आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात:'द केरला स्टोरी'चे पहिल्या दिवशी 7.5 कोटींचे कलेक्शन, 'सेल्फी' आणि 'शहजादा'ला पछाडले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विपुल शाह यांची निर्मिती असलेला 'द केरला स्टोरी' हा बहुचर्चित चित्रपट 5 मे रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. रिलीजपूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. अनेक ठिकाणी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. मात्र या वादाचा फायदाच चित्रपटाला झालेला दिसतोय. या चित्रपटाला रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून लोक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे कमाईचे आकडे समोर आले आहेत.

पहिल्याच दिवशी कोट्यवधीची कमाई
खरं तर या चित्रपटात फार मोठी स्टारकास्ट नाही. कथानकामुळे हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटातील 32 हजार महिलांच्या धर्मांतराचे दावे खोटे आहेत, असे म्हणत अनेक राजकीय पक्ष व धार्मिक संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. या सर्व गदारोळात हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि हा चित्रपट प्रेक्षकांची दाद मिळवतोय.

‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, ‘द केरला स्टोरी’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 7.5 कोटींचा व्यवसाय केला आहे. ही अंदाजे आकडेवारी आहे, त्यामुळे अधिकृत आकडेवारी आल्यानंतर त्यात थोडा बदल होऊ शकतो. विश्लेषकांच्या मते, हा चित्रपट वीकेंडमध्ये चांगले कलेक्शन करू शकतो.

2023 चा पाचवा सर्वात मोठा ओपनर ठरला
यावर्षी प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांचे कलेक्शन साधारण राहिले आहे. आता मे महिना सुरू झाला आहे पण आतापर्यंत फक्त पाच हिंदी चित्रपटांनी पहिल्या दिवशी चांगली ओपनिंग मिळवली आहे. शाहरुख खानच्या 'पठाण'ने 55 कोटी रुपयांसह इतिहासातील सर्वात मोठी ओपनिंग मिळवली. तर सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट 15.81 कोटींच्या कमाईसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

रणबीर कपूर स्टारर 'तू झुठी मैं मक्कार' हा चित्रपट 15.73 कोटी कमाईसह वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अजय देवगणचा 'भोला' 11.20 कोटी रुपयांसह चौथ्या क्रमांकावर आहे. आता 'द केरला स्टोरी' देखील 7.5 कोटींसह या यादीत पाचव्या क्रमांकावर आला आहे.

'सेल्फी' आणि 'शहजादा'ही मागे टाकले
विशेष गोष्ट म्हणजे, अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी स्टारर 'सेल्फी' आणि कार्तिक आर्यन-क्रिती सेनन स्टारर 'शहजादा' या चित्रपटांच्या ओपनिंग डे कलेक्शनला द केरला स्टोरी या चित्रपटाने मागे टाकले आहे.

'सेल्फी'ने पहिल्या दिवशी 2.55 कोटींची कमाई केली होती. तर 'शहजादा'चा पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा हा 6 कोटी रुपये इतका होता. असाच आणखी एक वादग्रस्त चित्रपट 'द कश्मीर फाइल्स'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 3.5 कोटी रुपये कमावले होते.

'द केरला स्टोरी' या चित्रपटाची निर्मिती 30 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी 'द केरळ स्टोरी' 3 ते 5 कोटींची कमाई करेल, असा अंदाज वर्तवला गेला होता. पण अपेक्षेपेक्षा अधिकचा गल्ला या चित्रपटाने जमवला आहे. या चित्रपटात अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अदा शर्मासह या चित्रपटात योगिता बिहानी, सिद्धी इडनानी आणि सोनिया बलानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

'द केरला स्टोरी' या चित्रपटाचे कथानक नर्सिंग महाविद्यालयात शिकणाऱ्या शालिनी उन्नीकृष्णनवर आधारित आहे. केरळमधील मुलींचे धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसे सामील केले जाते हे सांगणारा 'द केरला स्टोरी' हा चित्रपट आहे. 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाला प्रपोगंडा म्हटले जात आहे. याबद्दल बोलताना निर्माते विपुल शाह म्हणाले की, "द केरला स्टोरी' हा प्रपोगंडा असल्याचे म्हणण खूप सोपे आहे. पण या चित्रपटावर टीका करणाऱ्यांनी मुळातच हा चित्रपट पाहिलेला नाही. चित्रपट न पाहताच ते वेगवेगळे अंदाज बांधत आहेत."

चित्रपटातील 10 सीन्स हटवले
रिलीजपूर्वी सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला कात्री लावली. इंडिया टुडेने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने 'द केरला स्टोरी' चित्रपटाला हिरवा कंदील देताना या चित्रपटातील 10 सीन्स हटवण्यास सांगितले होते. केरळचे माजी मुख्यमंत्री वीएस अच्युतानंदन यांच्या मुलाखतीचा सीन देखील हटवण्यात आला आहे. इतकच नाही तर हिंदू देवतांचा उल्लेख असलेले डॉयलॉग आणि अनुचित संदर्भ हटवण्याचा आदेश निर्मात्यांना देण्यात आले होते.