आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत मृत्यू प्रकरण:सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीचा खुलासा - दिशा सॅलियानच्या मृत्यूची बातमी समजताच बेशुद्ध पडला होता सुशांत

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिशा सॅलियानच्या मृत्यूच्या आठवडाभरानंतर सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला होता.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला जवळजवळ तीन महिने उलटले आहेत. मात्र अद्यात त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, याचा उलगडा होऊ शकलेला नाही. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान दिशा सॅलियानच्या मृत्यूची बातमी समजताच सुशांत बेशुद्ध पडला होता, अशी माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा खुलासा सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीने सीबीआयला दिलेल्या जबाबात केला आहे. दिशा सॅलियानचा 8 जून रोजी इमारतीवरुन पडून मृत्यू झाला होता. तिने आत्महत्या केली, असे म्हटले जाते. दिशा ही सुशांतची माजी मॅनेजर होती.

दिशाचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर सुशांत बेशुद्ध पडला होता. जेव्हा तो शुद्धीवर आला, तेव्हा ते लोक मलादेखील मारुन टाकतील, असे सुशांत म्हणाला होता. सुशांतने सिद्धार्थला आपली सुरक्षा वाढवण्यास सांगितले होते. आता सिद्धार्थ पिठानीच्या या विधानावरून दिशा सॅलियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूमध्ये कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • सुशांत त्याचा लॅपटॉप, कॅमेरा आणि हार्ड ड्राईव्ह शोधत होता

सिद्धार्थ पिठानीने सांगितले की, दिशाच्या निधनानंतर सुशांत त्याचा लॅपटॉप, कॅमेरा आणि हार्ड ड्राईव्ह शोधत होता. यासाठी त्याने रिया चक्रवर्तीला फोनदेखील केला होता, पण रियाने कॉल उचलला नाही. रिया 8 जून रोजी म्हणजे ज्या दिवशी दिशाचा मृत्यू झाला त्याचदिवशी सुशांतचे घर सोडून सर्व सामान घेऊन गेली होती. रियाला आपले सर्व पासवर्ड माहित आहेत, त्यावरुन ती इतर लोकांसोबत मिळून आपल्याला अडकवेल, अशी भीती सुशांतला वाटत होती असा खुलासा सिद्धार्थने केला आहे.

  • वडिलांनीही पोलिसांना हेच सांगितले

सुशांतने 14 जून रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या निधनानंतर 25 जुलै रोजी त्याचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरूद्ध पाटण्यातील राजीव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांनी रियावर त्यांच्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप लावला आहे. आपल्या तक्रारीत के.के. सिंह यांनी म्हटले की, जेव्हा मीडिया रिपोर्ट्समध्ये दिशाचा उल्लेख सुशांतची मॅनेजर म्हणून करण्यात आला होता, तेव्हा सुशांत घाबरला होता. सुशांतने रियाला फोन करण्याचा प्रयत्न केला होता, पण तिने त्याचा नंबर ब्लॉक केला होता. दिशा आत्महत्या प्रकरणात रियाला आपल्याला अडकवेल, अशी भीती सुशांतला वाटत होती, असे के.के. सिंह यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.