आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे सुपरस्टार:दोन चित्रपट डबाबंद झाल्यानंतर कुटुंबीय शोधत होते विजय देवरकोंडासाठी नोकरी, 'या' कारणाने बनला हीरो

इफत कुरैशी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाटा आज वाढदिवस असून त्याने वयाची 34 वर्षे पूर्ण केली आहेत. अर्जुन रेड्डी, डियर कॉम्रेड, गीता गोविंदम आणि लाइगर या चित्रपटांच्या माध्यमातून विजयने अल्पावधीतच इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विजयपूर्वी त्याचे वडील इंडस्ट्रीचा एक भाग होते, तरीही यश न मिळाल्याने त्यांनी इंडस्ट्री सोडली. विजयलाही वडिलांच्या मार्गावर चालत इंडस्ट्रीपासून दूर राहायचे होते, मात्र कॉलेजमध्ये शिकत असताना त्याला बसचा फटका बसला तेव्हा त्याने अभिनेता होण्याचा निर्णय घेतला.

आज विजय देवराकोंडाच्या 34 व्या वाढदिवसानिमित्त वाचा त्याच्याशी संबंधित रंजक किस्से -

विजयचा जन्म 9 मे 1989 रोजी हैदराबाद, आंध्र प्रदेश (आता तेलंगणा) येथे झाला. विजयचे वडील गोवर्धन राव हे टीव्ही डेली सोपचे दिग्दर्शक होते, पण यश न मिळाल्याने त्यांनी इंडस्ट्री सोडली. विजयने सुरुवातीचे शिक्षण बोर्डिंग स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्याचे मध्यमवर्गीय कुटुंब भाड्याच्या घरात राहत होते. विजय कॉलेजला जाण्यासाठी बसने प्रवास करावा लागायचा. बसचे धक्के खावे लागू नये, यासाठी तो कित्येकदा कॉलेजला जाणे टाळायचा.

कॉलेजच्या दिवसांतील विजयचा फोटो.
कॉलेजच्या दिवसांतील विजयचा फोटो.

वडील म्हणाले होते - शेती कर, पण विनाकारण भटकू नकोस
ही गोष्ट वडिलांना कळताच ते प्रचंड संतापले. ते म्हणाले, तू असे का माझे पैसे उधळतोस, तुला हवे असेल तर असे काहीतरी कर जे तुला आवडेल. वडील म्हणाले होते, तुला शेती करायची असेल तरी आमची काही हरकत नाही. आम्ही तुला जमीन विकत घेऊन देऊ, पण असे कॉलेज बंक करून विनाकारण फिरू नको. विजयकडे भविष्याची कोणतीही योजना नव्हती. पण अचानक तो म्हणाला की, अॅक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश मिळवून द्या.

वडील गोवर्धनसोबत विजय देवरकोंडा.
वडील गोवर्धनसोबत विजय देवरकोंडा.

2 चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या, पण ते चित्रपट कधीच बनले नाहीत
वडिलांच्या मदतीने विजय देवरकोंडाने थिएटर ग्रुपमध्ये प्रवेश घेतला. विजयचा अभिनय खूप दमदार होता. अवघ्या 5 नाटकांनंतर त्याला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. त्यावेळी विजयेंद्र प्रसाद त्यांच्या चित्रपटासाठी नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. त्यांना कुणीतरी विजयचे नाटक बघायला सुचवले. विजयचा अभिनय पाहून त्यांनी त्याला चित्रपटात कास्ट केले. यानंतर काही वेळातच विजयला दिग्दर्शक तेजाच्या चित्रपटाची ऑफर मिळाली. एके दिवशी दिग्दर्शकाच्या ऑफिसबाहेर बसून विजयला वाटले हे सगळे किती सोपे आहे. फक्त 5 नाटके आणि 2 चित्रपटांची ऑफर. मात्र हे चित्रपट कधीच बनले नाहीत.

विजय देवरकोंडाच्या पहिल्या ऑडिशन क्लिपमधील स्टिल
विजय देवरकोंडाच्या पहिल्या ऑडिशन क्लिपमधील स्टिल

विजयचे कॉलेज संपवून एक वर्ष उलटले, पण त्याला काम मिळत नव्हते. आईवडिलांनी त्याने एमबीए करावे असे सुचवले. विजयने एका डान्स अकादमीत प्रवेश घेतला आणि फिटनेसवर लक्ष केंद्रित केले. विजयने अभिनेता होण्याचा हट्ट सोडून नोकरी करावी, अशी त्याच्या आईची इच्छा होती, पण वडिलांची इच्छा होती की, विजयने लेखक किंवा सहाय्यक होऊन तरी फिल्म इंडस्ट्रीतच काम करत राहावे. तर विजयची बहीण त्याला बँकेतील नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करत होती.

