आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीव्ही अभिनेत्री तुनिषा मृत्यूप्रकरणी तिचा बॉयफ्रेंड शिझान खान 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. दोन दिवसांपूर्वी तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत शिझान आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते. तर आज शिझानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. आता तुनिषाने शिझानच्या आईसाठी रेकॉर्ड केलेली व्हॉईस नोट समोर आली आहे.
शिझान खानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत तुनिषा शर्माची एक व्हॉईस नोट सगळ्यांसमोर आणली. तिने शिझान खानच्या आईसाठी व्हॉईस नोट रेकॉर्ड केली होती. या व्हॉईस नोटमध्ये तुनिषा शिझानच्या आईवर तिचे किती प्रेम आहे हे बोलताना दिसत आहे.
व्हॉइस नोटमध्ये काय म्हणाली होती तुनिषा शर्मा?
तुनिषाने या व्हॉईस नोटमध्ये म्हटले की, "अम्मा तुम्ही माझ्यासाठी खूप काही आहात. तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाच्या आहात हे तुम्हालाही माहित नसेल. म्हणूनच तुमच्याबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करावी असे वाटते. पण मला स्वतःलाच काय होत आहे हे मलाच ठाऊक नाही," असे तुनिषा म्हणाली होती.
तुनिषाची ही व्हॉईस नोट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे शिझानच्या कुटुंबीयांनी तुनिषाच्या आईवर तिच्या मुलीला फिरण्याची इच्छा असताना काम करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे.
तुनिषाच्या आई वनिता शर्मा यांनी शिझानवर खोटे आरोप लावल्याचा दावा शिझानच्या बहिणींनी केला आहे. आम्ही कधीही कुणावर धर्मांतरासाठी दबाव टाकू शकत नाही. तिला कधीही दर्ग्यात नेले नाही. तसेच तुनिषाचा हिजाबमधील फोटो हा एका शोमधील होता. तिच्यावर कधीही हिजाब घालण्यासाठी दबाव टाकला नाही, असा खुलासा शिझानच्या कुटुंबीयांनी केला आहे.
तुनिषाचे आईसोबतचे नातेसंबंध बिघडले होते. वडिलांच्या निधनानंतर तिने कधीही आपला वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला नाही, असेही शिझानच्या कुटुंबीयांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिझानची बहीण म्हणाली, "आत्महत्येआधी तुनिषा आणि माझे बोलणे झाले होते. आवाजावरुन ती आनंदी वाटत होती. नाताळची दोन दिवसांची सुटी तिला चंदीगडला साजरी करायची होती. सुटी मिळवण्यासाठी तिने प्रोडक्शन हाऊसला विनंती करण्यास मला सांगितले होते. प्रोडक्शन हाऊसकडून तिला सुटी मिळत नव्हती. तुनिषाच्या आईने जबरदस्तीने दोन म्युझिक व्हिडिओ साइन केले होते. मी तिचे तिकीट बुक केले होते. तिच्या सुटीसाठी प्रोडक्शन हाऊसला विनंती करत होते."
शिझानचा जामीनासाठी अर्ज
शिझान खानला 31 डिसेंबर रोजी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्याच्या जामीनासाठी वसई न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. तुनिषा शर्माने आत्महत्या केल्यानंतर शिझान खानवर अनेक आरोप झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अटक केली. त्यानंतर त्याला वसई न्यायालयात हजर करण्यात आले. वसई न्यायालयाने 31 डिसेंबर रोजी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि त्यानंतर आता शिझानच्या जामीनासाठी वसई न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय?
हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. वसईनजिकच्या नायगावमध्ये एका मालिकेचे शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. तुनिषाच्या आत्महत्येला तिचा बॉयफ्रेंड शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईने वालीव पोलीस स्थानकात केली आहे. त्यानंतर वसई पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतले आहे. तुनिषा शर्माने शिझान खानच्या मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. तुनिषा आणि शिझान हे दोघे सब टीव्हीच्या अलिबाबा... दास्तान-ए-काबुल या मालिकेत मुख्य भूमिकेत एकत्र काम करत होते. तुनिषाने गळफास घेतल्याचे लक्षात येताच, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.