आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समर्थन:'द केरला स्टोरी'च्या समर्थनार्थ PM मोदी म्हणाले- 'चित्रपटाने दहशतवादाचा नवा चेहरा उघड केला', कंगनानेही दिला पाठिंबा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने 7.50 कोटींचा व्यवसाय केला. मात्र रिलीजपूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. चित्रपट तथ्यांवर आधारित नसून प्रोपगंडा करणारा असल्याचे केरळ सरकारने म्हटले. शिवाय चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणीही केली गेली. मात्र कोर्टाने त्यास नकार दिला. सातत्याने सुरू असलेल्या या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वक्तव्य केले आहे. बेल्लारी येथील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी ‘द केरला स्टोरी’वर भाष्य केले.

दहशतवादी प्रवृत्तीच्या पाठीशी काँग्रेस उभी आहे - PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "दहशतवादी कट असलेल्या एका कथानकावर आधारित चित्रपट ‘द केरला स्टोरी’ सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट केवळ एका राज्यातल्या दहशतवादी कटांवर आधारित आहे. केरळ हे देशातले खूप सुंदर राज्य आहे. केरळमधले लोक खूप परिश्रमी आणि प्रतिभावान असतत. परंतु त्याच केरळमध्ये सुरू असलेल्या दहशतवादाचा नवा चेहरा उघड केला आहे."

ते पुढे म्हणाले, "बॉम्ब-बंदूक आणि पिस्तूलाचा आवाज ऐकू येतो. परंतु समाजाला आतून पोखरण्याचा आवाज येत नाही. कोर्टानेही आतंकवादाच्या या स्वरुपाबाबत चिंता व्यक्त केल्या आहेत. परंतु आपल्या देशाचे दुर्भाग्य बघा. आपल्या समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या या दहशतवादी प्रवृत्तीच्या पाठीशी काँग्रेस उभी आहे."

ISIS ही दहशतवादी संघटना आहे, हे सर्व जगाला माहीत आहे - कंगना

अभिनेत्री कंनगा रनोट हिनेदेखील 'द केरला स्टोरी' या चित्रपटाचे समर्थन केले आहे. दहशतवादी संघटना ISIS वगळता चित्रपटात कोणालाही वाईट दाखवण्यात आलेले नाही, असे तिने म्हटले आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात या चित्रपटाविषयी बोलताना कंगना रनोट म्हणाली, 'मी अद्याप चित्रपट पाहिला नाही, पण त्यावर बंदी घालण्याचे बरेच प्रयत्न झाले आहेत. कोर्टानेही त्याच्यावर बंदी आणलेली नाही. माझ्या मते, जेव्हा देशातील सर्वात जबाबदार संस्था उच्च न्यायालय हे सांगत आहे, तेव्हा हेच सत्य आहे. ISIS ही दहशतवादी संघटना आहे, असे मी नाही तर असे देशाचे गृहमंत्रालय आणि संपूर्ण जग सांगत आहे. ती दहशतवादी संघटना नाही असे जर तुम्ही समजत असाल तर तुम्हीही दहशतवादी आहात हे उघड आहे.'

विपूल शाह यांनीही दिली प्रतिक्रिया
द केरला स्टोरी या चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, "केरळ उच्च न्यायालयाने इतका चांगला निकाल दिला आणि आमच्या चित्रपटाबद्दल आदरणीय पंतप्रधान स्वतः बोलले. यापेक्षा सुंदर सकाळ होऊच शकत नाही, कारण आम्ही चित्रपटाद्वारे जो मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याबद्दलच पंतप्रधान बोलले. हा चित्रपट दहशतवादाविरुद्धचा चित्रपट आहे, तो कोणत्याही समुदायाच्या, धर्माच्या विरोधात नाही आणि त्याबद्दल माननीय पंतप्रधानांशिवाय कोणीही बोलले नाही."