आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने अलीकडेच भारतीय मुली आळशी असल्याचे वक्तव्य केले होते. सुरुवातीला तिच्या या वक्तव्याचे अनेकांनी कौतुक केले होते. पण आता तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. सोशल मीडियावर तिच्या या वक्तव्यावर खूप टीका होत आहे. अनेकांनी तिला महिलांचा अपमान करत असल्याचे म्हणत फटकारले आहे. आता सोशल मीडिया सेंसेशन म्हणून ओळखली जाणारी उर्फी जावेद हिने सोनाली कुलकर्णीने केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
काय म्हणाली उर्फी जावेद?
अमित श्रीवास्तव नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन सोनाली कुलकर्णीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. यामध्ये लग्नासाठी मुलगा शोधताना मुलींच्या अपेक्षा किती अवाजवी असतात, याबाबत ती व्यक्त झाली आहे. पण आता सोनालीचे हे मत उर्फीला पटलेले नाही. तिने हा व्हिडिओ रिट्वीट करत म्हटले, "तू जे काही बोललीस ते किती असंवेदनशील होते. आधुनिक काळातील महिला त्यांची नोकरी आणि घरातील कामे दोन्ही सांभाळतात, त्यांना तू आळशी म्हणतेस? चांगले पैसे कमावणारा नवरा हवा, अशी मुलींची इच्छा असेल तर त्यात गैर काय? शतकानुशतके पुरुषांनी स्त्रियांना फक्त मुलं जन्माला घालण्याचे मशीन म्हणून पाहिले. लग्नात मुलीच्या कुटुंबाकडून हुंडाही मागितला जातो. त्यामुळे महिलांनो, तुमच्या अटी आणि मागण्या मांडण्यास घाबरू नका. होय, महिलांनी काम केले पाहिजे, हे तुझे म्हणणे बरोबर आहे, परंतु हा एक विशेषाधिकार आहे जो प्रत्येकाला मिळत नाही," अशा शब्दांत उर्फीने आपले मत मांडले आहे.
उर्फीच्या या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना उर्फीचे म्हणणे योग्य वाटत आहे. या देशातील महिला कुटुंब सांभाळण्यासाठी प्रचंड मेहनत करतात, त्यामुळे सोनालीने असे सरसकट सगळ्याच महिला आणि मुलींना आळशी म्हणणे चुकीचे आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अलीकडेच सोनालीने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमातील तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सोनाली ही भारतातील मुली आणि मुलांबाबत बोलताना दिसत आहे. सोनाली म्हणली, "भारतातील बऱ्याच मुली आळशी आहेत. त्यांना असा बॉयफ्रेंड पाहिजे किंवा असा पती हवा आहे की, ज्याच्याकडे चांगली नोकरी आणि घर असेल. पण त्या मुलीमध्ये एवढी हिंमत नाही की, ती म्हणेल जेव्हा तू माझ्यासोबत लग्न करशील तेव्हा मी आपल्या दोघांसाठी काय करु शकते?"
पुढे सोनाली म्हणाली, "तुमच्या घरात अशी मुली घडवा जी स्वतःसाठी कमवू शकेल. जी असे म्हणू शकेल की, घरात नवा फ्रिज घ्यायचा असेल तर अर्धे पैसे मी देईन. मुले 18 वर्षांची झाल्यावर त्यांना पैसे कमावण्याचा दबाव असतो. कुटुंबाला हातभार लावण्याची जबाबदारी येते. हे पाहून मला माझ्या या भावांसाठी रडायला येते. माझा नवरा 20 व्या वर्षी नोकरीला लागला आणि पैसे कमवू लागला. का? मुली तर 25-27 वर्षांच्या होईपर्यंत फक्त विचारच करत असतात. तरी हनिमून भारतात नको परदेशात हवा, असा त्यांचा हट्ट असतो. आता तर विचारूच नका. डेस्टिनेशन वेडिंग्स, प्री-वेडिंग सगळं आलंय आणि त्याचा खर्चही त्या मुलाने करायचा असतो. का? तुम्हाला सर्व ऐशोआराम हवा असेल तर मग तुम्हीही कमवा. तुम्हीही शिका, नोकरी शोधा, चार ऑफिसमध्ये जा, कामासाठी विचारा, असे होत नाही," असे सोनाली म्हणाली. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.