निवडक चित्रपटांनंतरच 'अर्जुन रेड्डी'द्वारे बनला स्टार
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर विजयला शेखर कम्मुलांच्या चित्रपटासाठी ऑडिशन देण्याची संधी मिळाली. विजयची चित्रपटासाठी निवड झाली आणि त्याला 2012 मध्ये आलेला 'लाइफ इज ब्यूटीफुल' हा चित्रपट मिळाला. मात्र, त्याआधी त्याने 'नुव्विला' (2011) मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या बळावर विजय कॅरेक्टर आर्टिस्टहून हिरो बनला. 2016 मध्ये आलेला 'पेल्ली चोपुलु' हा त्याचा मुख्य अभिनेता म्हणून पहिला चित्रपट होता.

'अर्जुन रेड्डी' चित्रपटातील विजय देवरकोंडाचा लूक.
'अर्जुन रेड्डी' चित्रपटातील विजय देवरकोंडाचा लूक.

2017 च्या 'द्वारका'नंतर विजयला 'अर्जुन रेड्डी' हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाने विजयचे नशीब पालटले. या चित्रपटासाठी विजयला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (तेलुगु) पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पुढे, महानती, गीता गोविंदा, डिअर कॉम्रेड यांसारखे हिट चित्रपट देऊन विजय स्टार झाला. जवळपास 12 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत विजय देवरकोंडाने 'लाइगर' या हिंदी चित्रपटासह 17 चित्रपटांमध्ये काम केले आहे. विजयने 2022 मध्ये आलेल्या 'लाइगर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. आज विजय देवरकोंडा हा दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

फॅशन ब्रँड आणि प्रोडक्शनमधूनही करतो मोठी कमाई
चित्रपटांमध्ये यश मिळवल्यानंतर विजयने 2018 मध्ये त्याचा फॅशन ब्रँड राउडी वेअर लाँच केला. 2020 मध्ये, विजयचा हा ब्रँड Myntra वर आला आहे. अभिनय आणि ब्रँडिंगसोबतच विजयने निर्मिती क्षेत्रातही हात आजमावला आहे. 2019 मध्ये विजयने 'मीथू माथरामे चेपथा' या चित्रपटाची सह-निर्मिती केली. याशिवाय विजय हैदराबादच्या ब्लॅक हॉक्स व्हॉलीबॉल संघाचाही मालक आहे.

विजय त्याचे फॅशन ब्रँड राउडीचा टी-शर्ट घालून एका कार्यक्रमात पोहोचला होता.
विजय त्याचे फॅशन ब्रँड राउडीचा टी-शर्ट घालून एका कार्यक्रमात पोहोचला होता.

सामाजिक कार्यातही अग्रेसर, एनजीओने 17 हजार लोकांना मदत केली
पुलवामा हल्ल्यानंतर विजयने आपल्या देवरकोंडा फाउंडेशनच्या माध्यमातून शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी देणगी दिली. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकणारा बॉक्सर गणेश अंबारी याला विजयने त्याच्या हलाखीच्या परिस्थितीत 24,000 रुपयेही दिले होते. कोरोना काळातही विजयने 1.7 कोटी रुपये खर्च करून 17 हजार कुटुंबांना रेशन दिले होते. 8500 स्वयंसेवक विजयच्या फाउंडेशनशी निगडीत आहेत.

एका चाहत्याची शेवटची इच्छा पूर्ण केली

2 वर्षांपूर्वी विजय देवरकोंडाच्या एका चाहत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्या चाहत्याची विजय देवरकोंडाला भेटण्याची शेवटची इच्छा होती. विजयला ही गोष्ट समजताच त्याने लगेचच आपल्या चाहत्याला भेटायला होकार दिला. त्यावेळी लॉकडाऊन सुरू होता. त्यामुळे विजय त्या चाहत्याशी व्हिडिओ कॉलिंगवरच बोलला. यानंतर विजयने त्याच्या चाहत्याला राउडी वेअर ब्रँडचा टी-शर्ट पाठवला होता. विजयने चाहत्याला शब्द दिला की, लॉकडाऊन संपताच तो त्याला भेटायला येईल. पण दुर्दैवाने भेटण्यापूर्वीच चाहत्याचा मृत्यू झाला होता.

