आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'मोगॅम्बो खूश हुआ'...'त्या' भारदस्त आवाजातील हे तीन शब्द कानांवर पडले की समोरच्याचा थरकाप झालाच म्हणून समजा. 'मि. इंडिया' या सिनेमात अमरीश पुरी यांनी साकारलेली मोगॅम्बोची व्यक्तिरेखा विसरणे केवळ अशक्य. अशा एकापेक्षा एक सरस खलनायकी व्यक्तिरेखा, चरित्र भूमिका साकारणारे अमरीश पुरी यांचा आज स्मृतीदिन आहे. 22 जून रोजी 1932 रोजी लाहोर, पंजाब (आता पाकिस्तान) येथे जन्मलेल्या अमरीश यांचे 12 जानेवारी 2005 रोजी ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले होते. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या मृत्यूनंतर 'मोगॅम्बो खामोश हुआ' असे वृत्तपत्रांचे मथळे होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली. जाणून घेऊयात त्यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी -
अमरीश पुरी यांचे दोन थोरले बंधू मदन पुरी आणि चमन पुरी अॅक्टिंग क्षेत्रात यशोशिखरावर होते. मात्र तरीसुद्धा अमरीश यांना अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणे एवढे सोपी नव्हते. असे म्हटले जाते, की पहिल्या स्क्रिन टेस्टमध्ये ते अपयशी ठरले होते. त्यानंतर त्यांनी एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन कंपनीत काम सुरु केले होते.
भारदस्त आवाज, भेदक नजर आणि करारी, देखणे रुप असलेल्या अमरीश पुरी यांना बॉलिवूड सिनेमांमध्ये हीरो बनायचे होते. मात्र त्यांच्या नशीबात काही वेगळेच लिहिले होते. ते हीरो नाही मात्र बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक बनले. अमरीश पुरी यांनी आपल्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत सर्वाधिक नकारात्मक भूमिका साकारल्या. आपल्या वडिलांविषयी राजीव पुरी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की ''पापा तारुण्याच्या काळात हीरो होण्यासाठी मुंबईत आले होते. त्यांचे थोरले बंधू मदन पुरी सिनेसृष्टीत कार्यरत होते. निर्मात्यांनी त्यांना सांगितले, की त्यांचा चेहरा हीरोसारखा नाहीये. त्यामुळे ते खूप निराश झाले होते.''
रंगभूमीवरुन करिअरला सुरुवात
अमरीश यांनी 1961 मध्ये रंगमंचावर पहिले धडे गिरवले. रंगमंचावर काम करणे त्यांना खूप आवडत होते. त्यानंतर 1970 साली त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेता म्हणून ते सर्वश्रेष्ठ होतेच, पण ज्या निष्ठेने, कष्टांनी त्यांनी त्यांच्या वाटेला आलेल्या भूमिका केल्या, त्यामुळे त्यांची तुलना दिलीप कुमार, अमिताभ बच्चन यांच्यासारख्या सर्वस्व झोकून देणाऱ्या नटांशीच होऊ शकते, अशा शब्दांत दुबे यांनी त्यांची प्रशंसा केली होती. विजय तेंडुलकरांना अमरीश पुरी नाटककारांचा राजा म्हणत असत.
खूप कमी लोकांना माहिती आहे की, अमरीश पुरी यांच्या करिअरची सुरुवात मराठी सिनेमापासून झाली होती. 1967 सालच्या ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या सिनेमात अमरीश पुरींनी रेल्वे डब्यात गाणं गाणाऱ्या एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती.
जुन्या काळात सिनेमा व्यवसायाकडे हलक्या दर्जाचा व्यवसाय म्हणून पाहिले जायचे. त्यामुळे अमरीश पुरी यांचे सिनेमात जाणे त्यांच्या वडिलांना नामंजूर होते. अमरीश पुरी यांचे बंधू मदन पुरी आणि चमनभाई हे वडिलांचा विरोध असूनही या झगमगत्या दुनियेत शिरले आणि स्थिरावलेही. पुढे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अमरीश यांनीही मायानगरीत प्रवेश केला आणि नावलौकिक कमावला.
