आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवीन बाबींची 68वी बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी:वेड्यांच्या इस्पितळात हसत घालवला होता दिवस; अनेक अफेअरनंतरही पडल्या होत्या एकाकी, 3 दिवस मृतदेह घरात पडून होता

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया कसा होता त्यांचा प्रवास -

दीवार, अमर अकबर अँथनी, सुहाग, काला पत्थर, द बर्निंग ट्रेन, शान आणि कालिया यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेल्या परवीन बाबी आज हयात असत्या तर त्यांनी वयाची 68 वर्षे पूर्ण केली असती. 70 च्या दशकात जेव्हा अभिनेत्री सलवार सूट आणि साडी नेसून काम करताना दिसायच्या तेव्हा परवीन बाबी यांनी त्यांची बोल्ड स्टाईल दाखवली. परवीन बाबी यांनी जवळ जवळ तीन दशकं मोठ्या पडद्यावर राज्य केले. पण त्यांनी ज्या वेगाने यश मिळवले, तेवढ्याच लवकर त्या अज्ञातवासात गेल्या. एकेदिवशी त्या सेटवरुन अचानक गायब झाल्यानंतर त्यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचे म्हटले गेले होते. ​​​​​​

परवीन यांचे नाव डॅनी डेन्झोंग्पा, महेश भट्ट, कबीर बेदी यांच्यासोबत जोडले गेले. परंतु त्यांची मानसिक स्थिती बिघडली आणि त्यांनी स्वतःला लोकांपासून दूर केले. परवीन यांची प्रकृती इतकी बिघडली की, जेव्हा त्यांना न्यूयॉर्कच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वतःची ओळख सिद्ध करता आली नाही, तेव्हा त्यांची रवानगी वेड्यांच्या इस्पितळात करण्यात आली आणि तिथे त्यांनी हसत हसत दिवस घालवला. शेवटच्या दिवसांमध्ये तर परवीन यांना लोकांकडून आपल्या जीवाला धोका आहे, असा भास होऊ लागला. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया कसा होता त्यांचा प्रवास -

वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांना गमावले
परवीन बाबी यांचा जन्म 4 एप्रिल 1954 रोजी जुनागढ, गुजरात येथे वली मोहम्मद खान यांच्या घरी झाला. आईवडिलांच्या लग्नाच्या 14 वर्षांनंतर परवीनचा जन्म झाला होता. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. अहमदाबादमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर परवीन यांनी मॉडेलिंगला सुरुवात केली. बोल्ड परवीन कॉलेजच्या दिवसात सिगारेट ओढायच्या. असे म्हटले जाते की, परवीन यांना सिगारेट ओढताना पाहून बी.आर यांनी ठरवले की परवीन यांना त्यांच्या चित्रपटाची नायिका करायचे.

परवीन यांना 1973 मध्ये आलेला 'चरित्र' हा चित्रपट मिळाला. हा चित्रपट फ्लॉप ठरला, पण परवीन यांना एकामागून एक अनेक चित्रपट मिळाले. त्यांनी मजबूर (1974), दीवार (1975) सारखे डझनभर हिट चित्रपट दिले.

परवीन बाबी यांचा जन्म गुजरातमधील जुनागढ येथे झाला.
परवीन बाबी यांचा जन्म गुजरातमधील जुनागढ येथे झाला.

जेव्हा परवीन अचानक सेटवरून गायब झाल्या
1983 मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान परवीन अचानक सेटवरून गायब झाल्या होत्या. त्या नेमक्या कुठे आहेत, हे कुणालाच समजले नाही. यादरम्यान, परवीनवर अंडरवर्ल्डच्या लोकांची नजर होती आणि त्यांनीच तिला गायब केले, अशी चर्चा रंगली होती. अभिनेत्रीचे अनेक चित्रपट तिच्या अनुपस्थितीत प्रदर्शित झाले. 6 वर्षांनंतर परवीन मुंबईत परतल्या आणि त्यांनी अध्यात्मासाठी इंडस्ट्री सोडल्याचे स्पष्ट केले.

अध्यात्मासाठी मनोरंजन क्षेत्र सोडले.
अध्यात्मासाठी मनोरंजन क्षेत्र सोडले.

वादात राहिले अफेअर्स
परवीन बाबी यांचे इंडस्ट्रीतील पहिले अफेअर डॅनी डेन्झोंग्पासोबत होते. दोघे 4 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर परवीन कबीर बेदीसोबतही रिलेशनशिपमध्ये होत्या, पण हे नातेदेखील फार काळ टिकले नाही. 1977 च्या सुमारास परवीन महेश भट्ट यांच्या प्रेमात पडल्या. महेश आधीच विवाहित होते आणि इंडस्ट्रीत संघर्ष करत होते, तर परवीन त्यावेळी एक यशस्वी अभिनेत्री होत्या.

