आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा210 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात कैद असलेला कॉनमन सुकेश चंद्रशेखरने मीडियाला दिलेल्या निवेदनात नोरा फतेहीवर गंभीर आरोप केले आहेत. मोरोक्कोमध्ये घरासाठी नोराला पैसे दिल्याचे सुकेशने म्हटले आहे. यासोबतच सुकेशने असेही सांगितले की, तो जॅकलिनसोबत सीरिअस रिलेशनशिपमध्ये होता. अलीकडेच नोरा फतेहीने सुकेशवर आरोप केला होता की, त्याने तिला आपली गर्लफ्रेंड बनण्याची ऑफर दिली होती. त्या बदल्यात तो नोराला आलिशान जीवनशैली आणि मोठा बंगला देणार होता. आता नोरा फतेहीच्या या वक्तव्यावर सुकेशने सांगितले की, नोराने घर घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे मागितले होते. मोरोक्कोमध्ये घर घेण्यासाठी त्याने नोरा फतेहीला पैसेही दिले. त्याने जॅकलिन फर्नांडिसला सोडावे अशी तिची इच्छा होती. नोरा त्याला त्रास देत होती असेही सुकेशने सांगितले.
सुकेशने नोरावर लावले गंभीर आरोप
सुकेशने मीडियाला दिलेल्या निवेदनात म्हटले, 'आज ती (नोरा) माझ्यावर आरोप करत आहे की मी तिला घर देण्याचे वचन दिले होते. पण मोरोक्कोमधील कासाब्लांका येथे तिच्या कुटुंबासाठी घर घेण्यासाठी तिने माझ्याकडून खूप मोठी रक्कम आधीच घेतली होती. 9 महिन्यांपूर्वी ईडीला दिलेल्या जबाबानंतर कायद्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तिने सर्व नवीन कथा रचल्या आहेत,' असे सुकेश म्हणाला.
नोराला सुकेशकडून हवी होती महागडी कार
सर्व नवीन आणि जुन्या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना सुकेश म्हणाला, 'नोराने तिला कार नको होती, हा जो दावा केला आहे तो खोटा आहे. कारण तिने माझ्यामागे कार बदलण्यासाठी तगादा लावला होता. तिला 'CLA' ही अतिशय स्वस्त कार वाटली, म्हणून मी तिला तिच्या आवडीची कार दिली.'
नोराने तिच्या मैत्रिणीच्या पतीच्या नावावर बीएमडब्ल्यूची नोंदणी केली होती
सुकेशने पुढे सांगितल्यानुसार, 'ईडीकडे सर्व चॅट्स आणि स्क्रीनशॉट्स देखील आहेत, त्यामुळे या गोष्टी खोट्या नाहीत. खरंतर मला तिला रेंज रोव्हर गाडी द्यायची होती, पण कार स्टॉकमध्ये उपलब्ध नसल्याने आणि तिला ताबडतोब कारची गरज असल्याने मी तिला बीएमडब्ल्यू एस सीरीज दिली जी तिने बराच काळ वापरली होती. ती भारताबाहेरची आहे, म्हणून तिने तिच्या जिवलग मैत्रिणीचा नवरा बॉबीच्या नावावर गाडीची नोंदणी करण्यास सांगितले होते. माझ्या आणि नोरामध्ये कधीही व्यावसायिक व्यवहार झाला नाही, ज्याचा ती दावा करतेय. माझ्या फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तिने सहभाग घेतला तेव्हा तिच्या एजन्सीला अधिकृतपणे पैसे दिले गेले होते,' अशी माहिती सुकेशने दिली.
जॅकलिनसोबत सीरिअस रिलेशनशिपमध्ये होता सुकेश
सुकेश पुढे म्हणाला की, तो जॅकलिन फर्नांडिससोबत सीरिअस रिलेशनशिपमध्ये होता. नोराला जॅकलिनचा हेवा वाटत होता, असा दावाही त्याने केला. नोराने काही काळापूर्वी जॅकलिनवर मानहानीचा खटला दाखल केला आहे.
सुकेश चंद्रशेखर 210 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी
गेल्या वर्षी, ईडीने सुकेश चंद्रशेखर आणि इतरांविरुद्ध 210 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. आरोपानुसार, तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना सुकेशने एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून पैसे उकळले होते.
या खंडणी प्रकरणात ईडीने जॅकलिन आणि नोरा फतेही यांची साक्षीदार म्हणून नोंद केली आहे, त्यामुळे तपास यंत्रणा त्यांना वारंवार चौकशीसाठी बोलावत आहे. जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही व्यतिरिक्त सुकेशने चाहत खन्ना, निक्की तांबोळी आणि नेहा कपूर यांसारख्या अभिनेत्रींना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.