आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत प्रकरणात ईडीची चौकशी:साडे आठ तासांच्या चौकशीत आपले दोन फ्लॅट्स, उत्पन्न आणि खर्चाबाबत समाधानकारक उत्तरे देऊ शकली नाही रिया चक्रवर्ती, ईडीकडून पुन्हा होऊ शकते चौकशी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित, भाऊ शोविक, सीए रितेश शाह आणि सुशांतची माजी मॅनेजर यांची ईडीने चौकशी केली.
  • सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपये काढल्याचा आरोप रिया आणि तिच्या कुटुंबीयांवर आहे. याप्रकरणी ईडी सोमवारी पुन्हा तिची चौकशी करु शकते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतला आत्महत्येसाठी बाध्य केल्याचा आणि त्याच्या पैशांची हेराफेरी केल्याचा आरोप असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीची शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) साडेआठ तास चौकशी केली. याप्रकरणी मनी लाँडरिंगचे प्रकरण ईडी हाताळत असून शुक्रवारी झालेल्या चौकशीत रियाला अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईच्या पॉश भागात असलेल्या आपल्या दोन फ्लॅटची योग्य माहिती तिला देता आली नाही. यातील एक फ्लॅट स्वत: रियाच्या नावावर आणि दुसरा तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांच्या नावावर रजिस्टर्ड आहे.

चौकशी दरम्यान रिया म्हणाली की, सुशांतने तिच्यावर जे पैसे खर्च केले ते स्वमर्जीने केले होते. मात्र जेव्हा रियाला तिच्या स्वतःच्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्चाबद्दल प्रश्न विचारले गेले तेव्हा ती योग्य उत्तरे देऊ शकली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी ईडीकडून तिची पुन्हा चौकशी केली जाईल.

  • रियाच्या वकिलांचे स्पष्टीकरण - तिच्याकडे लपण्यासाठी काहीही नाही

रियाने कोणतीच गोष्ट लपवली नाही असे रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी म्हटले आहे. “रिया, तिचे वडील आणि भाऊ या तिघांचाही जबाब नोंदविला गेला आहे. त्यांनी सगळी कागदपत्रेदेखील दाखविली आहेत. या कागदपत्रांमध्ये आयटी रिटर्न्सचा रेकॉर्डदेखील होता. तसेच पोलिस चौकशी असो किंवा ईडीने केलेली चौकशी रियाने पूर्णपणे सहकार्य केले आहे. तिने कोणतीही गोष्ट लपवलेली नाही. लपवून ठेवावे असे तिच्याकडे काहीच नाही. जर तिला परत चौकशीसाठी बोलवण्यात आले तर ती तेव्हादेखील जाईल”, असे रियाच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे.

  • रियाने चौकशीत सहकार्य केले नाही?

ईडीच्या सूत्रांच्या हवाल्यानुसार अनेक रिपोर्ट्समध्ये रिया चौकशीदरम्यान योग्य सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात येत आहे. कधी तिने आजाराचे कारण दिले, तर याक्षणी काहीच आठवत नसल्याचे तिने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. या चौकशीदरम्यान जेव्हा रियाला तिच्या संपत्तीची कागदपत्रे दाखवण्यास सांगितले असता तिने टाळाटाळ केल्याचं समजतंय. संपत्तीची कागदपत्रे ही सीएजवळ असल्याचे रियाने सांगितले. जेव्हा ईडीने रियाच्या सीएकडे कागदपत्रांविषयी विचारणा केली असता त्यांनी ते रियाकडेच असल्याचे सांगितलं. रियाला दुसऱ्यांदा कागदपत्रांविषयी विचारले असता तिने लक्षात नसल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे कळतंय. सुशांतच्या खात्यातून पैसे काढल्याचा आरोप खोटा असल्याचे तिने म्हटले आहे. मी देखील 7 चित्रपट केले आहेत आणि त्यातून पैसे कमावले असल्याचे रियाने ईडीच्या चौकशीत सांगितले.

  • मुंबईतील दोन घरांच्या खेरदीबाबात रियाने दिली ही उत्तरे

ईडीकडून रियाच्या मुंबईस्थित दोन फ्लॅटचीदेखील चौकशी करण्यात आली. हे फ्लॅटस सुशांत सिंह राजपूतच्या खात्यातून काढलेल्या पैशातून घेतल्याचे म्हटले जात होते. परंतु, ईडीच्या चौकशीमध्ये हे दोन्ही फ्लॅट मी स्वत: घेतले आहेत, असे उत्तर रियाने दिल्याचे ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात म्हटले आहे. रियाने खार आणि नवी मुंबई येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये दोन फ्लॅट घेतले आहेत. यातील खारमधील घर जवळपास 85 लाख रुपयांचे असून त्यासाठी रियाने 25 लाखांचे डाऊनपेमेंट केले होते. तर 60 लाखांचे होम लोन घेतले होते. हा फ्लॅट 550 स्क्वेअर फिटचा आहे. तर दुसरा फ्लॅट 2012 मध्ये घेतला होता आणि 2016 मध्ये या घराचा ताबा मिळाला होता.या फ्लॅटची किंमत 60 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.

बातम्या आणखी आहेत...