आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'द केरला स्टोरी' चित्रपटावर बंदी आणावी:'हे खोटे कथानक संघ परिवारानेच रचलेले' - केरळचे मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विपुल शाह यांची निर्मिती असलेला आणि सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाचा टिझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्यावर टीकेची झोड उठली आहे. काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) च्या युथ लीगने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आता केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीदेखील या चित्रपटावर भाष्य केले आहे. हा ‘आरएसएस’चा अजेंडा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.

चित्रपटात 32 हजार महिलांनी धर्मपरिवर्तन केल्याचा दावा
'द केरला स्टोरी' या चित्रपटाच्या ट्रेलरनुसार, केरळच्या 32 हजार महिलांचे मुस्लिम धर्मात परिवर्तन करून त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या चित्रपटात चार महिलांची कथा दाखवण्यात आली आहे. त्यानुसार एका कटाअंतर्गत ब्रेनवॉश करुन त्यांचे धर्मपरिवर्तन केले जाते आणि नंतर त्यांना ISIS मध्ये सामील केले जाते.

चित्रपटात अभिनेत्री अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. अदासह योगिता बिहानी, सोनिया बलानी, सिद्धी इदनानी या अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका या चित्रपटात आहेत. 5 मे रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

विजयन म्हणाले - हे खोटे कथानक
केरळचे मुख्यमंत्री विजयन म्हणाले, "असे चित्रपट काढणारी मंडळी लव्ह जिहादचा मुद्दा उचलून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. केरळमध्ये लव्ह जिहादचा मुद्दा कोर्टाने, तपास यंत्रणांनी तसेच केंद्रीय गृहमंत्रालयानेही खोडून काढला आहे."

इंडिया टूडेच्या एका वृत्तानुसार विजयन म्हणाले, "ही मंडळी (आरएसएस) खोट्या गोष्टी आणि चित्रपटाच्या माध्यमातून धार्मिक तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत. संपूर्ण संघ परिवार कोणत्याही पुराव्याशिवाय या खोट्या गोष्टी पसरवत आहे. 32000 महिलांनी इस्लाम कबूल केला हे धादांत खोटे असल्याचे आम्ही या ट्रेलरमधून प्रथमच पाहिले. हे खोटे कथानक संघ परिवारानेच रचलेले आहे. अशा प्रचारकी चित्रपटांमधून मुस्लिमांप्रती निर्माण होणारा द्वेष हा त्यांना केरळच्या राजकारणात फायद्याचा ठरू शकतो."

नुकतेच कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनीदेखील या चित्रपटावर टीका केली. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, "कदाचित ही 'तुमच्या' केरळची कथा असू शकते, पण ही 'आमच्या' केरळची कथा बिलकुल नाही."

ख्रिश्चन समुहाने चित्रपटाला दिला पाठिंबा
केरळचे ख्रिश्चन समुह ख्रिश्चन असोसिएशन अँड अलायन्स फॉर सोशल अॅक्शनने (CASA) चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. केरळमधील अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या लव्ह जिहादचे सत्य हा चित्रपट सांगतो, असे त्यांनी म्हटले आहे.