चाहत्याच्या मृत्यूनंतर विजय देवरकोंडाने त्यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली होती.
चाहत्याच्या मृत्यूनंतर विजय देवरकोंडाने त्यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली होती.

स्टेजवर चाहतीकडून हल्ला, खाली कोसळला
'अर्जुन रेड्डी' या चित्रपटापासून विजय देवरकोंडाचे देशभरात विशेषतः महिलांमध्ये मोठी फॅन फॉलोइंग आहे. विजय एकदा 'डिअर कॉम्रेड'च्या प्रमोशनसाठी मुंबईला पोहोचला होता. विजयने स्टेजवर येऊन चाहत्यांशी संवाद सुरू करताच एक चाहती सुरक्षा तोडून विजयजवळ आली. तिने त्याचे पाय घट्ट पकडले, ज्यामुळे तो खाली पडला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा पथकाने त्या महिलेला मंचावरून खाली नेले. त्यावेळी विजय माइकवर गमतीने म्हणाला होता की, हे चाहत्यांचे प्रेम आहे की हल्ला.

100 चाहत्यांना मोफत मनालीला पाठवले, दरवर्षी बनतो सांता
विजय देवरकोंडाने 5 वर्षांपूर्वी नाताळला विशेष परंपरा सुरू केली आहे. दरवर्षी विजय त्याच्या निवडक 100 चाहत्यांना त्याच्याकडून भेटवस्तू देतो. 2022 मध्ये त्याने ख्रिसमसच्या दिवशी 100 चाहत्यांची निवड केली, ज्यांना त्याने विनामूल्य मनाली ट्रिप दिली. या चाहत्यांच्या खाण्यापिण्याचा सर्व खर्च विजयने स्वतः केला होता.

34 वर्षांचा विजय 55 कोटींचा मालक

विजय देवरकोंडाची एकूण संपत्ती 55 कोटी रुपये आहे. विजय प्रत्येक चित्रपटासाठी 12-15 कोटी रुपये घेतो. विजयने काही महिन्यांपूर्वी हैदराबादच्या ज्युबली हिल भागात 15 कोटी रुपयांचे घर खरेदी केले आहे. विजयच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज बेंझ जीएलसी आहे, ज्याची किंमत सुमारे 68 लाख आहे. याशिवाय त्याच्याकडे Volvo XC 90, Range Rover, Ford Mustang, BMW-5 सिरीज या आलिशान गाड्या आहेत.

BMW 5 सिरीजसोबत पोझ देताना विजय देवरकोंडा
BMW 5 सिरीजसोबत पोझ देताना विजय देवरकोंडा

विजय कायम बोल्ड आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो

  • विजय देवरकोंडा स्टारर 'लाइगर' या चित्रपटात विदेशी पैसा बेकायदेशीरपणे गुंतवल्याचा आरोप होता. या प्रकरणाचा तपास करताना ईडी (अंमलबजावणी विभाग) ने विजयची चौकशी केली होती. 8 तासांच्या चौकशीनंतर विजयने सांगितले होते की, हे नाव आणि प्रसिद्धी मिळविण्याचे दुष्परिणाम आहेत.
  • विजय देवरकोंडाच्या 'लाइगर' या चित्रपटावर सातत्याने बहिष्कार टाकला जात होता. यावर प्रतिक्रिया देताना विजय म्हणाला होता की, मी अशा लोकांना घाबरत नाही. आम्ही खूप मेहनत घेऊन हा चित्रपट बनवला आहे. आम्ही खूप मेहनत केली आहे. मला कोण थांबवणार ते मी पाहतो. पण या विजयच्या या वक्तव्याचा परिणाम म्हणजे हा चित्रपट फ्लॉप झाला. तेव्हा थिएटर मालकांनी विजयचा उद्धटपणा हे चित्रपट फ्लॉप होण्याचे कारण असल्याचे सांगितले होते.
  • द कॅम्पेनला दिलेल्या मुलाखतीत विजय देवरकोंडा म्हणाला होता की, प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार नसावा कारण लोक काही रुपयांना आणि थोड्या दारूसाठी विकले जातात. श्रीमंतांनीही मतदान करू नये, असेही विजय म्हणाला होता.
  • शाहरुख स्वतःला जगातील शेवटचा स्टार म्हणवतो. एका मुलाखतीत विजय म्हणाला होता की, शाहरुख तू चुकीचा आहेस, तू जगातील शेवटचा स्टार नाहीस. मी येतोय. लाइगर फ्लॉप झाल्यावर या कमेंटमुळे विजयची खिल्ली उडवली गेली होती.