आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'मुन्नाभाई एमबीबीएस' सारख्या चित्रपटाद्वारे संजय दत्तच्या खालावलेल्या प्रतिमेला नवा आयाम देणारे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक विधू विनोद चोप्रा यांनी मोठ्या संघर्षानंतर चित्रसृष्टीत नाव कमावले. नियम आणि तत्त्वाच्या चाचणीस पात्र चित्रपट तयार करण्यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांच्या जीवनाशी संबंधित काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊ...
विधू विनोद चोप्रा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील विख्यात दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथाकार आहेत. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1952 रोजी श्रीनगर येथे झाला. त्यांचे कूटुंब मूळचे पेशावर, पाकिस्तानचे. त्यांच्या आई शांतिदेवी चोप्रा यांनी 1990 मधील काश्मिरी पंडितांच्या वादानंतर श्रीनगर सोडले. विधू यांचा यंदाचा 'शिकारा' हा चित्रपट याच कथानकावर आधारित होता. तो त्यांनी आईला समर्पित केला आहे. खासगी जीवनाबाबत सांगायचे झाले तर विधू यांनी तीन लग्ने केली. 1996 मध्ये त्यांनी चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रांशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. मुलगा अग्नी आणि मुलगी जूनी चोप्रा.
पित्याच्या मर्जीविरुद्ध विधू मुंबईत आले. त्यांच्या "मर्डर अॅट मंकी हिल'या पहिल्याच शॉर्टफिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याशिवाय त्यांच्या "अॅन एनकाउंटर विथ फेसेस' या लघु माहितीपटाला ऑस्करमध्ये शॉर्ट डॉक्युमेंट्री फिल्म श्रेणीत नामांकन मिळाले होते.
विधू यांनी 1985 मध्ये स्वत:ची निर्मिती संस्था स्थापन केली होती. या संस्थेद्वारे "परिंदा', "1942 ए लव स्टोरी', "मुन्ना भाई एमबीबीएस', "परिणीता', "लगे रहो मुन्नाभाई', "3 इडियट्स' आणि "पीके' सारखे चित्रपट त्यांनी दिले. त्यांच्या बॅनरअंतर्गत निर्मित 17 पैकी 6 चित्रपटांना आतापर्यंत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तसेच पाच चित्रपटांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 2015 मध्ये "ब्रोकन हॉर्सेस'चित्रपटाद्वारे विधू यांनी हॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते.
विधू यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. त्या वेळी विधू शाळेत शिकत होते. खाकी पँट आणि निळा शर्ट हा गणवेश होता. त्या वेळी त्यांचे सावत्र बंधू रामानंद सागर ‘आरजू’ चित्रपट करत होते. विधू आपल्या मित्रांसह त्या चित्रपटाच्या सेटवर गेले होते. मात्र त्यांना कोणीतरी सांगतिले की त्यांनी चांगले कपडे घातलेले नाहीत. ते सेटवर आल्यामुळे कोणालाही फारसा आनंद झालेला नाही. ही बाब विधू यांच्या मनाला एवढी बोचली की त्यांनी चित्रपट तयार करण्याची शपथच घेतली.
निर्माता आणि वितरक या नात्याने विधू यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात नाना पाटेकर यांच्या "खामोश'द्वारे केली होती. त्यांनी अनेक वितरकांना हा चित्रपट दाखवला, सर्वांनी चित्रपटाचे कौतुक केले, मात्र एकानेही वितरणाची तयारी दाखवली नाही. निराश झालेल्या विधू यांनी मग स्वत:च चित्रपट प्रदर्शित करायचे ठरवले आणि रीगल थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित केला. पहिल्या शोला फक्त चार प्रेक्षक होते. मात्र त्यानंतरचा प्रत्येक शो हाऊसफुल्ल झाला आणि सहा आठवडे हा चित्रपट थिएटरमध्ये चालला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.