आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्माचे गळफास घेण्याआधी शिझान खानसोबत बोलणे झाले होते. तसेच आरोपी शिझान हा तपासात सहकार्य करत नसल्याचीही माहिती पोलिसांनी दिली.
मुंबई पोलिसांनी आरोपी शिझानच्या 250 ते 300 पानांच्या व्हॉट्सअॅप चॅट्सचाही तपास केला आहे, मात्र शिझान खानने त्याच्या सिक्रेट गर्लफ्रेंडसोबतच्या चॅट डिलीट केल्या आहेत. शिझानची ही कथित गर्लफ्रेंडदेखील एक टीव्ही अभिनेत्री असून मुंबईत राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
तुनिषाचे मामा पवन शर्मा यांनी बुधवारी दावा केला की, शिझानसोबत रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर तुनिषा हिजाब घालू लागली होती. शिझानचे इतर मुलींशीही संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यायालयाने शिझानच्या पोलिस कोठडीत पुढील दोन दिवसांची वाढ केली आहे. क्रमाने सर्वकाही जाणून घ्या...
मामांचा आरोप- शिझानला भेटल्यानंतर तुनिषाने हिजाब घालायला सुरुवात केली होती
मीडियाशी बोलताना तुनिषाचे मामा म्हणाले, 'शिझानच्या संपर्कात आल्यापासून तुनिषाच्या वागण्यात बदल झाला होता. तिने हिजाब घालायला सुरुवात केली होती. शिझानचे इतर महिलांसोबतही संबंध आहेत, त्यामुळे पोलिसांनी प्रत्येक अँगलने या प्रकरणाचा तपास करावा, जेणेकरून सत्य सर्वांसमोर येईल.'
तुनिषाच्या मृत्यूच्या दिवशी शिझानने सिक्रेट गर्लफ्रेंडसोबत तासभर चॅट केले होते
वालीव पोलिसांनी एका नवीन अपडेटमध्ये सांगितले, तुनिषाच्या मृत्यूच्या दिवशी शिझानने त्याच्या सिक्रेट गर्लफ्रेंडसोबत अर्धा ते एक तास चॅट केले होते. शिझानच्या फोनमधून पोलिसांनी 250 ते 300 पानांचे व्हॉट्सअॅप चॅट आणि रेकॉर्डिंग जप्त केले आहे. तसेच सर्व चॅट स्कॅन केले.
पोलिसांनी शिझानला अनवाणी पायांनी ओढत नेले
बुधवारी पोलिसांनी शिझान खानला न्यायालयात हजर केले, ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलिस शिझानला अनवाणी पायांनी ओढत कोर्टात नेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान त्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. न्यायालयाने शिझानला दोन दिवसांची म्हणजेच 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी त्याला चार दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले होते.
या प्रकरणात कंगना रनोटची एन्ट्री
अभिनेत्री कंगना रनोटने तुनिषाच्या मृत्यू प्रकरणावर भाष्य केलंय. कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर लिहिले, 'एक स्त्री प्रेम, विवाह, नातेसंबंध किंवा अगदी आवडत्या व्यक्तीचं जाणं, या सर्व गोष्टींचा सामना करू शकते. पण तिच्या लव्ह स्टोरीमध्ये प्रेम नव्हतंच ही गोष्ट ती स्वीकारू शकत नाही. समोरच्या व्यक्तीसाठी तिचे प्रेम आणि असुरक्षितता हे तिचे शोषण करण्यासाठी पुरेसं होतं. तिचे प्रेम होते, तर समोरच्याला (शिझान) फक्त तिचा शारीरिक आणि भावनिक वापर करायचा होता.'
कंगना पुढे म्हणाली, 'अशा स्थितीत ती तिच्या स्वतःच्या आकलनशक्तीवर विश्वास ठेवू शकत नाही. तिने जर तिचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला असेल, तर ते तिने एकटीने केलेले नाही, हा खून आहे.'
'मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करते की, जसे द्रौपदीसाठी कृष्णाने, जसे रामांनी सीतेसाठी ठाम भूमिका घेतली, तशीच भूमिका घेत तुम्ही बहुपत्नीत्वाविरुद्ध कठोर कायदे कराल, अशी आम्हाला आशा आहे. संमतीविना नातेसंबंध, स्त्रियांवर होणारे अॅसिड हल्ले आणि महिलांचे तुकडे तुकडे करून हत्या करणाऱ्यांना कोणत्याही खटल्याशिवाय तात्काळ फाशीची शिक्षा द्या,' असे कंगना तिच्या पोस्टमध्ये म्हणाली आहे.
तुनिषाने 24 डिसेंबर रोजी केली आत्महत्या
तुनिषाने 24 डिसेंबर रोजी शूटिंग सेटवर गळफास लावून आत्महत्या केली होती. तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर काही तासांनंतर तिच्या आईच्या तक्रारीवरून तिचा सहकलाकार शिझान मोहम्मद खानला पोलिसांनी अटक केली. शिझानवर तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. बुधवारी न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी वाढवली. शिझान आणि तुनिशा जवळपास 4 महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या घटनेच्या 15 दिवस आधी दोघांचे ब्रेकअप झाले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.