आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर आज 49 वर्षांची झाली आहे. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या उर्मिलाने आपल्या आयुष्याची 4 दशके इंडस्ट्रीला दिली आहेत. रंगीला, खूबसूरत, जानम समझा करो, जुदाई, सत्या सारखे अनेक मोठे हिट चित्रपट तिने दिले आहेत. उर्मिला ही 90 च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री होती. पण राम गोपाल वर्मांसोबतचे नाते तिचे करिअर उद्धवस्त करणारे ठरले. तिला चित्रपट मिळणे बंद झाले आणि करिअर पुन्हा रुळावर आले नाही. निश्चितच तिने कमबॅकचा प्रयत्न केला खरा, पण तो अपयशी ठरला.
आज उर्मिलाच्या वाढदिवसाच्या खास निमित्ताने तिला मिळालेले यश आणि करिअरमधील मोठ्या चुकांवर एक नजर टाकुया -
उर्मिला मातोंडकरचा जन्म 4 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबईतील एका महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला. वयाच्या अवघ्या 3 व्या वर्षी उर्मिला बीआर चोप्रा यांच्या 'कर्मा' (1977) या चित्रपटात दिसली होती. यानंतर 1980 मध्ये प्रदर्शित झालेला श्रीराम लागू यांचा 'जाकुल' या चित्रपटात अभिनयाची तिला संधी मिळाली. त्यावेळी उर्मिला फक्त 6 वर्षांची होती. त्याचवर्षी तिचा आणखी एक 'कलयुग' चित्रपट प्रदर्शित झाला. बालकलाकार म्हणून उर्मिलाने 1983 च्या 'मासूम' चित्रपटासह अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. सुमारे अर्धा डझन चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्यानंतर उर्मिलाने चित्रपट करणे बंद केले आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. आर.डी. रुपारल कॉलेजमधून तिने मानसशास्त्रात पदवी संपादन केली.
सनी देओल, कमल हासन यांसारख्या बड्या स्टार्ससोबत केली करिअरची सुरुवात
उर्मिलाने मुख्य अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात मल्याळम चित्रपट 'चाणक्य'मधून केली होती. त्यानंतर तिला सनी देओलसोबत 'नरसिम्हा' या हिंदी चित्रपटात काम मिळाले. हा चित्रपट हिट ठरला होता. उर्मिलाला देशव्यापी ओळख मिळवून देणारा चित्रपट म्हणजे 'चमत्कार' आणि स्टारडम मिळवून देणारा चित्रपट म्हणजे 'आ गले लग जा'.
'रंगीला'मुळे पालटले उर्मिलाचे नशीब
1995 मध्ये आलेल्या 'रंगीला' या चित्रपटात उर्मिलाने मिली जोशी या तरुणीची भूमिका साकारली होती, जी अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहते. हा चित्रपट त्यावर्षीचा सर्वात हिट चित्रपट ठरला. यामध्ये उर्मिलासोबत आमिर खान आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत होते. उर्मिलाला या चित्रपटासाठी तिला तिचे पहिले फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते.
'रंगीला' हिट झाल्यानंतर एकीकडे उर्मिला फॅशन आयकॉन बनली, तर दुसरीकडे लोकांनी तिला सेक्स सिम्बॉलचा दर्जा दिला. यावर रेडिफशी संवाद साधताना उर्मिला म्हणाली होती की, रंगीला हा एक असा चित्रपट आहे जो तुम्ही तुमच्या कुटुंबासह पाहू शकता. त्यात अश्लील काहीही नाही. हा चित्रपट ट्रेंड सेटर आहे.
'रंगीला' हिट झाल्यानंतर उर्मिलाने लिहिले होते आमिरला पत्र
एके दिवशी 'रंगीला' चित्रपटासाठी डबिंग करत असताना उर्मिलाने आमिरचा अभिनय पाहिला आणि ती थक्क झाली. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा उर्मिला आमिरला पत्र लिहिणारी पहिली चाहती होती.
तन्हा तन्हा गाण्यात घातली होती जॅकी श्रॉफची बनियान
उर्मिलाने झी कॉमेडी शोमध्ये सांगितले होते की, 'रंगीला'मधील 'तन्हा तन्हा' या गाण्यात तिने सहकलाकार जॅकी श्रॉफची बनियान घातली होती. जॅकीनेच तिला हा सल्ला दिला होता. सुरुवातीला उर्मिलाला खूप संकोच वाटला, पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिला या दृश्यासाठी खूप प्रशंसा मिळाली.
