आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री शिल्पा शेट्टीला 16 वर्षांनंतर एका मोठ्या खटल्यात दिलासा मिळाला आहे. 16 वर्षांपूर्वी हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेअर याने सार्वजनिक कार्यक्रमात शिल्पाचे चुंबन घेतले होते. यावरुन मोठा वाद झाला होता. सार्वजनिक कार्यक्रमात अश्लील आणि असभ्य वर्तन केल्याप्रकरणी शिल्पावर अनेक ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. आता या प्रकरणातून शिल्पा शेट्टीला दोषमुक्त करण्याचा दंडाधिकाऱ्यांचा निर्णय सत्र न्यायालयाने सोमवारी कायम ठेवला आहे. न्यायालयाने दंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणारा अर्ज फेटाळून लावल्याने शिल्पा शेट्टी हिला दिलासा मिळाला आहे.
दंडाधिकाऱ्यांच्या या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. दंडाधिकाऱ्यांनी शिल्पाला दोषमुक्त ठरवण्यात चूक केली. तिला दोषमुक्त ठरवण्याचा निर्णय नैसर्गिक न्यायाच्या तत्वाविरोधात आहे. त्यामुळे तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी फेरविचार अर्जाद्वारे करण्यात आली होती. मात्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. सी. जाधव यांनी हा फेरविचार अर्ज फेटाळून लावला.
राजस्थानमधील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते
ही घटना 2007 मध्ये घडली होती. शिल्पा शेट्टी आणि रिचर्ड गेअर राजस्थानमध्ये आयोजित एड्स जनजागृती कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्यावेळी रिचर्डने स्टेजवरच सर्वांसमोर शिल्पाचे चुंबन घेतले होते, त्यानंतर यावरुन बराच वाद रंगला होता. आपल्यासाठीही गेअर याची कृती अनपेक्षित असल्याचे स्पष्टीकरण शिल्पाने म्हटले होते. या घटनेनंतर दोन्ही सेलिब्रिटींविरोधात देशभरात निदर्शने झाली आणि रस्त्यावर त्यांचे पुतळेही जाळण्यात आले होते.
अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला
सार्वजनिक कार्यक्रमात अश्लील आणि असभ्य वर्तन केल्याप्रकरणी शिल्पा आणि रिचर्ज यांच्यावर जयपूर, अलवर आणि गाझियाबाद येथे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. राजस्थान न्यायालयाने शिल्पा आणि गेअरविरोधात अटक वॉरंटही काढले होते. त्यानंतर हे प्रकरण राजस्थान न्यायालयाकडून मुंबई दंडाधिकारी न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. विस्तृत सुनावणीनंतर जानेवारी 2022 मध्ये शिल्पा हिला एका प्रकरणात न्यायालयाने दोषमुक्त केले होते.
शिल्पाचे आगामी प्रोजेक्ट
शिल्पा शेट्टी लवकरच रोहित शेट्टीच्या आगामी 'इंडियन पुलिस फोर्स' या वेब सिरीजमध्ये अॅक्शन अवतारात दिसणार आहे. या वेब सिरीजमध्ये तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉय हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय शिल्पाने 'केडी - द डेव्हिल' हा चित्रपट साइन केला आहे, यात ती सत्यवतीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ध्रुव सर्जा, शिल्पा शेट्टी, व्ही रविचंद्रन आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.