आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे टेस्टमध्ये पास झाला रितेश-जिनिलीयाचा 'वेड':रणवीर सिंगच्या 'सर्कस'च्या कलेक्शनला मागे टाकत केली एवढ्या कोटींची कमाई

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रितेश देशमुख आणि जिनिलीया स्टारर ‘वेड’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये गर्दी करत आहेत. रिलीजच्या अवघ्या तीन दिवसांत चित्रपटाने तब्बल 10 कोटींची कमाई केली. आता मंडे टेस्टमध्येदेखील हा चित्रपट पास झाला आहे. एकीकडे हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी होत आहेत, तर दुसरीकडे वेड या चित्रपटाने बाजी मारली आहे. सोमवारी या चित्रपटाने तीन कोटींचा गल्ला जमवला. आठवड्याचा पहिला वर्किंग डे असूनही चित्रपटाच्या कलेक्शनवर त्याचा परिणाम दिसला नाही. सोमवारीदेखील प्रेक्षकांनी हा चित्रपट बघायला थिएटरमध्ये गर्दी केली.

तरण आदर्श यांनी शेअर केले कलेक्शन
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे ‘वेड’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत माहिती दिली आहे. प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 2 कोटी 25 लाख रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 3 कोटी 25 लाख रुपयांचा गल्ला जमावला. रविवारी 4 कोटी 50 लाख तर सोमवारी 3 कोटी रुपये ‘वेड’ चित्रपटाने कमावले. एकूण आतापर्यंत 13 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई या चित्रपटाने केली.

'सर्कस'च्या कलेक्शनला टाकले मागे
रितेश आणि जिनिलीयाच्या ‘वेड’ने बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले आहे. रणवीर सिंगच्या ‘सर्कस’ चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यामध्ये सोमवारी (2 जानेवारी) फक्त 75 लाख रुपये जमवले होते. म्हणजेच हिंदी चित्रपटालाही मागे टाकत ‘वेड’ चित्रपटाने भरघोस कमाई केली आहे.

विकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये पाचव्या स्थानावर 'वेड'
'वेड' या चित्रपटाने आणखी एक रेकॉर्ड केला आहे. आजवर प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांमध्ये विकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये या चित्रपटाचा समावेश झाला आहे. हा चित्रपट पाचव्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर 'सैराट' आहे. या चित्रपटाने 12.10 कोटी कमावले होते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 'टाइमपास 2' आहे. या चित्रपटाने 11 कोटींचा गल्ला जमावला होता. रितेशचा 'लय भारी' चित्रपट आहे. या चित्रपटाने 10.55 कोटी कमावले होते. तर 'नटसम्राट'ची कमाई 10.25 कोटी रुपये होती. त्यानंतर आता 10 कोटी कमावत​​​​​​ 'वेड' चित्रपट या यादीमध्ये सहभागी झाला आहे.

'वेड' या चित्रपटात जिनिलीया आणि रितेशसोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, जिया शंकर, शुभंकर तवडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानहा एका गाण्यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसतोय.

बातम्या आणखी आहेत...