आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रियाच्या डायरीत सुशांतचा मेसेज:रियाने प्रसिद्ध केल्या सुशांतच्या नोट्स, सुशांतने रिया आणि तिच्या कुटुंबीयांविषयी व्यक्त केली होती कृतज्ञता

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे यांच्यामार्फत रियाने सुशांतच्या नोट्स समोर आणल्या आहेत.
  • रियाचा दावा- तिच्याकडे सुशांतची एकमेव वस्तू आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहेत. अलीकडेच तिची मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी झाली. आता रियाने तिचे वकील सतीश मानशिंदे यांच्यामार्फत सुशांतने लिहिलेल्या काही नोट्स समोर आणल्या आहेत.

सुशांतने स्वतः या नोट्स आपल्या डायरीत लिहिल्या होत्या, असा दावा तिने केला आहे. रियाने प्रसिद्ध केलेल्या या नोट्समध्ये सुशांतने त्याच्या आयुष्यात कुणाकुणाला महत्त्वाचे स्थान आहे याविषयी लिहिले आहे. या नोट्समध्ये सुशांतने रिया आणि तिच्या कुटुंबीयांविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती.

या नोट्समध्ये सुशांत लिहितो...
मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे.
माझ्या आयुष्यात लिल्लू (रियाचा भाऊ शोविक) आल्यामुळे मी कृतज्ञ आहे.
माझ्या आयुष्यात बेबु (रिया) आल्यामुळे मी कृतज्ञ आहे.
माझ्या आयुष्यात सर (रियाचे वडील) आल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.
माझ्या आयुष्यात मॅम (रियाची आई) आल्यामुळे मी कृतज्ञ आहे.
माझ्या आयुष्यात फ्युडी (कुत्रे) आल्यामुळे मी कृतज्ञ आहे.
तुम्ही सर्व माझ्या आयुष्यात आल्यामुळे मी कृतज्ञ आहे

रियाने दावा केला की, या नोट्समध्ये सुशांतने तिचा भाऊ शोविकचा लिल्लू म्हणून उल्लेख केला आहे. बेबु रिया स्वतः आहे. सुशांत मॅम आणि सर रियाच्या आईवडिलांना म्हणायचा. फज हे सुशांतच्या कुत्र्याचे नाव आहे.

  • रियाजवळ सुशांतची एकमेव संपत्ती

रिया म्हणाली की, सुशांतची कोणतीही मालमत्ता माझ्याकडे नाही. माझ्याकडे केवळ त्याची पाणी पिण्याची एक बाटली आहे. या बाटलीचे छायाचित्रही रियाने प्रकाशित केले आहे.

डायरीचे पान आणि पाण्याची बाटली मीडियाला दाखवण्यामागे रियाचा हेतू काय आहे? ती आणि तिचे कुटुंबीय सुशांतच्या किती जवळचे आणि महत्त्वाचे होते हे दाखवण्याचा ती प्रयत्न करतेय का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

ईडीकडून रियाची साडेआठ तास चौकशी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतला आत्महत्येसाठी बाध्य केल्याचा आणि त्याच्या पैशांची हेराफेरी केल्याचा आरोप असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीची शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) साडेआठ तास चौकशी केली. याप्रकरणी मनी लाँडरिंगचे प्रकरण ईडी हाताळत असून शुक्रवारी झालेल्या चौकशीत रियाला अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईच्या पॉश भागात असलेल्या आपल्या दोन फ्लॅटची योग्य माहिती तिला देता आली नाही. यातील एक फ्लॅट स्वत: रियाच्या नावावर आणि दुसरा तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांच्या नावावर रजिस्टर्ड आहे.

चौकशी दरम्यान रिया म्हणाली की, सुशांतने तिच्यावर जे पैसे खर्च केले ते स्वमर्जीने केले होते. मात्र जेव्हा रियाला तिच्या स्वतःच्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्चाबद्दल प्रश्न विचारले गेले तेव्हा ती योग्य उत्तरे देऊ शकली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी ईडीकडून तिची पुन्हा चौकशी केली जाईल.

  • रियाच्या वकिलांचे स्पष्टीकरण - तिच्याकडे लपण्यासाठी काहीही नाही

रियाने कोणतीच गोष्ट लपवली नाही असे रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी म्हटले आहे. “रिया, तिचे वडील आणि भाऊ या तिघांचाही जबाब नोंदविला गेला आहे. त्यांनी सगळी कागदपत्रेदेखील दाखविली आहेत. या कागदपत्रांमध्ये आयटी रिटर्न्सचा रेकॉर्डदेखील होता. तसेच पोलिस चौकशी असो किंवा ईडीने केलेली चौकशी रियाने पूर्णपणे सहकार्य केले आहे. तिने कोणतीही गोष्ट लपवलेली नाही. लपवून ठेवावे असे तिच्याकडे काहीच नाही. जर तिला परत चौकशीसाठी बोलवण्यात आले तर ती तेव्हादेखील जाईल”, असे रियाच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...