रियर्स ('सैमी' आणि 'रोजी गेट लेड') यांच्यासोबत काम केले होते.
शशी हे कपूर घराण्यातील पहिली अशी व्यक्ती होते, ज्यांनी विदेशी युवतीसोबत लग्न केले होते. पत्नी जेनिफर कँडलसोबत त्यांची पहिली भेट 1957 मध्ये झाली होती. त्यावेळी भारत दौ-यावर आलेल्या 'शेक्सपिएराना' या नाटक टीममध्ये ते सामील झाले. यादरम्यान या नाटक टीमचे संचालक मिस्टर कँडल यांची मुलगी जेनिफरसोबत त्यांनी अनेक नाटकांत काम केले. शेक्सपिअरचे मुख्य नाटक 'द टेम्पस्ट'मध्ये मिरांडाची भूमिका साकारताना जेनिफर आणि शशी यांच्यात जवळीक निर्माण झाली. 1957मध्ये शशी यांनी जेनिफर यांच्या थिएटर ग्रुपसोबत जाऊन सिंगापूरला नाटक सादर केले. यावेळी दोघांची जवळीक आणखीच वाढली. यादरम्यान शशी यांनी जेनिफर समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. उटीमध्ये एका नाटकावेळी शशी यांची वहिनी गीता बाली यांनी जेनिफरला आपली पसंती दर्शवली आणि 1958मध्ये दोघांचे लग्न झाले. लग्नाच्यावेळी शशी 20 वर्षांचे तर जेनिफर 25 वर्षांच्या होत्या.
शशी कपूर यांचे शिक्षण मुंबईतील डॉन बॉस्को स्कूलमध्ये झाले. प्रसिद्ध क्रिकेटर फारुख इंजीनियर हे शशी कपूर यांचे क्लासमेट होते. शाळेत हे दोघेही एकाच बेंचवर बसायचे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.