आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'द केरला स्टोरी' हा चित्रपट 5 मे रोजी चित्रपटगृहांत दाखल झाला आहे. काही लोक चित्रपटावर टीका करत आहेत, तर काहींनी त्याला पाठिंबा दिला आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र चांगली कमाई करत आहे. अनेक राज्यांत हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे, तर काही राज्यांत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत या चित्रपटावर बंदी घातली आहे. चित्रपटाबाबत घेतलेल्या या निर्णयामुळे निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 8 मे रोजी विपुल शाह आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी एक पत्रकार परिषद घेतली. आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देऊ असे ते म्हणाले आहेत.
चित्रपटावर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये बंदी घातल्याबाबत निर्माते विपुल शाह यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, 'तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील राज्य सरकारांनी जर असा निर्णय घेतला तर आम्ही कायदेशीर कारवाई करू. कोर्टाने चित्रपटाला परवानगी दिल्यानंतर ते थांबवणारे कोण आहेत? आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देऊ. कायद्याच्या तरतुदीनुसार जे शक्य असेल ते आम्ही करू. देशातील एक गंभीर समस्या आम्ही चित्रपटातून मांडली आहे,' असे ते म्हणाले आहेत.
हायकोर्टात जाऊन लढू
विपुल यांनी पुढे सांगितले की, 'देशातील नगारिकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. चित्रपटाचा विषय महत्त्वाचा असून तो जास्तीत जास्त लोकापर्यंत जायला हवा. पंतप्रधानांनी देखील या चित्रपटावर भाष्य केले आहे. काहींनी या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी याला विरोध केला आहे. राष्ट्रीय पातळीवर या चित्रपटाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. ही गोष्ट आमच्यासाठी नक्कीच अभिमानाची आहे. तामिळनाडूमध्ये केवळ एका व्यक्तीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले गेले आहे. त्यामुळे तमिळनाडूमधील सरकारला मी निवेदन करतो की याविरोधात कठोर कारवाई करा आणि चित्रपटाच्या प्रदर्शनातील अडसर दूर करा.'
इंडस्ट्रीतील मित्रांना चित्रपटापासून दूर राहण्यास सांगितले
विपुल यांनी सांगितले की, त्यांनी इंडस्ट्रीतील त्यांच्या मित्रांना चित्रपटाचे प्रमोशन करू नका, कारण ते वादात सापडू शकतात असे सांगितले होते. मात्र असे असूनही विद्युत जामवालने चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. यावरून त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.
या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा कर्नाटक निवडणुकीशी काहीही संबंध नाही
कर्नाटक निवडणुकीच्या काळातच हा चित्रपट का प्रदर्शित झाला, असा प्रश्न विपुल शाह यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, 'आम्ही या चित्रपटावर ती वर्षांपूर्वी काम करायला सुरुवात केली होती, त्यावेळी आता कर्नाटकची निवडणूक होईल, याचा विचार केला नव्हता. या देशात निवडणुका होतच राहतात, याचा अर्थ आम्ही चित्रपट प्रदर्शित करु नये, असा होत नाही.'
हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही
मुस्लीमविरोधी चित्रपट असल्याच्या आरोपावर विपुल म्हणाले, 'मी याआधीही अनेकदा म्हटले आहे की, आमचा चित्रपट कोणत्याही समाज आणि जातीविरोधात नाही. हा फक्त दहशतवादाच्या विरोधात आहे. या प्रकरणावर ज्याला राजकारण करायचे आहे, त्यांनी ते करा. अंतिम उत्तर मात्र प्रेक्षक देतात,' असे ते म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.