आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Suchitra Sen Birth Anniversary: When Her Fils Get Flopped She Herself Imprisoned In The Room For 36 Years, Appeared Only Once, Did Not Show Her Face Even After Death

सुचित्रा सेन यांची 91 वी जयंती:चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर 36 वर्षे स्वत:ला खोलीत कैद करुन ठेवले, फक्त एकदाच दिसल्या सार्वजनिक ठिकाणी, मृत्यूनंतरही कुटुंबीयांनी दाखवला नव्हता चेहरा

लेखक: इफत कुरेशी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुचित्रा सेन यांच्या जीवनाशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी -

सुचित्रा सेन... बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव, जे बॉलिवूडमध्येही गाजले. सुचित्रा सेन यांची लोकप्रियता एवढी होती की, सत्यजीत रे आणि राज कपूर त्यांना आपल्या चित्रपटात घेण्यास उत्सुक असायचे. पण छोट्या छोट्या गोष्टींवरुन सुचित्रा यांनी त्यांच्या चित्रपटांना नकार दिला. करिअरमधील एकूण 61 चित्रपटांपैकी त्यांनी 6 चित्रपट हिंदीत केले, बाकीचे बंगाली चित्रपट होते. सुचित्रा यांना हिरोपेक्षा जास्त मानधन मिळत असे, यावरुनच त्यांच्या स्टार पॉवरचा अंदाज लावता येतो.

पती आणि सासरच्या मंडळींच्या मदतीने त्या चित्रपटात आल्या, पण या चित्रपटांनीच त्यांना पतीपासून दूर नेले. यशोशिखरावर असताना त्यांनी पती आणि घराकडे एवढे दुर्लक्ष केले की, त्यांच्या पतीला दारुचे व्यसन जडले. एक वेळ अशी आली की, त्यांचे पती त्यांना सोडून अमेरिकेला निघून गेले. त्यानंतर 1978 मध्‍ये सुचित्रा यांचा 'प्रनोय पाशा' हा चित्रपट फ्लॉप झाला आणि एका फ्लॉपमुळे त्यांनी चित्रपटसृष्टी सोडली. सुचित्रा यांनी एका छोट्या खोलीत स्वतःला कैद करुन घेतले. 1978 ते 2014 दरम्यान, त्या फक्त एकदाच सार्वजनिकपणे दिसली, 36 वर्षे त्यांनी स्वत:ला कोंडून घेतले होते.

त्या त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या तरी त्यांचा चेहरा कापडाने झाकलेला असायचा. 2005 मध्ये त्यांनी दादासाहेब फाळके पुरस्कारही नाकारला होता, कारण त्यांना कार्यक्रमाला हजर राहायचे नव्हते. 1978 ते 2012 दरम्यान, त्या फक्त बेलूर येथील रामकृष्ण मिशन आश्रमात गेल्या होत्या, परंतु तिने देखील त्यांनी काळ्या किंवा पांढर्‍या कपड्याने चेहरा झाकला होता. इतकेच नाही तर 2014 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा चेहरा कोणालाही दाखवला गेला नाही.

आज त्यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी जाणून घेऊया-

वयाच्या 15 व्या वर्षी झाले होते लग्न
6 एप्रिल 1931 रोजी जन्मलेल्या सुचित्रा यांचे वडील मुख्याध्यापक आणि आई गृहिणी होत्या. स्वातंत्र्यलढ्यात सुचित्रा यांचे कुटुंब बांगलादेशातील सिराजगंज येथून पश्चिम बंगालमध्ये आले होते. येथे सुचित्रा यांचा विवाह 1947 मध्ये वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी दिबानाथ सेन यांच्याशी झाला, ते एक यशस्वी उद्योगपती होते.वयाच्या 16 व्या वर्षी सुचित्रा यांनी मुलगी मुनमुन सेनला जन्म दिला, ती देखील एक यशस्वी अभिनेत्री आहे.

सुचित्रा चित्रपटात कशा आल्या?
सुचित्राला अभिनयात रस होता. पती आणि सासरच्या मंडळींच्या मदतीनेच सुचित्रा चित्रपटात आल्या होत्या, पण यशस्वी ठरल्यानंतर करिअरमुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वितुष्ठ आले. लग्नाच्या 4 वर्षानंतर सुचित्रा यांनी शेष कोथाए या चित्रपटात काम केले, पण हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्याच्या पुढच्या वर्षी सुचित्रा यांनी उत्तम कुमार यांच्यासह शारे चौत्तर या चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट आणि दोघांची ऑनस्क्रीन जोडी खूप गाजली. ही एक आयकॉनिक जोडी बनली. 20 वर्षे त्यांची जोडी गाजली होती.

सुचित्रा यांनी त्यांच्या करिअरमधील 61 पैकी 30 चित्रपटांमध्ये उत्तम कुमार यांच्यासोबत काम केले होते. त्या बंगाली चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्री ठरली होत्या.

1955 मध्ये आलेल्या 'देवदास' या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. इंदिरा गांधींवर तयार झालेल्या 'आंधी' या चित्रपटात सुचित्रा यांनी संजीव कुमार यांच्यासोबत काम केले होते. हा चित्रपट वादात सापडला होता, पण सुचित्रा यांना चांगलीच पसंती मिळाली होती. सुचित्रा यांनी एकूण 61 चित्रपटांमध्ये काम केले त्यापैकी फक्त 6 हिंदी चित्रपट होते, देवदास, आंधी, बॉम्बे का बाबू, ममता, सरहद आणि चंपाकली. इतर सर्व चित्रपट बंगाली होते.

