आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटकेची शक्यता:सुशांतच्या कुटुंबियांना केवळ विम्याचे पैसे हवे आहेत -रिया चक्रवर्तीचा आरोप; रियाने तपासात सहाकार्य केले नाही, अटकही होऊ शकते -वकील

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतचे वडील के.के सिंह यांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांवर सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे.
  • 31 जुलै रोजी ईडीने रियाविरूद्ध मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला.
  • सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती रियाने केली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपये हडपल्याप्रकरणी ईडीने रिया चक्रवर्तीची शुक्रवारी जवळजवळ साडेआठ तास चौकशी केली. वृत्तानुसार, सुरुवातीला रियाने तपासात सहकार्य केले नाही. कधी ती आजाराचे निमित्त बनवत होती, तर कधी प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरे देत होती. सुशांतच्या खात्यातून पैसे काढल्याचा आरोप खोटा असल्याचे तिने म्हटले आहे. आतापर्यंतच्या करिअरमध्ये 7 चित्रपट केले असून त्यातून बराच पैसा कमावल्याचे रियाने चौकशीत म्हटले आहे.

... तर रियाला अटक होऊ शकते?

दरम्यान, सुशांतचे वडील के.के. सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी सांगितल्यानुसार, जर रियाने ईडीला चौकशीत सहकार्य केले नाही, उडवाउडवीची उत्तरे दिली, तर तिला अटकदेखील केली जाऊ शकते. ते म्हणाले, "आता जर तिने चौकशीसाठी पुढे येण्याचे ठरविले आहे, तर तिला सर्व प्रश्नांची अचुक उत्तरे द्यावी लागतील. जर तिने तपासात सहकार्य करुन समाधानकारक उत्तरे दिली तर तिला ईडीच्या कार्यालयातून सोडण्यात येईल. मात्र जर तिने उत्तरे देणे टाळण्याचा प्रयत्न केला तर तिला अटक होऊ शकते."

ईडीने मागितला मागील 5 वर्षांचा इनकम टॅक्सचा रेकॉर्ड

सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीने रियाला तिच्या मागील पार वर्षांचा इनकम टॅक्स रेकॉर्ड दाखवण्यास सांगितले आहे. यावेळी ईडीने तिला काही कागदपत्रे मागितली. त्यावेळी दोन तासांच्या चौकशीनंतर रियाचा भाऊ शोविक ईडी कार्यालयातून बाहेर पडला. थोड्या वेळाने तो पुन्हा ईडी कार्यालयात आला. तो रियाच्या घरी गेला होता. तिथून काही महत्त्वाचे कागदपत्रे घेऊन तो पुन्हा ईडी कार्यालयात दाखल झाला होता. रिया आणि शोविक व्यतिरिक्त सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी हिलादेखील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

सुशांतच्या कुटुंबीयांवर रियाचे गंभीर आरोप

ईडीच्या चौकशीत रियाने सुशांतच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. तिचा दावा आहे की, सुशांतचे कुटुंबीय त्याचा विमा व इतर मालमत्ता मिळवण्यासाठी दबाव आणत होते. सुशांतचे कुटुंब त्याला तिच्यापासून वेगळे होण्यापासून सुशांतवर दबाव आणत होते. यासाठी सुशांतचे आयपीएस भावोजी कित्येक महिन्यांपासून एक मोठा कट रचत होते, असे रियाने या चौकशीत सांगितल्याचे सूत्रांकडून समजते. सुशांतने माझ्यावर जो खर्च केला तो स्वत:च्या मर्जीने काल असेही ती यावेळी म्हणाली.

सुरुवातीला चौकशीपासून बचाव करण्याच्या केला होता प्रयत्न

ईडीने 7 ऑगस्ट रोजी रियाला चौकशीसाठी बोलावले. पण तिला ही चौकशी टाळायची होती. तिने ही चौकशी पुढे ढकलण्यासाठी ईडीला विनंती केली होती. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती रियाने केली होती. परंतु, तिचा हा अर्ज फेटाळण्यात आला. रियावर सुशांतच्या खात्यातून 15 कोटींची गुंतवणूक स्वतःच्या कंपनीत केल्याचा आरोप आहे.

रिपोर्ट्सनुसार ईडी तीन टप्प्यात रियाची चौकशी करत आहे. यासाठी 20 हून अधिक प्रश्न तयार झाले आहेत. यात तिची वैयक्तिक माहिती तसेच तिचे संशयास्पद व्यवहार, उत्पन्न खर्च, फर्म्स आणि बँक खात्यांचा तपशील समाविष्ट आहे.

31 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पाटणा पोलिसांकडून रिया आणि तिच्या कुटुंबीयांविरूद्ध दाखल एफआयआरची प्रत मागितली होती. याचा अभ्यास केल्यानंतर ईडीने मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. यानंतर 31 जुलै रोजी ईडीने रिया, तिचे आईवडील, भाऊ, दोन सहका-यांविरोधात गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास सुरू केला.

सीबीआयनेही गुन्हा दाखल केला

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या संशयास्पद स्थितीत झालेल्या मृत्यू प्रकरणात केंद्राची अधिसूचना जारी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सीबीआयने हे प्रकरण आपल्या हातात घेतले होते. गुरुवारी या तपास संस्थेने एफआयआर दाखल केला आहे. तपासासाठी विशेष पथक (एसआयटी) बनवण्यात आले आहे. सीबीआयने सुशांत प्रकरणात 6 आरोपींसह एका अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, तिचे बिझनेस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, पर्सनल मॅनेजर श्रुती मोदी आदींचा समावेश आहे.

सुशांतच्या वडिलांनी 25 जुलै रोजी गुन्हा दाखल केला होता

14 जून रोजी सुशांतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुमारे एक महिन्यानंतर सुशांतच्या वडिलांनी पाटण्याच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांनी रिया, तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती, दोन मॅनेजर सौमिल चक्रवर्ती आणि श्रुती मोदी यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाटणा पोलिस मुंबईला गेले. मुंबई पोलिसांचा पाठिंबा न मिळाल्यानंतरही पाटणा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. सुरुवातीला चार पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्या मदतीसाठी गेलेले एसपी विनय तिवारी यांना मुंबईत जबरदस्तीने क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. चार पोलिस अधिकारी गुरुवारी पाटण्याला परतले. तर विनय तिवारी क्वारंटाइनमधून मुक्त झाल्यानंतर शुक्रवारी पाटण्याला परतले.

बातम्या आणखी आहेत...