आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'पठाण'च्या अभूतपूर्व यशानंतर यशराज फिल्म्सला आता सलमान आणि शाहरुखला पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र आणायचे आहे. पण यावेळी हे कलाकार पाहुण्याच्या कलाकाराच्या रुपात दिसणार नसून दोघांचीही चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहे. त्यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहे. यशराज फिल्म्सने याला दुजोरा दिला आहे. भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा चित्रपट असेल, असे म्हटले जात आहे. हा चित्रपट यशराज स्पाय युनिव्हर्सचा एक भाग असेल. यशराज फिल्म्सचे सर्वेसर्वा आदित्य चोप्रा यांचा सिद्धार्थवर खूप विश्वास आहे, त्यामुळेच त्यांनी या बिग प्रोजेक्टसाठी सिद्धार्थची निवड केली आहे.
सिद्धार्थचा ड्रीम प्रोजेक्ट असेल 'टायगर वर्सेस पठाण'
सिनेविश्लेषक तरण आदर्श यांनी अलीकडेच यशराज स्पाय युनिव्हर्सच्या काही आगामी चित्रपटांचा उल्लेख केला होता. ज्यामध्ये 'वॉर 2', 'टायगर 3' आणि 'पठाण वर्सेस टायगर' या प्रोजेक्टचा समावेश होता. यामध्ये आता 'टायगर वर्सेस पठाण'ची सर्वाधिक चर्चा होत आहे. इथे पठाण आणि टायगर कोणाला म्हटले जात आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. पठाण म्हणजेच शाहरुख खान आणि टायगर म्हणजेच सलमान खान. आता हे दोघेही बऱ्याच दिवसांनी संपूर्ण चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या दोन सुपरस्टार्सच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सिद्धार्थ आनंदकडे देण्यात आली आहे.
डेडलाइनच्या रिपोर्टनुसार, आदित्य चोप्रांचा सिद्धार्थ आनंदच्या कामावर प्रचंड विश्वास आहे. सर्वात मोठा चित्रपट बनवण्यासाठी त्याला जी काही मदत हवी ती प्रोडक्शन टीमच्या माध्यमातून दिली जाणार आहे. चित्रपटाचे शूटिंग जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे. दरम्यान हृतिक रोशन स्टारर 'वॉर 2' हा मोठा चित्रपट सिद्धार्थ आनंदच्या हातातून गेला होता. त्याच्या जागी आता अयान मुर्खजीला हा चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र, आता सिद्धार्थच्या हातात सर्वात मोठा चित्रपट आला आहे.
शाहरुख-सलमान आता कॅमिओ नाही तर पूर्ण चित्रपटात एकत्र काम करणार आहेत
शाहरुख आणि सलमान पहिल्यांदा 1995 मध्ये आलेल्या 'करण अर्जुन' या चित्रपटात एकत्र दिसले होते. हा चित्रपट त्या काळात खूप गाजला होता. त्यानंतर दोघांनी 'हम तुम्हारे हैं सनम'मध्ये एकत्र काम केले. 'कुछ कुछ होता है'मध्ये सलमान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होता. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर शाहरुख खानच्या 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'झिरो'मध्येही सलमानचा कॅमिओ होता. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पठाण' या चित्रपटात सलमानचा दमदार कॅमिओ पाहायला मिळाला. आता या दोघांना चित्रपटात एकत्र कास्ट करण्यासाठी यशराज फिल्म्स सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
यशराजची स्पाय युनिव्हर्स ही सर्वात मोठी फ्रेंचाइजी म्हणून उदयास आली आहे
मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सबद्दल आपण अनेकदा ऐकतो. 'अॅव्हेंजर्स' सिरीज, 'आयर्न मॅन' सिरीज, 'कॅप्टन अमेरिका' आणि 'थॉर'चे सर्व चित्रपट या युनिव्हर्सचा भाग आहेत. रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्सही बॉलिवूडमध्ये खूप लोकप्रिय आहे. 'सिंघम', 'सिंघम रिटर्न्स', 'सिम्बा' आणि 'सूर्यवंशी' सारखे चित्रपट देखील या कॉप युनिव्हर्सचा भाग आहेत.
आता यशराजचे स्पाय युनिव्हर्स सुरू झाले आहे. यात बनलेले सर्व चित्रपट हेरगिरीच्या पार्श्वभूमीवर आधारित असतील. या युनिव्हर्सचा पहिला चित्रपट 2012 मध्ये आलेला सलमान खानचा 'एक था टायगर' हा चित्रपट होता.
यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्स अंतर्गत 'पठाण' हा चौथा चित्रपट आहे. याआधी 'टायगर जिंदा है', 'एक था टायगर' आणि 'वॉर' हे चित्रपट स्पाय युनिव्हर्सचा भाग होते. येत्या काळात या युनिव्हर्समध्ये आणखी काही नवे चित्रपट दाखल होणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.