सुरुवातीच्या धकाधकीच्या काळात सिनेनिर्मात्यांकडे खेटे घालून झाल्यावर त्यांनी इ.एस.आय.एस.मध्ये नोकरी केली. तिथेच एका मराठी मुलीशी ओळख होऊन तिच्याशी ते विवाहबद्ध झाले. त्यांना एक मुलगा आणि मुलगी ही अपत्ये आहेत. राजीव आणि नम्रता ही त्यांच्या मुलांची नावे आहेत. राजीव पुरी यांनी सांगितल्याप्रमाणे, 'त्यांचे वडील खूपच शिस्तप्रिय होते. ते त्यांच्या नातवंडांच्या खूप जवळ होते. जेव्हा ते त्यांच्याबरोबर असायचे तेव्हा ते आम्हाला म्हणायचे की, चला आता तुम्ही जा. ही आम्हा मुलांची खेळायची वेळ आहे.''
वयाच्या 39 व्या वर्षी अमरीश पुरींनी ‘रेशमा और शेरा’ या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सुनील दत्त, अमिताभ बच्चन आणि वहिदा रेहमान यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘रेशमा और शेरा’ सिनेमात त्यांनी रहमत खान नावाच्या व्यक्तीचे पात्र साकारले होते.
1984 साली स्टिव्हन स्पीलबर्ग यांनी ‘इंडियाना जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम’ या हॉलिवूड सिनेमात अमरीश पुरींना ‘मोला राम’ नावाची भूमिका दिली होती. या भूमिकेसाठी त्यांनी पहिल्यांदा टक्कल केले होते. स्पीलबर्ग यांचे सर्वात आवडत्या अभिनेत्यांपैकी अमरीश पुरी एक होते.
अमरीश पुरींना टोप्यांची प्रचंड आवड होती. त्यांच्या घरी आजही वेगवेगळ्या देशांमधील जवळपास 200 टोप्यांचं कलेक्शन आहे.
12 जानेवारी 2005ला मुंबईमध्ये त्यांचं निधन झालं. 1967 पासून सुरु झालेला सिनेप्रवास शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे 2005 पर्यंत सुरु राहिला. त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे 2006 मध्ये रिलीज झालेला ‘कच्ची सडक’ हा सिनेमा अमरीश पुरींचा शेवटचा सिनेमा. अमरीश पुरी यांनी 1967 ते 2005 याकाळात 400 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले होते.
अमरीश पुरी यांनी अनेक सिनेमांमध्ये चरित्र भूमिका साकारल्या. यामध्ये 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'मुझसे शादी करोगे', 'हलचल', 'चाची 420', 'चोरी-चोरी चुपके-चुपके' या सिनेमांचा उल्लेख करावाच लागेल.
सत्तरच्या दशकात अमरिश पुरी यांनी निशांत', 'मंथन', 'भूमिका' आणि 'आक्रोश' या सिनेमांमध्ये काम केले होते. 80 च्या दशकात त्यांनी खलनायकाच्या रुपात अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या. 'हम पांच', 'नसीब', 'विधाता', 'हीरो', 'अंधा कानून' आणि 'अर्ध सत्य' यांसारख्या सिनेमांमधून त्यांनी खलनायकाच्या रुपात आपली वेगळी छाप सोडली. 1987मध्ये रिलीज झालेल्या 'मिस्टर इंडिया' या सिनेमातील त्यांनी साकारलेले 'मोगेम्बो' हे पात्र खूप प्रसिद्ध झाले होते. सिनेमातील 'मोगेम्बो खुश हुआ', हा संवाद आजही प्रेक्षकांच्या ओठी रेंगाळतो. करिअरच्या उत्तरार्धात त्यांनी चरित्र भूमिका साकारल्या. 'परदेस', 'ताल' और 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमात ते चरित्र भूमिकांमध्ये झळकले.
संगीत नाटक अकॅडमी अवॉर्ड, फिल्मफेअर बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर, महाराष्ट्र स्टेट गौरव पुरस्कार, कलाकार अवॉर्ड्स, स्टार स्क्रीन बेस्ट अवॉर्ड फॉर बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर, सिंगापुर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट अॅक्टर अवॉर्ड
अमरीश पुरी यांनी हिंदीसोबतच कन्नड, मराठी, पंजाबी, मल्याळम, तेलगु, तामिळ आणि निवडक हॉलिवूडपटांमध्ये काम केले. मात्र त्यांना खरी ओळख हिंदी सिनेमांमधूनच मिळाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.