आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'द कश्मिर फाइल्स'नंतर विवेक अग्निहोत्रींच्या नव्या चित्रपटाची घोषणा:'द व्हॅक्सिन वॉर'चे पोस्टर रिलीज, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'द कश्मिर फाइल्स'नंतर विवेक रंजन अग्निहोत्री कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार याची उत्सुकता होती. आता ही उत्सुकता ताणून न धरता विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'द व्हॅक्सिन वॉर' हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. अग्निहोत्री यांनी अलीकडेच सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर करत शीर्षकावरुन उत्सुकता निर्माण केली होती.

'द व्हॅक्सिन वॉर' हा चित्रपट पुढील वर्षी 15 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. तब्बल 11 भाषांमध्ये तो रिलीज केला जाणार आहे. हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगालीमध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत कॅप्शन दिले, 'सादर करत आहोत- ‘द व्हॅक्सिन वॉर’. भारताने लढलेल्या युद्धाची एक अविश्वसनीय सत्य कथा. हा चित्रपट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीस येईल. हा चित्रपट 11 भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्या.' हा चित्रपट भारतीय जैवशास्त्रज्ञ आणि स्वदेशी लसी या विषयांवर आधारित असून या महिन्यापासून चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. आ

आपल्या नवीन कलाकृतीबद्दल बोलताना विवेक रंजन अग्निहोत्री म्हणाले, "कोविड लॉकडाऊन दरम्यान जेव्हा 'काश्मीर फाइल्स' पुढे ढकलण्यात आला, तेव्हा मी यावर संशोधन सुरू केले. मग आम्ही ICMR आणि NIV च्या शास्त्रज्ञांसोबत संशोधन सुरू केले ज्यांनी आमची स्वतःची लस शक्य केली. त्यांच्या संघर्षाची आणि बलिदानाची कहाणी जबरदस्त होती आणि संशोधन करताना आम्हाला समजले की, हे शास्त्रज्ञ भारताविरुद्ध केवळ परदेशी एजन्सीच नव्हे तर आपल्याच लोकांकडून कसे लढले. तरीही, आम्ही सर्वात वेगवान, स्वस्त आणि सुरक्षित लस तयार करून महासत्तांवर विजय मिळवला. प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाचा अभिमान वाटावा यासाठी ही कथा सांगावी असे मला वाटले.'

पल्लवी जोशी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. निर्मात्यांनी अद्याप कलाकारांची घोषणा केलेली नाही.

नेटकऱ्यांनी 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटासाठी विवेक अग्निहोत्री यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'हा एक सुपर डुपर हिट चित्रपट असेल. मी माझ्या मित्रांसोबत फर्स्ट डे फर्स्ट शो बघेन.' अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली.

बातम्या आणखी आहेत...