आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी काही दिवसांपासून मालिकेचा निरोप घेतला. यावेळी त्यांनी मालिकेचे निर्माते असीत मोदी यांनी त्यांचे मानधन थकवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसिवाल हिने असितकुमार मोदी यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. जेनिफर या मालिकेत मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारत असून ती गेल्या 15 वर्षांपासून मालिकेशी जोडली गेली आहे. जेनिफरने असीत मोदी यांच्यासह आणखी काही जणांवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
जेनिफरने केले गंभीर आरोप
जेनिफर मिस्त्री हिने मालिकेचे निर्माते असितुकमार मोदी, प्रोजेक्ट हेड सोहैल रमाणी आणि कार्यकारी निर्माते जतिन बजाज यांच्याविरोधात कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तिने मालिकेसाठी शूटिंग करणे बंद केले आहे. 7 मार्च रोजी तिने शेवटचे शूटिंग केले. सोहेल आणि जतिन यांनी अपमान केल्यानंतर मी सेटवरून निघून गेले, असे जेनिफरने सांगितले.
2019 पासून त्रास देणे सुरू झाले
एका मुलाखतीत जेनिफरने संपूर्ण घटना सांगितली. जेनिफरने सांगितल्यानुसार, गेल्या अनेक वर्षांपासून तिच्यासोबत हे घडत आहे. ती म्हणाली, 2019 मध्ये मी माझ्या सहकलाकारांना या लैंगिक छळाबद्दल सांगितले होते, त्यावेळी त्यांनी मला पाठिंबा दिला (त्या अभिनेत्यांची नावे सांगू शकत नाही), पण आज माझे पती आणि माझ्या सासरच्या लोकांशिवाय कुणाचाही मला पाठिंबा नाही.
जेनिफरने सांगितल्यानुसार, असित मोदींनी 2019 पासून त्रास द्यायला तिला सुरुवात केली. आम्ही शूटिंगसाठी सिंगापूरला गेलो होतो. तेव्हापासून असित माझ्यासोबत गैरवर्तन करत आहेत. सिंगापूरमध्ये असताना अनेकवेळा त्यांनी मला हॉटेलच्या खोलीत बोलावले होते, जेव्हा मी त्यांना जाब विचारला, तेव्हा मस्करी करतोय असे ते म्हणायचे. लोकांसमोर माझ्या ओठांची स्तुती करायचे, खासगी मेसेज पाठवायचे. ज्याकडे मी सुरुवातीला दुर्लक्ष केले. जेव्हा मी त्यांना सडेतोड उत्तर दिले, तेव्हा त्यांनी मला अधिकच त्रास द्यायला सुरुवात केली.
यावर्षी 7 मार्च रोजी काय घडले?
जेनिफरने सांगितल्यानुसार, "यावर्षी 7 मार्च रोजी माझ्या लग्नाचा वाढदिवस आणि होळी एकाच दिवशी होती. मी सेटवरून निघताना मला सोहेल आणि जतिन यांनी कारमागे उभे राहून थांबवण्याचा प्रयत्न केला. मी या शोमध्ये 15 वर्षे काम केले आहे, त्यामुळे ते मला अशा पद्धतीने बळजबरीने थांबवू शकत नाही, असे मी त्यांना सांगितले. त्यावेळी सोहेलने मला धमकी दिली. त्यामुळे मला असितकुमार मोदी, सोहेल रमाणी आणि जतिन बजाज यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची केस दाखल करावी लागली."
7 मार्च रोजी हाफ डे घेणार असल्याचे आपण आधीच निर्मात्यांना सांगितले होते. मात्र हाफ डे न दिल्याने किमान दोन तास तरी ब्रेक द्या, अशी विनंती मी त्यांच्याकडे केली होती, असेही जेनिफरने सांगितले. ती म्हणाली, "ते प्रत्येकाची विनंती ऐकतात, पण माझी नाही. मी त्यांच्याकडे विनंती करत राहिली. पण त्यांनी माझे ऐकले नाही. पुरुष कलाकारांसाठी त्यांनी नेहमीच समजून घेतले. मालिकेचं सेट हे पूर्णपणे पुरुषप्रधान आहे. सोहेल माझ्याशी उद्धटपणे वागला आणि त्याने मला सेटवर चार वेळा हाकलून लावण्याची धमकी दिली. नंतर कार्यकारी निर्माते जतिन यांनी माझी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला", असे ती पुढे म्हणाली.
या प्रकरणावर आता असित मोदी काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.