आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबई दौरा केला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात भव्य फिल्मसिटी उभारण्याच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडच्या चित्रपट निर्मात्यांसोबत बैठक घेतली. यावेळी, अभिनेता सुनील शेट्टी यांनी #BoycottBollywood हा ट्रेंड बंद करण्याची विनंती त्यांच्याकडे केली. बॉलिवूडवर लागलेला हा शिक्का पाहताना मनाला वेदना होतात, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. तुम्हीच हा ट्रेंड बंद करू शकता असे सांगत सुनील शेट्टींनी योगी आदित्यनाथांकडे ही मागणी केली.
बॉयकॉट ट्रेंड बंद व्हावा
योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलताना सुनील शेट्टी म्हणाले, "प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहात आणणे महत्त्वाचे आहे. तसेच चित्रपटसृष्टी ही चांगली काम करणाऱ्या चांगल्या माणसांनी बनलेली आहे, हे त्यांना पटवलून द्यायला हवे," असे ते म्हणाले.
तुम्हाला त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल - सुनील शेट्टी
"आज लोकांना वाटते की, बॉलिवूड चांगले नाही. पण आम्ही इथे इतके चांगले चित्रपट बनवले आहेत. मीही अशाच एका चित्रपटाचा भाग होतो. मी बॉर्डर चित्रपट केला होता. बॉयकॉट बॉलिवूड हॅशटॅगपासून आपली सुटका कशी करता येईल यासाठी आपण एकत्र येऊन काम केले पाहिजे. आपण हा ट्रेंड कसा थांबवू शकतो याचा शोध घ्यावा लागेल. आज मी जर सुनील शेट्टी आहे तर ते यूपी आणि तिथल्या चाहत्यांमुळे आहे. त्यांनी शुक्रवारी चित्रपटगृहे भरली आणि त्यामुळेच आम्हाला तो चित्रपट चालेल असे कळले. हे पुन्हा होऊ शकते, पण तुम्हाला त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. आमच्यावर असलेला हा कलंक नाहीसा होणे खूप महत्त्वाचे आहे," असे सुनील शेट्टी म्हणाले.
आम्ही दिवसभर ड्रग्स घेत नाही - सुनील शेट्टी
पुढे बोलताना ते म्हणाले, "आमच्यापैकी 99% लोक असे नाहीत. आम्ही दिवसभर ड्रग्स घेत नाही, आम्ही चुकीची कामे करत नाहीत. आम्ही चांगले करतो, भारताला जर बाहेरच्या देशांशी कुणी जोडले असेल तर ते बॉलिवूडच्या कथा आणि संगीताने जोडले आहे." योगीजी तुम्ही पुढाकार घेऊन पंतप्रधानांशी याबद्दल बोललात तर खूप फरक पडेल, अशी विनंती सुनील शेट्टी यांनी यावेळी योगींकडे केली.
या बैठकीला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेते, संगीतकार, निर्मात्यांनी हजेरी लावली होती. यात सुनील शेट्टी, सुभाष घई, जॅकी श्रॉफ, सोनू निगम आणि बोनी कपूर यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांची भेट घेतली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती. योगी आदित्यनाथ आज देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई येथून देशांतर्गत रोड शोची सुरुवात करतील. वाचा सविस्तर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.