डॅनी डेन्झोंग्पा, कबीर बेदी आणि महेश भट्ट यांच्यासोबत होते अफेअर
डॅनी डेन्झोंग्पा, कबीर बेदी आणि महेश भट्ट यांच्यासोबत होते अफेअर

परवीन यांना पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया नावाचा असाध्य आजार झाला होता. त्यांचे मानसिक संतुलन हळूहळू ढासळू लागले. महेश यांना पत्नीला सोडून परवीनसोबत संसार थाटायचा होता. पण त्यांच्या आजारपणामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. महेश यांनी त्यांना परदेशातील अनेक प्रसिद्ध डॉक्टरांकडे नेले, पण काही उपाय सापडला नाही.

परवीन यांना बेड्या बांधून मनोरुग्णालयात पाठवण्यात आले

1984 मध्ये परवीन बाबी यांना न्यूयॉर्क विमानतळावर पोलिसांनी पकडले आणि मनोरुग्णालयात पाठवले. विमानतळावर परवीन विचित्र वागत होत्या, सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्यांची चौकशी केली असता, त्या स्वतःची ओळख सांगू शकल्या नाही. त्यांना बेड्या घालून मनोरुग्णालयात बंद करण्यात आले. माहिती मिळताच इंडियन काउन्सिल त्यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा परवीन हसत होत्या. जणू काही घडलेच नाही.

परवीन यांनी अनेक प्रसिद्ध लोकांवर गंभीर आरोप केले होते.
परवीन यांनी अनेक प्रसिद्ध लोकांवर गंभीर आरोप केले होते.

भीतीच्या छायेत आयुष्य जगत होत्या परवीन बाबी
1988 मध्ये 'शान' चित्रपटाच्या शीर्षक गीताच्या शूटिंगदरम्यान परवीन यांनी अचानक शूटिंग थांबवले होते. भीतीपोटी त्यांनी सेटवर झुंबराखाली उभे राहण्यास नकार दिला होता. परवीन यांनी त्यांचे को-स्टार अमिताभ बच्चन यांच्यावर जीवे मारण्याचा आरोप केला होता. परवीन यांचे हे गंभीर आरोप ऐकून सर्वांनाच धक्का बसला, पण त्यांची मानसिक स्थिती कोणापासून लपून नव्हती. शूटिंग थांबले आणि परवीन घरी गेल्या.

अमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप केले होते
1989 मध्ये एका फिल्म मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत परवीन म्हणाल्या होत्या, अमिताभ बच्चन हे आंतरराष्ट्रीय गुंड आहेत. त्यांनी माझे अपहरण करून एका बेटावर नेले होते, असे त्या म्हणाल्या होत्या. एवढंच नाही तर अमिताभ यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून उजव्या कानाखाली ट्रान्समीटर किंवा चिप लावली आहे असेही त्या म्हणाल्या होत्या. हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेले होते, पण जेव्हा परवीन यांना पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया झाल्याचे निदान झाले तेव्हा सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले.

परवीन लोकांना शत्रू समजू लागल्या
परवीन यांनी बिल क्लिंटन, प्रिन्स चार्ल्स, यूएस सरकार, भाजप सरकार, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक प्रतिष्ठित लोकांविरोधात गुन्हा दाखल केला. या लोकांना आपल्याला जीवे मारायचे आहे, असे परवीन यांनी म्हटले होते. पुराव्याअभावी कोर्टाने सर्व खटले बंद केले.

शेवटचे दिवस एकटेपणात घालवले
लोक परवीन यांना वेडे समजू लागले आणि त्यांच्यापासून दुरावले. लवकरच परवीन महेश भट्ट यांच्यावरही संशय घेऊ लागल्या. कालांतराने हे नातेही तुटले. परवीन मुंबईतील त्यांच्या पेंटहाऊसमध्ये एकट्याच राहू लागल्या. त्यांनी लोकांना भेटणे बंद केले.

भुकेने झाला गूढ मृत्यू
परवीन बाबी यांचा मृत्यू 22 जानेवारी 2005 रोजी त्यांच्या राहत्या घरी झाला. त्यांच्या घराबाहेर अनेक दिवस वृत्तपत्रे आणि दुधाच्या पिशव्या पाहून त्यांच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले होते. माहिती मिळताच पोलिसांनी दरवाजा तोडला आणि घरात परवीन यांचा मृतदेह सापडला. परवीन यांचा मृत्यूचे कारण एकटेपणा असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना घरात सर्व सामान अस्ताव्यस्त दिसले आणि पलंगाजवळ एक व्हिलचेअर आढळून आली.

शवविच्छेदनानंतर असे आढळून आले की, परवीन यांनी अनेक दिवसांपासून अन्न सोडले होते, मात्र शरीरात दारु आढळून आली. व्हीलचेअर पाहून अंदाज आला की, परवीन यांना शेवटच्या दिवसांत चालता येत नव्हते, त्यामुळे त्यांना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागायचा.

परवीन यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली
परवीन बाबी यांनी शेवटच्या काळात ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. आपले अंतिम संस्कार ख्रिश्चन रितीरिवाजानुसार व्हावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती, पण तसे होऊ शकले नाही. मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या परवीनच्या कुटुंबाने त्यांच्या मृतदेहावर दावा केला आणि मुंबईतील सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांची दफन विधी करण्यात आली. काही वर्षांनी जागा कमी पडल्याने त्यांचे पार्थिव नवीन ठिकाणी हलवण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...