आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रसिद्ध गायक-अभिनेता आणि होस्ट आदित्य नारायण 1 डिसेंबरला मैत्रीण श्वेता अग्रवालसोबत लग्नबंधनात अडकला आहे. कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत आदित्य-श्वेताने सात फेरे घेतले. आपल्या मुलाच्या लग्नानंतर प्रसिद्ध गायक उदित नारायण हे सध्या खूप आनंदी आहेत. उदित नारायण यांनी अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा करताना सांगितले की, आदित्य आणि श्वेता हे मागील 10 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते आणि या दोघांचे नाते ऑफिशिअल करण्याची वेळ आली आहे, असे मला वाटले होते.
उदित नारायण यांनी स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, ‘माझ्या मुलाच्या लग्नासाठी सर्व मित्र आले पाहिजेत होते, ही माझी इच्छा होती. परंतु कोरोना या साथीच्या रोगामुळे हे शक्य होऊ शकले नाही. मला आदित्यचे लग्न कोरोना संपल्यानंतर करण्याची इच्छा होती. मात्र, त्यासाठी आदित्य आणि श्वेताच्या घरचे तयार नव्हते. त्यांना आताच लग्न करायचे होते.' परिस्थिती ठिक झाल्यानंतर सर्व मित्रांना बोलावून सेलिब्रेशन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधानांकडून शुभेच्छा मिळणे ही अभिमानाची गोष्ट
उदित पुढे म्हणाले, 'कोरोना या साथीच्या रोगामुळे बरेच लोक लग्नाला येऊ शकले नाहीत. मात्र, त्या सगळ्यांनी त्यांच्या शुभेच्छा पाठवल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शुभेच्छा पत्र मिळणे ही आनंदाची बाब आहे. या पत्रात त्यांनी आदित्यला त्याच्या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. अमिताभ बच्चन यांच्याकडून शुभेच्छा पत्रही आले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील फोनवरून शुभेच्छा दिल्या होत्या. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही आदित्य-श्वेताला शुभेच्छा दिल्या. या सर्व शुभेच्छा माझ्यासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे', असे उदित नारायण म्हणाले.
सून श्वेताविषयी उदित म्हणाले..
उदित यांनी मुलाखतीत आपल्या सूनेविषयी सांगितले, 'श्वेता खूप गोड मुलगी आहे. कमी बोलते आणि जेव्हा ती बोलते तेव्हा आम्ही लक्ष देऊन तिचा आवाज ऐकतो. आदित्यसाठी बरीच स्थळं येत होती. मात्र आदित्यने श्वेतासोबत लग्न करणार असल्याचे आपल्या आईला सांगितले होते. यामुळे मी आनंदी होतो.'
लग्नाची तारीख अशी ठरली
1 डिसेंबर रोजी उदित नारायण यांचा वाढदिवस असतो आणि याच दिवशी आदित्य-श्वेताचे लग्न झाले. याविषयी ते म्हणाले, 1 डिसेंबर रोजी माझा वाढदिवस होता. असे नाही की आम्ही ठरवून 1 तारखेला लग्न केले. खरं तर डिसेंबरमध्ये लग्न करण्याचे निश्चित झाले होते. मग पंडितजींनी लग्नासाठी 1 डिसेंबरचा मुहूर्त असल्याचे सांगितले. त्यावर आम्ही सहमती दर्शवली. अशाप्रकारे आता एकाच दिवशी दोन सेलिब्रेशन असणार आहे
लग्नात 50 जण सहभागी झाले होते
आदित्य आणि श्वेता यांचे लग्न मुंबईतील जुहूस्थित इस्कॉन मंदिरात झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नात फक्त 50 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेडिंग रिसेप्शन पार पडले. यात भारती सिंह, हर्ष लिंबाचिया आणि गोविंदा नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा द्यायला पोहोचले होते.
पहिल्या चित्रपटाच्या सेटवर जुळले सूत
एका मुलाखती दरम्यान आदित्यने आपल्या प्रेमाची कबुली देत, लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले होते. बोलताना आदित्य म्हणाला, ‘शापितच्या सेटवर माझी आणि श्वेताची भेट झाली होती. पहिल्याच भेटीत आमची छान मैत्री झाली होती. मात्र, काही काळाने मी तिच्यावर प्रेम करू लागलो, याची जाणीव मला झाली. मी तिला याबद्दल कल्पनादेखील दिली होती. मात्र, त्यावेळी आम्ही दोघेही करिअरमध्ये सेटल होण्याचा प्रयत्न करत असल्याने, प्रेमाऐवजी मैत्रीच्या नात्याला अधिक प्राधान्य दिले.
श्वेता ही देखील एक अभिनेत्री असून तिने शगुन, देखो मगर प्यार से आणि बाबुल की दुआएं लेती जामध्ये काम केले. याशिवाय तिने प्रभास आणि सुदीर या सुपरस्टार्ससोबतही स्क्रिन शेअर केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.