'छम्मा छम्मा' गाणे पाहून लोकांनी न्यूयॉर्क थिएटरमध्ये उडवले होते पैसे
उर्मिला मातोंडकर 1998 मध्ये आलेल्या 'चायना गेट' चित्रपटातील 'छम्मा छम्मा' या गाण्यात झळकली होती. उर्मिलाच्या कारकिर्दीतील हे सर्वात हिट गाणे आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत उर्मिलाने या गाण्याशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे. उर्मिलाने सांगितले होते की, तिची एक मैत्रीण 'चायना गेट' चित्रपट पाहण्यासाठी न्यूयॉर्कमधील थिएटरमध्ये गेली होती. प्रेक्षक शांत बसून संपूर्ण चित्रपट पाहत होते, पण उर्मिलाचे 'छम्मा छम्मा' गाणे सुरू होताच लोक थिएटरमध्ये नाचू लागले आणि नोटा उडवू लागले.
5 किलोचा लेहेंगा आणि 15 किलोचे दागिने घालून हे गाणे केले होते चित्रीत
उर्मिलाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तिने गाजलेल्या 'छम्मा छम्मा' गाण्यासाठी 5 किलोचा लेहेंगा आणि 15 किलोचे दागिने घातले होते. जेव्हा उर्मिला गाण्याच्या लुक टेस्ट आणि फोटोशूटसाठी तयार झाली, तेव्हा दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी तिला सांगितले की, हे दागिने खूप आहेत. पण बंजारनच्या लूकसाठी हे दागिने आवश्यक असल्याचे उर्मिलाने त्यांना उत्तर दिले. पण एवढे दागिने घालून नृत्य करणे अवघड होईल, असे दिग्दर्शकाने तिला समजावून सांगितले. पण उर्मिलाने एवढे दागिने घालूनच गाणे शूट करण्याचा निर्णय घेतला. गाण्याचे शूटिंग सुरू होताच, उर्मिलाला तिच्या दागिन्यांमुळे खूप दुखापत झाली, परंतु परफेक्शनसाठी उर्मिलाने एवढ्या जड दागिन्यांमध्ये गाण्याचे चित्रीकरण पूर्ण केले होते.
उर्मिला येताच अनेक नायिकांच्या हातून चित्रपट निसटले
उर्मिला मातोंडकरने सनी देओल, डिंपल कपाडिया यांच्या 'नरसिम्हा' या चित्रपटातून मुख्य नायिका म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण त्याआधी हा चित्रपट आयशा जुल्काला ऑफर झाला होता, सर्वत्र बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. पण नंतर उर्मिलाच्या अभिनयाने प्रभावित होऊन निर्मात्यांनी तिला आयशाला चित्रपटातून बाहेर करत उर्मिलाला फायनल केले होते.
करिश्मा कपूरची घेतली जागा
1997 मध्ये प्रदर्शित झालेला 'जुदाई' हा चित्रपट खूप गाजला होता, ज्यामध्ये उर्मिला मातोंडकरने श्रीदेवी आणि अनिल कपूर यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती. पण तिच्याआधी हा चित्रपट करिश्मा कपूरला ऑफर झाला होता.
रामगोपाल वर्मा यांच्यामुळे करिअर झाले उद्ध्वस्त
राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या 'गन अँड थिंग्ज: द स्टोरी ऑफ माय लाइफ' या बायोग्राफीत उर्मिलाचा उल्लेख केला आहे. द वुमन इन माय फिल्म लाइफ या भागात त्यांनी सांगितले की, सिनेसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर मला प्रभावित करणारी उर्मिला मातोंडकर ही पहिली मुलगी होती. उर्मिलाच्या सौंदर्याने मला वेड लावले होते. तिच्या चेहऱ्यापासून तिच्या फिगरपर्यंत... मी तिच्या प्रेमात आकंठ बुडालो होतो. तिच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट अत्यंत दैवी होते. रंगीला आधीही तिने काही चित्रपट केले होते, पण त्या चित्रपटांमुळे तिला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. रंगीलाच्या माध्यमातून मी तिचे सौंदर्य जगाला दाखवले. रंगीला बनवण्याचा माझा हेतू उर्मिलाचे सौंदर्य टिपणे हा होता.
