आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडमध्ये आपल्या सुरेल आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे गायक उदित नारायण यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 67 वर्षे पूर्ण केली आहेत. उदित यांनी हिंदीशिवाय तामिळ, मल्याळम, कन्नड, बंगाली आणि भोजपूरीसह विविध भाषांमध्ये जवळपास 15 हजार गाणी गायली आहेत. चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावी करणा-या उदित नारायण यांचा जन्म 1 डिसेंबर 1955 रोजी बिहारच्या सुपौला जिल्ह्यात झाला होता. उदित नारायण त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे वादात अडकले आहेत. त्यांनी दोन लग्न केले. त्यांच्या दुस-या लग्नावरुन बराच गोंधळ उडाला होता. जाणून घेऊया त्यावेळी नेमके काय झाले होते आणि त्यांच्याविषयी बरंच काही...
उदित नारायण यांचे संपूर्ण नाव उदित नारायण झा आहे. त्यांच्या वडिलांचे नाव किशना झा आणि आईचे नाव भुवनेश्वरी झा आहे. उदित यांनी पी. बी. शाळेतून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी रेडिओ नेपाळमध्ये मॅथिली आणि नेपाळी गाणे गाऊन करिअरची सुरुवात केली. उदित यांची गायन करिअरची सुरुवात 'सिंदूर' या नेपाळी गाण्याने केली होती. 1978 मध्ये ते मुंबईला आले. 1980 मध्ये त्यांनी पहिल्यांदा एका चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. मात्र त्यांना 10 वर्षे मोठा संघर्ष करावा लागला होता. त्यांना खरी ओळख 'कयामत से कयामत तक' या चित्रपटामधून मिळाली. या चित्रपटातील 'पापा कहते है बडा नाम करेगा' गाण्यासाठी त्यांना पहिल्यांदा उत्कृष्ट गायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
दुस-या लग्नावरुन झाला होता गोंधळ
मीडिया रिपोर्ट्सनुसार, उदित नारायण यांनी 1984 मध्ये बिहारमध्ये रंजना नावाच्या महिलेशी लग्न केले होते. त्यावेळी उदित नारायण हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव नव्हते आणि त्यांना बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात करायची होती. अशा परिस्थितीत ते पत्नीला सोडून मुंबईत आले. मुंबईत उदित यांची एअर होस्टेस दीपा गहतराजशी भेट झाली आणि दोघेही प्रेमात पडले. दोघांनी 1985 मध्ये लग्न केले आणि त्यांना एक मुलगा आदित्य नारायण आहे, जो सूत्रसंचालक आणि पार्श्वगायकदेखील आहे.
उदित नारायण यांच्या दुसऱ्या लग्नाविषयी जेव्हा पहिली पत्नी रंजना यांना कळले तेव्हा त्यांनी उदित आपला नवरा असल्याचा दावा केला होता. मात्र उदित यांनी हे नाकारले होते. यानंतर रंजना यांनी न्यायालयात जाऊन फोटो आणि कागदपत्रे दाखवली, त्यानंतर उदित यांनी लग्न केल्याचे मान्य केले होते. त्यांना त्यांच्या दोन्ही पत्नींसोबत रहावे लागेल असा आदेश न्यायालयाने तेव्हा दिला होता.
पुरस्कारांची रेलचेल
उदित नारायण यांना 2009मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवले होते. आपल्या आवाजासाठी त्यांना तीनवेळा उत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सोबतच त्यांना फिल्मफेअर बेस्ट सिंगरचे 5 पुरस्कार मिळाले. त्यांना हे पुरस्कार 'कयामत से कयामत तक', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'राजा हिंदुस्तानी', 'हम दिल दे चुके सनम', 'लगान'सारख्या सुपरहिट चित्रपटांसाठी मिळाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.