आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत केसमध्ये सीबीआय चौकशीचा मुंबईतील दुसरा दिवस:सीबीआयची टीम सुशांतचा कुक नीरज आणि रुममेट सिद्धार्थ पिठानीला घेऊन फ्लॅटवर पोहोचली, घटनेचे ‘रिक्रिएशन’ केले जाणार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
सुशांतच्या घरी जात असताना सिद्धार्थ पिठानी आणि नीरज सिंग सीबीआय कारमध्ये. सकाळी डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये त्यांची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने चौकशी केली.
 • 14 जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह मुंबईच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये फासावर लटकलेला आढळला होता
 • एम्सचे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख म्हणाले - हत्येच्या अनुशंगानेही तपास केला जाईल, सर्व अँकलने तपास केला जाईल
 • ऑटोप्सी रिपोर्टचाही तपास होईल

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयची 16 सदस्यांची टीम मुंबईमध्ये आहे. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी सुशांतचा कुक नीरजची चौकशी केली जात आहे. अधिकाऱ्यांची एक टीम सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानी आणि कुक नीरज सिंह यांना घेऊन सुशांतच्या घरी पोहोचली आहे. येथे 14 जूनच्या घटनेचे रिक्रिएशन केले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.

यापूर्वी आज सकाळी टीमने सिद्धार्थ पिठानीची चौकशी केली. सुशांतच्या मृत्यूनंतर सिद्धार्थच सर्वप्रथम त्याच्या खोलीत गेला होता. या केसमधील सर्वात महत्वाचा साक्षीदार म्हणून सिद्धार्थ पिठानी (सुशांतचा रुममेट) कडे बघितले जात आहे. नीरजची दुस-या दिवशीही चौकशी सुरु आहे. संध्याकाळीदेखील त्याची विचारपूस होऊ शकते. शुक्रवारी नीरजची जवळपास 13 तास चौकशी करण्यात आली होती. सोबतच सुशांतच्या घरी काम करणारे दीपेश सावंत आणि केशव बचनेस यांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

हा फोटो वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या सीबीआय अधिका-यांचा आहे. सुशांत प्रकरणात सीबीआयचे पथक मुंबई पोलिसांच्या तपासणीत उघड झालेला पुरावा गोळा करत आहे.
हा फोटो वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या सीबीआय अधिका-यांचा आहे. सुशांत प्रकरणात सीबीआयचे पथक मुंबई पोलिसांच्या तपासणीत उघड झालेला पुरावा गोळा करत आहे.
 • ऑटोप्सी रिपोर्टची तपासणी करेल एम्सची टीम

सुशांतच्या ऑटोप्सी रिपोर्टच्या तपासासाठी एम्सने शुक्रवारी फॉरेन्सिक तज्ज्ञांचे 5 सदस्यीय वैद्यकीय मंडळ स्थापन केले आहे. सीबीआयने शुक्रवारी याप्रकरणी एम्सचे मत जाणून घेतले. या पथकाचे नेतृत्व एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता करत आहेत. ते म्हणाले, 'आम्ही हत्येच्या शक्यतेचा विचार करू, सर्व संभाव्य अँकलने चौकशी केली जाईल'.

व्हिसेराची तपासणी केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. सुशांतला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी दिली जाणारी औषधे एम्सच्या प्रयोगशाळेतही तपासली जातील, असेही गुप्ता यांनी सांगितले.

सीबीआयसमोर आहेत ही तीन आव्हाने

 • 60 दिवसांपेक्षा अधिकचा काळ लोटल्याने या प्रकरणातील घटनास्थळावरील क्राइम सीन जवळजवळ पुसला गेला असू शकतो. सीबीआयजवळ फक्त घटनास्थळावरुन घेण्यात आलेल्या छायाचित्रांचा आधार आहे.
 • मुंबई पोलिसांचा संपूर्ण रेकॉर्ड मराठी भाषेत आहे आणि त्याचे मराठीतून इंग्रजीमध्ये अनुवाद करण्यास बराच काळ लागू शकेल. यात 56 साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश आहे.
 • सुशांतच्या मृत्यूचा कोणताही प्रत्यक्षदर्शी नाही, फक्त एकच माणूस आहे ज्याने मृतदेह लटकलेला पाहिला आणि त्यानेच मृतदेह खाली काढला. अशा परिस्थितीत मृतदेह कुठे लटकला होता आणि त्याचे पाय कुठे होते या गोष्टी समजून घेण्यासाठी सीबीआयला अडचणी येऊ शकतात.