राम गोपाल वर्मा फक्त उर्मिलासोबत चित्रपट बनवत असत
'रंगीला' चित्रपटानंतर राम गोपाल वर्मा उर्मिलाच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांनी फक्त उर्मिलासोबतच चित्रपट करायला सुरुवात केली. रामू त्यांच्या प्रत्येक चित्रपटात नायिका म्हणून फक्त उर्मिलालाच घ्यायचे. मग तो कोणत्याही धाकटीचा चित्रपट असो. रंगीलानंतर रामू यांनी उर्मिलाला त्यांच्या 13 चित्रपटांमध्ये कास्ट केले, ज्यात तेलुगू चित्रपट अँथम, द्रोही, गायम, अंगनगा, ओका राजू आणि हिंदीत रंगीला, दौड, सत्या, कौन, मस्त, जंगल, कंपनी, भूत आणि आग या चित्रपटांचा समावेश आहे.
रामू यांच्या ऑफिसमधली एका खोलीला उर्मिलाचे नाव
राम गोपाल वर्मा उर्मिलाच्या प्रेमात इतके वेडे झाले होते की, त्यांनी त्यांच्या मुंबईतील ऑफिसमधील एका खोलीला उर्मिलाचे नाव दिले होते. या खोलीती भिंतींवर उर्मिलाची छायाचित्रे लावली होती. उर्मिला रामूसोबतच्या तिच्या नात्यावर कधीही उघडपणे बोलली नाही, पण त्यांच्या अफेअरची चर्चा प्रत्येक चित्रपट आणि वर्तमानपत्राचे मथळे असायची. याचा रामू यांच्या वैवाहिक जीवनावरही वाईट परिणाम झाला. ‘रिपब्लिकवर्ल्ड डॉट कॉम’च्या वृत्तानुसार राम गोपाल वर्मा यांच्या पत्नीला जेव्हा त्यांच्या नात्याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्या अधिक अस्वस्थ झाल्या होत्या. इतकेच नाही तर सेटवर दोघांना एकत्र पाहिल्यानंतर राम गोपाल वर्मा यांच्या पत्नीने उर्मिलाच्या कानाखाली मारली होती.
उर्मिलाला चित्रपटात घेण्यास प्रत्येक दिग्दर्शकाने दिला होता नका
रामूचे उर्मिलावर असलेले क्रश कुणापासूनही लपून राहिले नाही. रामू आपल्या प्रत्येक चित्रपटाक उर्मिलाला घेत असे. राम गोपाल वर्मा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक असे फिल्ममेकर आहेत, ज्यांच्याशी बहुतेक चित्रपट निर्मात्यांचे मतभेद आहेत. राम गोपाल वर्मांच्या कॅम्पमध्ये सहभागी झाल्याने उर्मिलाला इतर चित्रपट निर्मात्यांनी ऑफर देणे बंद केले.
करिअर उद्धवस्त होऊ लागल्याने उर्मिलाने रामूपासून अंतर ठेवायला सुरुवात केली. 2008 मध्ये आलेल्या EMI या चित्रपटानंतर उर्मिलाला चित्रपट मिळणे बंद झाले. तिने काही चित्रपटात छोटेखानी भूमिका साकारली पण तिला मुख्य भूमिकेतील चित्रपट मिळणे बंद झाले. दरम्यान, झलक दिखला जाच्या दुसऱ्या सीझनमध्ये उर्मिला परीक्षकाच्या खुर्चीत दिसली होती.
वयाच्या 42 व्या वर्षी 10 वर्षांनी लहान मुलाशी लग्न केले
उर्मिलाने 3 मार्च 2016 रोजी काश्मीरमधील बिझनेसमन आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीरशी लग्न केले. मोहसीन उर्मिलापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.
राजकारणात आजमावला हात
2019 च्या लोकसभा निवडणुकीत, उर्मिलाने काँग्रेस पक्षाच्या वतीने उत्तर मुंबईच्या जागेसाठी निवडणूक लढवली होती, परंतु तिला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर काही महिन्यांतच उर्मिलाने पक्षाचा राजीनामा दिला. उर्मिलाने 1 डिसेंबर 2020 रोजी शिवसेनेत प्रवेश केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.