आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वतःच्या आत्महत्येच्या फेक न्यूजवर अध्ययनची प्रतिक्रिया:अध्ययन सुमन म्हणाला- ही बातमी ऐकून माझ्या आईला मोठा धक्का बसला, तिला काही झाले असते तर?

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अद्याप आम्ही या धक्क्यातून सावरलो नसल्याचे शेखर सुमन यांनी म्हटले आहे.

अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमनने त्याच्या आत्महत्येच्या फेक न्यूजवर प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्त वाहिनीने दोन दिवसांपूर्वी अध्ययनने आत्महत्या केल्याची खोटी बातमी दाखवली होती. या फेक न्यूजमुळे अध्ययन आणि त्याच्या कुटुंबीयांना बराच मनस्ताप सहन करावा लागला आहे. याबाबत अध्ययनचे वडील शेखर सुमन यांनी हे सर्व अतिशय निंदनीय असल्याची प्रतिक्रिया दिली होती. पण त्यानंतर आता अध्ययननेसुद्धा घडलेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया देत याबाबत आपला राग व्यक्त केला आहे. तसेच संबंधित चॅनेलवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही त्याने म्हटले आहे.

मी जिवंत आणि अगदी ठीक आहे

अध्ययन सुमनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मी जिवंत आहे आणि अगदी ठीक आहे, असे अध्ययनने म्हटले आहे. 'जर मी आत्महत्या केली असेन तर कदाचित आता माझे भूत तुमच्याशी बोलत आहे. हे सर्व खूपच निंदनीय आहे. मी त्यावेळी दिल्लीत होतो. मला लोकांचे कॉल यायला सुरुवात झाली त्यावेळी मला हे सर्व समजलं. मिटिंगमध्ये असल्याने मी अनेकांचे कॉलसुद्धा रिसीव्ह केले नव्हते.'

माझ्या आईला मोठा धक्का बसला, तिला काही झाले असते तर...
अध्ययन पुढे म्हणाला, 'माझ्या आईला या घटनेने सर्वात जास्त धक्का बसला आहे. आपल्या मुलासोबत असे काही तरी घडू शकते यावर तिचा आताही विश्वास बसत नाहीये. मी जेव्हा तिच्याशी फोनवर बोललो तेव्हा ती शांत झाली. मी स्वतः या प्रकाराने हैराण झालो आहे. तिला या घटनेमुळे काही झाले असते तर त्याला जबाबदार कोण असते? विशेषतः अशा आईवडिलांना ज्यांनी आपला एक मुलगा आधीच गमावला आहे.'

तो पुढे म्हणला, 'जर कोणत्याही आई-बाबांना आपल्या मुलाच्या आत्महत्येची बातमी अशाप्रकारे समजली तर त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावेल. ही खूपच चुकीची गोष्ट आहे आणि मी आत्महत्या केली असे लिहिण्याची या चॅनेलला का गरज पडली. मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. खूप मेहनत करत आहे. मला आत्महत्या करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीबद्दल खोटं वक्तव्य कसं करू शकता असं करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे,' अशी संतप्त प्रतिक्रिया अध्यययने दिली आहे. सोबतच कोणीही आत्महत्येसारखे चुकीच पाऊल कधीच उचलू नये, असेही तो म्हणाला आहे.

वाहिनीविरोधात कायदेशीर कारवाई करणार
यापूर्वी अध्ययनचे वडील शेखर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन लिहिले होते, 'अशाप्रकारच्या निंदनीय कृत्यासाठी मी वाहिनीविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. माध्यमांनी जबाबदारीने वागायला हवे. आपल्या स्वार्थासाठी लोकांचे आयुष्य उद्धवस्त करु नये. मी सर्व लोकांना प्रार्थना करतो की सोशल मीडिया पोस्ट शेअर करुन वाहिनीवर बंदी घालण्याची मागणी करा,' असे शेखर सुमन यांनी म्हटले होते.

एका वृत्त वाहिनीने शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमनच्या आत्महत्येची बातमी दाखवली होती. ही बातमी पाहताच कुटुंबीयांनी अध्ययनला संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. काही वेळाने अध्ययनने कुटुंबीयांशी संपर्क केल्यावर ही बातमी खोटी असल्याचे निष्पन्न झाले. पण याकाळात त्याच्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. अद्याप आम्ही या धक्क्यातून सावरलो नसल्याचे शेखर सुमन यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...