आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

71 वर्षांचे झाले ‘एसीपी प्रद्युम्न’:बँकेत कॅशिअर होते शिवाजी साटम, 21 वर्षे एकाच शोमध्ये केले काम, ‘एसीपी प्रद्युम्न’ बनून घराघरात निर्माण केली ओळख

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बँकेत करायचे नोकरी

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 71 वर्षे पूर्ण केली आहेत. 21 एप्रिल 1950 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. त्यांनी पिजिक्स विषयात ग्रॅज्युएशन केल्यानंतर बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये डिप्लोमा केला. छोट्या पडद्यावरील गाजलेल्या ‘सीआयडी’ या प्रसिद्ध मालिकेमुळे ते घराघरांत पोहोचले आहेत. तब्बल 21 वर्षे शिवाजी साटम या मालिकेत ‘एसीपी प्रद्युम्न’ ही व्यक्तिरेखेत दिसले. आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात त्यांच्याविषयी बरंच काही...

हा शो 21 वर्षे चालला

'सीआयडी' हा भारतीय टेलिव्हिजनवरील प्रदीर्घ आणि लोकप्रिय टीव्हीवरील टीव्ही शोजपैकी एक होता. हा शो तब्बल 21 वर्षे चालला. 21 जानेवारी 1998 रोजी हा शो सुरु झाला होता. तर त्याचा शेवटचा भाग 27 ऑक्टोबर 2018 रोजी प्रसारित झाला. नोव्हेंबर 2004 मध्ये, या शोचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले. शिवाजी साटम यांचे "दया दरवाजा तोड दो" आणि "दाल में कुछ काला है" असे संवाद खूप गाजले.

बँकेत करायचे नोकरी
शिवाजी साटम यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांसोबतच छोट्या पडद्यावरही भरपूर काम केले आहे. विशेषतः त्यांना 'सीआयडी' या मालिकेसाठी ओळखले जाते. 1998 पासून ते या मालिकेशी जुळले आहेत. अभिनय करत असतानाच दुसरीकडे ते बँकेतही नोकरी करत असल्याचे क्वचितच लोकांना ठाऊक असावे. साटम यांनी 2000 पर्यंत नोकरी केली. खंर तर चित्रीकरण आणि नोकरी या गोष्टीत ताळमेळ घालणे त्याला प्रचंड कठीण जात असे. पण तरीही त्याने आपली नोकरी सोडली नाही. याविषयी एका मुलाखतीत शिवाजी साटम यांनी सांगितले होते, "मी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अनेक वर्षं काम करत होतो. नोकरी सांभाळून मी अभिनयक्षेत्रात कार्यरत होतो. बँकेतील माझ्या सहकाऱ्यांनी आणि वरिष्ठांनी मला खूपच समजून घेतले. चित्रीकरणामुळे बँकेत जाणे शक्य नसल्यास मी एकदम सकाळी अथवा रात्री उशिरा बँकेत जाऊन माझी कामं पूर्ण करत असे. पण कधीच कोणीही या गोष्टीवर आक्षेप घेतला नाही. त्याचमुळे मी 2000 पर्यंत नोकरी करू शकलो. पण नंतर माझी पत्नी खूप आजारी पडली. तिच्या आजारपणामुळे आणि मालिकेच्या चित्रीकरणामुळे मला नोकरीला जाणे शक्य होतच नव्हते. सतत होत असलेल्या दांड्यामुळे मला बँकेकडून पत्र आले. आता आपल्याला नोकरी करणे जमणार नाही याची मला जाणीव झाल्याने मी राजीनामा दिला."

अशी मिळाली होती ‘सीआयडी’ मालिका
शिवाजी साटम यांनी एका मुलाखतीवेळी त्यांच्या ‘सीआयडी’ मालिकेतील ‘एसीपी प्रद्युम्न’ही भूमिका कशी मिळाली होती, याचा उलगडा केला होता. त्यांनी सांगितल्यानुसार, सीआयडी या मालिकेचे निर्माते बी. पी. सिंग आणि शिवाजी साटम हे अनेक वर्षांपासूनचे मित्र आहेत. त्या दोघांनी 'एक शून्य शून्य' या मराठी मालिकेत देखील एकत्र काम केले होते. त्यांच्या या मैत्रीमुळेच शिवाजी साटमच एसीपी प्रद्युमन या भूमिकेसाठी योग्य असल्याचे बी. पी. सिंग यांना वाटत होते आणि त्यामुळे त्यांना शिवाजी साटम यांना या मालिकेविषयी विचारले आणि त्यांनी देखील लगेचच या मालिकेत काम करण्यास होकार दिला. 'एक शून्य शून्य' या मराठी मालिकेतही शिवाजी साटम पोलिसाची भूमिका साकारत होते.

शिवाजी साटम यांना एक मुलगा असून अभिजीत साटम हे त्याचे नाव आहे. अभिजीतचे लग्न अभिनेत्री मधुरा वेलणकरसोबत झाले आहे. विशेष म्हणजे शिवाजी साटम यांच्याप्रमाणेच त्यांचा मुलगा आणि सून हे दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत असून मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे आहेत. मधुराने छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावरही काम केले आहे. शिवाजी साटम एका नातवाचे आजोबा आहेत. मधुरा आणि अभिजीत यांना एक मुलगा असून युवान हे त्याचे नाव आहे. शिवाजी साटम यांच्या सूनबाई मधुरा वेलणकर ही अभिनेते प्रदीप वेलणकर यांची कन्या आहे. या नात्याने प्रदीप वेलणकर आणि शिवाजी साटम हे दोघे व्याही आहेत. अभिजीत साटम आणि मधुरा वेलणकर यांचा प्रेमविवाह आहे.

उडाली होती शिवाजी साटम यांच्या मृत्यूची अफवा
काही वर्षांपूर्वी शिवाजी साटम यांच्या मृत्यूची अफवा उडाली होती. शिवाजी साटम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त वा-यासारखे पसरले होते. त्यामुळे शिवाजी साटम आणि त्यांच्या कुटुंबीयांना बराच मनस्ताप सहन करावा लागला होता. "माझी सीआयडी ही मालिका संपणार आहे. मालिका संपण्यापूर्वी माझा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात येणार आहे. तसेच खऱ्या आयुष्यात माझे निधन झाले आहे अशा बातम्या जवळजवळ 4-5 दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर फिरत आहेत. या ऐकून आता मलाच कंटाळा आला आहे. अशाप्रकारच्या अफवा पसरून कोणाला आनंद मिळतो हेच मला कळत नाही. या अफवांमुळे माझे नातलग आणि फ्रेंड्सचे सतत फोन येत आहेत. या अशा अफवांमुळे माझ्या जवळच्या लोकांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. माझी तब्येत पूर्णपणे चांगली असून माझ्याबाबतीत अशा अफवा कोणीही पसरवू नयेत असे मी माझ्या फॅन्सना सांगेन'', असे शिवाजी साटम यांनी त्यावेळी म्हटले होते.

हिंदीतील गाजलेले चित्रपट
हिंदीत शिवाजी साटम यांनी वास्तव, गुलाम-ए-मुस्तफा, यशवंत, नायक, टॅक्सी नंबर 9211, चायना गेट यांसह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

बातम्या आणखी आहेत...