आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागराज मंजुळेंचा 'झुंड' वादात:चित्रपटाच्या प्रदर्शनावरील स्थगिती उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, हे आहे संपूर्ण प्रकरण

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मे 2020 मध्ये रिलीज होणार होता चित्रपट

अमिताभ बच्चन यांची महत्त्वाची भूमिका असलेला आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' या चित्रपटासमोरील अडचणी कमी व्हायची अद्याप चिन्हं दिसत नाहीयेत. काही महिन्यांपूर्वी झुंडच्या निर्मात्यांविरोधात हैदराबाद येथील चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार यांनी कॉपीराईट उल्लंघनाचा आरोप लावत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या ऑल इंडिया रिलीजवर स्थगिती आणली आली होती. आता ताज्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. अर्थातच झुंडच्या प्रदर्शनावर स्थगिती कायम राहणार आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेतील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने चित्रपटाचे निर्माते सुपर कॅसेट्सची मागणी फेटाळून लावली. तेलंगणा उच्च न्यायालयाने 19 ऑक्टोबरला आदेश देत भारतासह जगभरात ‘झुंड’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. या आदेशाला चित्रपटाच्या निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. वरिष्ठ वकील व्ही. आर. धोंड यांनी सुपर कॅसेट्सच्या वतीने युक्तिवाद केला, तर वरिष्ठ वकील पी. एस. नरसिम्हा यांच्यासह वकील अबिद अली बीरन आणि श्रीराम परकात यांनी प्रतिवादी नंदी चिन्नी कुमार यांची बाजू मांडली.

सार्वजनिक क्षेत्रात (पब्लिक डोमेन) आधीपासूनच उपलब्ध असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सत्य घटना ‘मालमत्ता’ मानल्या जाऊ शकतात का आणि त्या कॉपीराईट संरक्षणास पात्र ठरु शकतात का? हा भारतातील कॉपीराईट कायद्यासंदर्भात महत्त्वाचा प्रश्न या याचिकेत उपस्थित करण्यात आला होता. याचिकाकर्ते सुपर कॅसेट्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (टी-सीरीज म्हणून विख्यात) ने असा दावा केला होता, की हा चित्रपट फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

का झाला कॉपीराईट हक्काचा भंग?
काही वर्षांपूर्वीच फुटबॉलर अखिलेश पॉल यांच्या जीवनावर चित्रपट तयार करण्याचे हक्क नंदी कुमार यांनी विकत घेतले होते. अखिलेश पॉल हा 2010 साली झालेल्या फुलबॉल वर्ल्ड कपसाठी भारतीय फुटबॉल संघाचा कॅप्टन होता. त्याच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माण करण्याचा अधिकार नंदी कुमार यांनी विकत घेतला होता. मात्र आता झुंडमधून विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात ही कथा दाखवण्यात आल्यामुळे कॉपीराईट हक्काचा भंग झाला आहे. 'झुंड' चित्रपटात प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची कथा मांडण्यात आली होती. झोपडपट्टीत राहण्या-या गरीब मुलांचे खेळातून करियर घडावे यासाठी विजय बारसे यांनी आयुष्यभर प्रयत्न केले होते. समाजाकडून वाईट वागणूक मिळाल्याने वाममार्गाला गेलेल्या काही मुलांना विजय बारसे यांनी फुटबॉलपटू बनवले होते. त्यातील काही मुलांनी परदेशातील होमलेस फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये देखील चमकदार कामगिरी केली होती. अखिलेश पॉल हा त्यापैकीच एक फुटबॉल खेळाडू आहे.

मे 2020 मध्ये रिलीज होणार होता चित्रपट
या चित्रपटात सैराट फेम जोडी रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर देखील दिसणार आहेत. या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्णा कुमार, राज हीरेमथ, सविता राज आणि नागराज मंजुळे यांनी संयुक्तपणे केली आहे. लॉकडाऊनपूर्वी हा चित्रपट 8 मे रोजी रिलीज होणार होता. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला त्यांचा हा पहिला हिंदी चित्रपट आहे.

बातम्या आणखी आहेत...