अनेक बड्या चित्रपट निर्मात्यांचे चित्रपट नाकारले
सुचित्रा सेन अतिशय स्वाभिमानी होत्या आणि क्षुल्लक कारणांसाठी त्या मोठमोठ्या ऑफर्स नाकारायच्या, असे म्हटले जाते. 70 च्या दशकात एकीकडे प्रत्येक अभिनेत्रीला राज कपूर यांच्यासोबत काम करायचे होते, तर दुसरीकडे मात्र सुचित्रा यांनी त्यांचा चित्रपट नाकारला होता. आपल्या एका चित्रपटाची ऑफर घेऊन राज कपूर सुचित्रा यांच्याकडे पोहोचले होते. त्यांच्यासाठी राज कपूर यांनी फुले आणली होती, परंतु राज कपूर यांची फुले देण्याची पद्धत सुचित्रा यांना आवडली नाही आणि त्यांनी चित्रपटासाठी नकार दिला. सत्यजित रे यांनाही सुचित्रा यांच्यासोबत देवी चौधरानी हा चित्रपट बनवायचा होती, पण सुचित्रा यांनी चित्रपट नाकारल्यानंतर सत्यजित रे यांनी हा चित्रपट बनवलाच नाही.

यशोशिखरावर पोहोचल्यानंतर वैवाहिक जीवनात निर्माण झाली तेढ
सुचित्रा सेन चित्रपटांमध्ये एवढ्या व्यस्त झाल्या की, त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होऊ लागल्या. त्या पती आणि घराला वेळ देऊ शकत नव्हत्या. पती दिबानाथ यांना दारुचे व्यसन जडले. दोघांमधील मतभेद वाढतच गेले. अखेरीस दिबानाथ त्यांना सोडून अमेरिकेला निघून गेले, तिथेच 1970 मध्ये त्यांचे निधन झाले. 1978 मध्ये जेव्हा सुचित्रा यांचा 'प्रनोय पाशा' हा चित्रपट फ्लॉप झाला तेव्हा सुचित्राने अचानक फिल्मी जग सोडले. यावेळी सुचित्रा राजेश खन्ना यांच्यासोबत ‘नाती बिनोदिनी’मध्ये काम करत होत्या, पण त्यांनी अचानक फिल्मी दुनियेतून काढता पाय घेतल्याने हा चित्रपट मध्येच थांबला.

जगाच्या नजरेतून गायब झाल्या सुचित्रा
चित्रपटसृष्टीला रामराम ठोकल्यानंतर सुचित्रा गायबच झाल्या. त्यांनी स्वतःला एका छोट्याशा खोलीत कोंडून घेतले, जिथे त्या एका छोट्या बेडवर झोपायच्या. सुचित्रा यांच्या कुटुंबीयांनाही त्यांना भेटण्याची परवानगी नव्हती. इतकेच नाही तर त्यांनी त्यांच्या खोलीतून बाहेर पडणेदेखील बंद केले. रामकृष्ण आश्रमाचे भरत महाराज यांच्याशी संपर्क साधून सुचित्रा यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला होता.

केवळ एकदाच दिसल्या होत्या
सुचित्रा केवळ एकदाच सार्वजनिक ठिकाणी दिसल्या होत्या. भरत महाराजांच्या निधनानंतर बेलूर मठात त्या अनवाणी आल्या होत्या. सुचित्रा यांची नात रायमा सेन सांगते की, तिची आजी कधी कधीच खोलीतून बाहेर पडायची, पण यावेळीदेखील तिच्या चेहऱ्याचा तीन-चतुर्थांश भाग कापडाने झाकलेला असायचा.

दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारण्यास दिला होता नकार
2005 साली सुचित्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते, पण सुचित्रा यांनी घराबाहेर पडण्यास नकार दिला होता. पुरस्कार द्यायचा असेल तर घरी यावे लागेल, असे सुचित्रा म्हणाल्या होत्या. शेवटी त्या समारंभाला पोहोचल्या नाही आणि पुरस्कारही मिळाला नाही. सुचित्रा यांना मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सात पाके बधा' या चित्रपटासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवणा-या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या.

निधनानंतरही दिसली नाही अखेरची झलक
फुफ्फुसाच्या संसर्गामुळे सुचित्रा यांना 24 जानेवारी 2013 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेही त्यांना लपवून ठेवण्यात आले होते. महिनाभराच्या उपचारानंतर 17 जानेवारी 2014 रोजी सकाळी 8.25 वाजता सुचित्रा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या गोपनीयतेचा आदर करत अंत्यसंस्काराच्या वेळीही त्यांचा चेहरा झाकून ठेवण्यात आला होता. सुचित्रा यांना त्यांच्या निधनानंतर त्याचवर्षी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

2014 मध्ये निधनानंतरदेखील सुचित्रा सेन यांचा चेहरा कुणीही बघू नये म्हणून त्यांचे पार्थिव शवपेटीत ठेवण्यात आले होते. त्यांचीही हीच इच्छा होती, त्यामुळे त्यांच्या इच्छेचा मान राखून मृत्यूनंतरही त्यांचा चेहरा दाखवला गेला नाही, असे कुटुंबीयांचे म्हणणे होते.
2014 मध्ये निधनानंतरदेखील सुचित्रा सेन यांचा चेहरा कुणीही बघू नये म्हणून त्यांचे पार्थिव शवपेटीत ठेवण्यात आले होते. त्यांचीही हीच इच्छा होती, त्यामुळे त्यांच्या इच्छेचा मान राखून मृत्यूनंतरही त्यांचा चेहरा दाखवला गेला नाही, असे कुटुंबीयांचे म्हणणे होते.
बातम्या आणखी आहेत...