सीबीआयने या गोष्टी मुंबई पोलिसांकडून आपल्या ताब्यात घेतल्या

 • सुशांतचे 3 मोबाइल फोन, सुशांतचा लॅपटॉप.
 • तो मग ज्यातून सुशांतने ज्युस पिला होता.
 • सुशांतने त्या वेळी घातलेले कपडे आणि गळफास घेण्यासाठी ज्या हिरव्या कापडाचा वापर त्याने केला होता.
 • सीबीआयला ऑटोप्सी व फॉरेन्सिक अहवालही प्राप्त झाले आहेत.
 • सुशांतच्या घर आणि फॉर्म हाऊसमधून मिळालेल्या डायरी.
 • 13 ते 14 जून दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने आपल्या ताब्यात घेतले आहे.
 • रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती आणि या प्रकरणाशी संबंधित सर्वांचे सीडीआर.
 • 56 साक्षीदारांच्या निवेदनाची प्रत सीबीआयच्या पथकाने मुंबई पोलिसांकडून घेतली आहे.

मुंबई पोलिसांच्या अधिका-यांची चौकशी

सूत्रांनुसार, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सर्वात आधी घटनास्थळी पोहोचलेल्या मुंबई पोलिसांच्या टीमचीही चौकशी केली आहे. सोबतच मुंबई पोलिसांची डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांचीही शुक्रवारी चौकशी झाली. रिया चक्रवर्तीच्या कॉल हिस्ट्रीवरुन सुशांत प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिमुखे यांचे रियासोबत फोनवर ब-याचदा बोलणे झाल्याचे समोर आले होते. सोबतच आज सीबीआयची टीम डीसीपी रँकचे अधिकारी परमजीत सिंह दहिया यांचीही चौकशी करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. सुशांतच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी त्याच्या भावोजींनी दहिया यांना मेसेज करुन सुशांतच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. सीबीआयची टीम सुशांत सिंहच्या मित्रांचीही चौकशी करणार आहे. इतकेच नव्हे तर मुंबई पोलिसांनी आधी ज्या संशयितांची चौकशी केली होती, त्यांचीही पुन्हा चौकशी केली जाईल. सीबीआयचे अधिकारी मुंबईत दहा दिवस तळ ठोकून बसणार असल्याचेही म्हटले जात आहे. सीबीआय सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करणार आहे.

 • सुशांतच्या कुकचा 40 पानांचा जबाब नोंदवला गेला

शुक्रवारी तपासाच्या पहिल्याच दिवशी सीबीआयच्या पथकाने सुशांतचा कुक नीर सिंहची चौकशी केली. नीरजचा 40 पानांचा जबाब नोंदवला गेला आहे. सीबीआयची पथक ज्या गेस्टहाऊसमध्ये थांबले आहे, तिथेच नीरजची चौकशी केली गेली. यावेळी सीबीआयला नीरजकडून हे जाणून घ्यायचे होते की, 14 जून रोजी जेव्हा सुशांतचा मृत्यू झाला, त्याच्या आधीचे त्याचे वागणे कसे होते? त्याच्या वागण्यात पुर्वीपेक्षा काही बदल जाणवला होता का? नीरजला त्याच्या वागण्यात काही बदल जाणवला होता का? नीरजसोबत सुशांतने काही शेअर केले होते? इतकेच नाही तर रिया चक्रवर्तीच्या भूमिकेबद्दलही नीरजची चौकशी केली गेली.

 • सीबीआयला या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत

सीबीआयचा तपास बिहार पोलिसांच्या एफआयआरवर आधारित असेल. ज्यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणे, फसवणूक आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या एफआयआरमध्ये आयपीसीच्या कलम 341, 348, 380, 406, 420, 306 आणि 120 बी समाविष्ट आहेत. तसेच सीबीआयला या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत.

 • सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या?
 • सुशांतने आत्महत्या केली असेल तर त्यामागील खरं कारण काय आहे?
 • सुशांतच्या मृत्यू प्रकरणाशी रिया चक्रवर्ती, तिचे कुटुंब, आणि त्याच्या घरी काम करणा-यांचा काही संबंध आहे का?
 • सुशांतच्या मृत्यू प्रकरणामध्ये चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींचा काही संबंध आहे का?
 • पैश्यांच्या व्यवहारावरुन झालेले मतभेद आणि इतर आर्थिक गोष्टींमुळे सुशांतचा मृत्यू झाला आहे का?
 • सुशांतच्या आजाराबद्दलचे सत्य काय आहे? तो खरोखर नैराश्याचा सामना करत होता का?
 • सुशांतच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काही माहिती लपवण्यात आली आहे का?
 • साक्षीदार म्हणून नोंदवण्यात आलेले जबाब खरे आहेत का?
 • 13 आणि 14 जून रोजी सुशांतच्या घरी नक्की काय काय घडले?