आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा:ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोबाला यांचे निधन, तब्बल 900 चित्रपटांत केला अभिनय

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी आहे. कोरिओग्राफर चैतन्य यांच्या आत्महत्येनंतर आता तमिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक मनोबाला यांचे निधन झाले आहे. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन आठवड्यांपासून ते यकृताशी संबंधित आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी उषा आणि मुलगा हरीश आहे. मनोबाला यांच्या निधनानंतर तमिळ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

दोन आठवड्यांपासून आजारी होते मनोबाल
गेल्या दोन आठवड्यांपासून मनोबाल हे आजारी होते. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मनोबल यांच्यावर चेन्नईमध्ये अंत्यसंस्कार केले गेले. ते विनोदी भूमिकांसाठी ओळखले जायचे. त्यांनी 35 वर्षांच्या करिअरमध्ये 900 हून अधिक चित्रपटांत काम केले.

कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली
मनोबाला यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक अभिनेते आणि दिग्दर्शक श्रद्धांजली वाहताना दिसत आहे. ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत, अभिनेता-दिग्दर्शक जीएम कुमार, रमेश बाला यांच्यासह अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेते रजनीकांत यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे.

25 चित्रपटांचे केले दिग्दर्शन
मनोबाला यांना विनोदासाठी ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत तब्बल 900 चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका साकारल्या. मनोबाला यांनी 1979 मध्ये भारतीराजा यांच्या ‘पुथिया वरपुगल’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी अनेक चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या.

मनोबाला यांनी 1982 मध्ये 'अगया गंगाई'मधून दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यांनी जवळपास 25 चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘पिल्लई निला’, ‘ओरकावलन’, ‘एन पुरुषांथन एनाक्कू मट्टुमथन’, ‘करुप्पू वेल्लई’, ‘मल्लू वेट्टी मायनर’ आणि ‘परंबरियम’ या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते.

मनोबाला यांनी काही मालिकांमध्ये देखील काम केले तसेच त्यांनी अनेक टीव्ही शोचे दिग्दर्शनही केले होते. 2022 मध्ये 'कुकू विथ कोमली' मध्ये त्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला. काजल अग्रवालसोबतचा 'घोस्टी' हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.