आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेस्टिब्युलर हायपोफंक्शन आजाराशी झुंज देतोय वरुण धवन:म्हणाला- जणू शरीरावरील नियंत्रण सुटत चालले आहे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या 'भेडिया' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, अलीकडेच वरुणने खुलासा केला की, तो वेस्टिब्युलर हायपोफंक्शन नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. खरं तर, जेव्हा वरुणला कोविडनंतर बॉक्स ऑफिसवर पुनरागमन करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने सांगितले की, कोविडनंतर त्याला चित्रपटात काम करताना अधिक दबाव जाणवू लागला. मागील चित्रपटात जास्त काम केल्यामुळे, त्याला वेस्टिब्युलर हायपोफंक्शन नावाचा आजार जडला, ज्यामुळे तो खूप मानसिक तणावाखाली आहे.

कोविडनंतर बॉक्स ऑफिसवर पुनरागमन करणे खूप कठीण होते

4 नोव्हेंबरला वरुण धवन इंडिया टुडे मुंबई कॉन्क्लेव्हमध्ये पोहोचला होता. तिथे संवादादरम्यान वरुण आपल्या आजाराविषयी मोकळेपणाने बोलला. वरुण म्हणाला- 'कोविडच्या गोष्टी जसजशा सामान्य होऊ लागल्या तसे लोक कामासाठी उंदीर-मांजरांसारखे धावू लागले, असे वाटत नाही का? मला वाटतं लोक आता पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करत आहेत. माझ्याबद्दल सांगायचे तर, मी माझ्या जुग जुग जिओ या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली. मी जणू निवडणुकीला उभे आहे असे मला वाटले. मला कळत नाही की मी चित्रपटासाठी इतक्या दबावात का होतो,' असे वरुण म्हणाला.

वरुण पुढे म्हणाला- 'पण अलीकडे मी थांबलो आहे. मला माहित नाही मला काय झाले? मला वेस्टिब्युलर हायपोफंक्शन नावाचा आजार आहे. यामुळे मी खूप अस्वस्थ झालो आहे. जणू शरीरावरील नियंत्रण सुटत चालले आहे. पण असे असूनही मी खूप मेहनत घेतली आहे. आपण सगळे एका शर्यतीत आहोत. मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात एक उद्देश असतो. यामुळेच आपण मेहनत घेत असतो. मी माझ्या जीवनाचा उद्देश शोधत आहे आणि मला आशा आहे की इतरांना देखील त्यांचा उद्देश कधी ना कधी सापडेल.'

वेस्टिब्युलर हायपोफंक्शन म्हणजे काय?

वेस्टिब्युलर हायपोफंक्शन हा एक प्रकारचा मेडिकल डिसऑर्डर आहे. हा विकार कानात आतल्या बाजूने होतो. मानवी शरीरात एक वेस्टिब्युलर प्रणाली असते, जी कान, डोळे आणि स्नायू यांचे संतुलन राखते. मात्र, वेस्टिब्युलर हायपोफंक्शनची समस्या निर्माण झाल्यास रुग्णाच्या मेंदूला संदेश पोहोचवण्यात अडचण येते. यामुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे संशोधनात समोर आले आहे. वेस्टिब्युलर हायपोफंक्शन दोन प्रकारचा असतो. पहिला एकतर्फी वेस्टिब्युलर हायपोफंक्शन (UVH) आहे, ज्यामुळे एका कानाची मुख्य वेस्टिब्युलर प्रणाली योग्यरित्या कार्य करत नाही तर दुसरा प्रकार द्विपक्षीय वेस्टिब्युलर हायपोफंक्शन ( BVH) आहे, जो दोन्ही कानांवर परिणाम करतो.

25 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे 'भेडिया'
वरुण धवनचा बहुप्रतिक्षित 'भेडिया' हा चित्रपट 25 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. वरुण व्यतिरिक्त या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी आणि क्रिती सेनन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा एका लांडग्याने चावा घेतलेल्या तरुणाची आहे. लांडगा चावल्यानंतर तो मुलगाही लांडग्यासारखे वागू लागतो. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...