आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनामुळे अनेक राज्यांत चित्रपटगृहे बंद असल्याचे किंवा निम्म्या प्रेक्षकसंख्येने ती सुरू असल्याने बॉलिवूडमधील निर्माते चित्रपट प्रदर्शित करणे टाळत आहेेत. तामिळनाडूतही निम्म्या प्रेक्षकसंख्येवर चित्रपटगृहे सुरू असली तामिळ अभिनेता थलपती विजयचा चित्रपट 'मास्टर’ केवळ प्रदर्शितच झाला असे नव्हे तर त्याने पहिल्याच दिवशी कमाईचा विक्रम केला. वर्ल्डवाइड या चित्रपटाने 53 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. आता या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा हिंदी रिमेक येणार आहे.
'कबीर सिंग' चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी ‘मास्टर’ चित्रपटाची लोकप्रियता पाहता चित्रपटाचे हक्क खरेदी केल्याचे समोर आले आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, मुराद खेतानी दोन आठवड्यांपूर्वी 'मास्टर' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी हैदराबदला गेले होते. त्यांना चित्रपट प्रचंड आवडला आणि त्यांनी चित्रपटाचे हक्क खरेदी केले आहेत. त्यासाठी त्यांनी मोठी रक्कमही दिली असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटाच्या रिमेकसाठी बॉलिवूडमधील दोन कलाकारांची निवड करण्यात येणार असल्याचे म्हटले जाते. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
तामिळनाडूत निम्म्या प्रेक्षकसंख्येवर चित्रपटगृहे सुरू आहेत. मात्र तरीदेखील 'मास्टर’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचा विक्रम केला. चित्रपटाने केवळ तामिळनाडूत पहिल्या दिवशी 25 कोटी कमावले. तर, देशभरात सुमारे 42 कोटींचा व्यवसाय केला. परदेशातही पहिल्या दिवशी चांगली कमाई झाली. केवळ ऑस्ट्रेलियात पहिल्या दिवशी 2.48 लाख डॉलर (1.82 कोटी) कमाई झाली आहे. तेथे पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा दाक्षिणात्य चित्रपट ठरला. हिंदी, तेलुगू व कानडीतही चित्रपट डब करण्यात आला आहे. ओव्हरसीजमध्ये एकुण 11 कोटींचा व्यवसाय या चित्रपटाने केला आहे.
कोरोना काळातील हा प्रतिसाद चित्रपट उद्योगाचा उत्साह वाढवणारा ठरला. सामान्य परिस्थितीत हा चित्रपट प्रदर्शित झाला असता तर इतिहासात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी तो एक ठरला असता. तरीही, आठवडाअखेरपर्यंत ही कमाई 100 कोटींपर्यंत जाऊ शकते.
‘मास्टर’च्या निर्मात्यांनी शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेंडही माेडला. बुधवार, 13 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. याचा चांगला फायदा झाला. कारण, अनेक भागांत 13 ते 15 जानेवारीदरम्यान लोहडी, मकरसंक्रांत, पोंगलसारख्या सणाचा उत्साह होता. त्यानंतर 16 जानेवारीला शनिवार व 17 ला रविवार आहे. यामुळे चित्रपट आणखी कमाई करेल. तिकीट बुकिंग साइट ‘बुक माय शो’चे आशिष सक्सेना म्हणाले, ‘मास्टर’ हा चित्रपट लॉकडाऊननंतर तिकीट खिडकीवर गर्दी खेचणारा पहिला चित्रपट आहे, यात वाद नाही. एक लाखाहून अधिक अॅडव्हान्स बुकिंग आज आमच्याकडे आहे. निर्माते गिरीश जोहर म्हणाले, बॉक्स ऑफिसला यामुळे दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील अनेक चित्रपटगृहांचे मालक असलेले अक्षय राठी 'मास्टर’च्या यशामुळे भारावले आहेत. ते म्हणाले, ‘आता चित्रपट सिनेमागृहांत प्रदर्शित करावेत, अशी मागणी निर्मात्यांकडे करण्यात आली आहे.’ विशेषत: सलमान खानने “राधे’ हा चित्रपट ईदच्या निमित्ताने सिनेमागृहांत प्रदर्शित करावा, असा आग्रह आहे. सूर्यवंशी, 83 आणि ‘शमशेरा’च्या निर्मात्यांकडेही मागणी करण्यात आली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.