आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी आज (7 फेब्रुवारी) साताजन्माच्या गाठीत अडकणार आहेत. 'शेरशाह' या चित्रपटात एकत्र काम करत असताना दोघांचे सूत जुळले आणि काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर आता दोघे लग्न करत आहेत. सहायक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात करणारा सिद्धार्थ मल्होत्रा आत बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आहे. तर कियारानेदेखील अल्पावधीतच इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. जाणून घेऊया सिद्धार्थ आणि कियाराच्या पार्श्वभूमीविषयी...
सर्वप्रथम जाणून घेऊया सिद्धार्थ मल्होत्राविषयी...
मुळचा दिल्लीचा आहे सिद्धार्थ
सिद्धार्थ मल्होत्रा हा मुळचा दिल्लीचा आहे. त्याच्या कुटुंबात त्याचे आईवडील, थोरला भाऊ हर्षद, वहिनी पूर्णिमा आणि एक पुतण्या आहे. सिद्धार्थ हा नॉन फिल्मी बॅकग्राऊंड असलेल्या कुटुंबातून आला आहे.
छोट्या पडद्यावरुन केले पदार्पण
सिद्धार्थने वयाच्या 16 व्या वर्षी 'धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान' या टीव्ही मालिकेतून करिअरला सुरुवात केली. त्याने पृथ्वीराज चौहान यांचा भाऊ जयचंदची भूमिका साकारली होती. वयाच्या 18 व्या वर्षी सिद्धार्थ मॉडेलिंगकडे वळला. 2010 मध्ये आलेल्या 'माय नेम इज खान' या चित्रपटासाठी तो करण जोहरचा सहाय्यक दिग्दर्शक होता.
करण जोहरनेच त्याला त्याच्या धर्मा प्रोडक्शनच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून करिअरचा मोठा ब्रेक दिला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला. त्यानंतर सिद्धार्थने मागे वळून पाहिले नाही. 2014 मध्ये तो 'हसी तो फसी' या कॉमेडी-ड्रामात झळकला. त्यानंतर एक व्हिलन, कपूर अँड सन्स या चित्रपटात त्याने काम केले. कारगिल युद्धावर आधारित सिद्धार्थचा नुकताच प्रदर्शित झालेला 'शेरशाह' हा चित्रपट हिट ठरला होता. 'शेरशाह'मध्ये कियारा देखील लीड रोलमध्ये होती. दोघांच्या अभिनयाची आणि बाँडिंगची खूप प्रशंसा झाली होती.
बिझनेस फॅमिलीतून आहे कियारा
कियाराचा जन्म एका सिंधी कुटुंबात झाला. कियारा तिच्या आईच्या कुटुंबामुळे अनेक सेलिब्रिटींशी संबंधित आहे. अभिनेते अशोक कुमार आणि सईद जाफरी हे तिचे आजोबा आहेत. तर मॉडेल शाहीन जाफरी ही तिची मावशी आहे. तिच्या आईची सावत्र आई भारती गांगुली ही अभिनेता अशोक कुमार यांची मुलगी आहे.
कियाराचे वडील जगदीप अडवाणी हे बिझनेसमन आहेत. तर आई शिक्षिका आहेत. कियाराला एक धाकटा भाऊ असून मिशाल हे त्याचे नाव आहे.
कियाराचे खरे नाव आलिया
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी कियाराने सलमान खानच्या सांगण्यावरुन स्वतःचे नाव बदलले. कियाराचे खरे नाव आलिया आहे. मात्र बॉलिवूडमध्ये आधीपासूनच आलिया नावाची एक स्टार आहे. त्यामुळे सलमानने तिला नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. कियारा या नावाची निवड प्रियांका चोप्राच्या अंजाना अंजानी चित्रपटातील कियारा या व्यक्तिरेखेपासून प्रेरित आहे. कियाराला लहान मुलांना शिकवण्याची आवड होती. म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिने तिच्या आईच्या शाळेत शिक्षिका म्हणूनही काम केले.
2014 मध्ये करिअरची सुरुवात
कियाराने 2014 मध्ये 'फगली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती मोहित मारवाहसोबत झळकली होती. 2016 मध्ये 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'मध्ये कियाराने धोनीची पत्नी साक्षीची भूमिका साकारली होती. 2019 मध्ये आलेला 'कबीर सिंग' हा चित्रपच खूप गाजला होता. याशिवाय भूल भुलैया- 2, गुड न्यूज आणि जुग जुग जिओ हे कियाराचे हिट चित्रपट आहेत.
दोघांनी आपले प्रेम जगापासून लपवले
कियारा-सिद्धार्थने कधीही चाहत्यांसमोर आपले प्रेम व्यक्त केले नाही. दोघांकडूनही लग्नाची घोषणा करण्यात आली नव्हती. 'शेरशाह' या चित्रपटाच्या सेटवर दोघांचे प्रेम फुलले. मात्र त्यांनी आपले नाते अधिकृत केले नाही.
मात्र, 2020 मध्ये जेव्हा ते आफ्रिकेत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या नात्याची चर्चा रंगू लागली. यानंतर, 2021 मध्ये कियाराने सिद्धार्थच्या आई-वडिलांना तिच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले. त्यानंतर दोघांचे आईवडील एकमेकांना भेटले. आणि आता दोघे साताजन्माच्या गाठीत अडकत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.