आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जात असताना 'द केरला स्टोरी'च्या टीमला अपघात, अदा शर्माने दिले हेल्थ अपडेट

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सध्या तिच्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटाला मिळालेले यश साजरे करत आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडलेला हा चित्रपट 5 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा एक प्रोपगंडा चित्रपट आहे, असे म्हणत अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. पण तसे जरी असले तरी चित्रपटगृहात हा चित्रपट खूप चांगली कामगिरी करताना दिसत आहे. आता या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जाताना चित्रपटाच्या टीमला अपघात झाला आहे. अदा शर्मासह चित्रपटाच्या दिग्दर्शकाने ट्वीट करत चाहत्यांना हेल्थ अपडेट दिले आहे.

अभिनेत्री अदा शर्मा आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन रविवारी तेलंगणामधील करीमनगर येथे हिंदू एकता यात्रेत सहभागी होण्यासाठी जात होते. पण या यात्रेसाठी जात असताना त्यांच्या टीमच्या गाडीला अपघात झाला. टीममधील काही जणांना रुग्णालयात भरती करावे लागले.

अदा शर्माने चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
अदा शर्माने ट्वीट करत लिहिले, "आम्ही ठीक आहोत. आमच्या अपघाताची बातमी पसरल्याने बरेच मेसेज आले. आमची संपूर्ण टीम सुखरूप आहे. कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही आणि काळजी करण्याचे कारण नाही," असे अदा म्हणाली.

सुदीप्तो सेन यांनी दिली अपघाताची माहिती
दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी ट्वीट करत अपघाताची माहिती दिली होती. आम्ही एका युवा सभेत चित्रपटाबद्दल चर्चा करण्यासाठी करीमनगर येथे जात होतो. मात्र दुर्दैवाने हेल्थ इश्यूमुळे आम्ही प्रवास करू शकत नाहीये. करीमनगरच्या लोकांची आम्ही मनापासून माफी मागतो, असे ते म्हणाले होते.

सोबतच प्रकृतीविषयी माहिती देताना दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले, "तुम्ही आमच्याबद्दल दाखवलेल्या काळजीसाठी आम्ही आभारी आहोत. आमच्याबद्दल वाटणारी काळजी व्यक्त करण्यासाठी तुम्ही केलेले फोन आणि मेसेज पाहून आम्ही भारावलो आहोत. आम्ही सर्व सुखरूप आहोत आणि उद्यापासून आम्ही पुन्हा एकदा प्रमोशनल इव्हेंट्समध्ये सहभागी होणार आहोत. आम्हाला असाच पाठिंबा देत राहा."

100 कोटी क्लबमध्ये दाखल झाला 'द केरला स्टोरी'

'द केरला स्टोरी' या चित्रपटाने 9 दिवसांमध्ये 100 कोटींची कमाई केली. 2023 चा हा 100 कोटी क्लबमध्ये सामील झालेला चौथा चित्रपट ठरला आहे. सुदीप्तो सेन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून विपुल शाह यांची निर्मिती आहे.